जिल्हाधिकारी कार्यालय व जि.प.च्या पुढाकाराने शेतक ऱ्यांचे मनोधर्य वाढवण्यासाठी बळीराजा सबलीकरण अभियान गतवर्षी सुरू करण्यात आले. विविध माध्यमांतून शेतकऱ्यांचे मनोबल वाढवले गेले. लातूरने केलेला प्रयोग दुष्काळग्रस्त १४ जिल्हय़ांत राज्य सरकार राबवत असून आपण या उपक्रमात पहिले पाऊल टाकले आहे. आत्महत्येचे विचार येणाऱ्या माणसांना बोलण्याची संधी उपलब्ध व्हावी, या साठी हेल्पलाईन सेवेचा चांगला लाभ होईल, असे मत जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी व्यक्त केले.
सोसायटी फॉर वेलबिईंग अवेअरनेस अँड रिहॅबिलिटेशन (स्वर) या संस्थेच्या वतीने ‘संवाद’ नावाने टेलिफोनिक हेल्पलाईनचे उद्घाटन मंगळवारी मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. जि.प. अध्यक्षा प्रतिभा पाटील कव्हेकर, उपाध्यक्ष अण्णासाहेब पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे, कृषी सभापती कल्याण पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेशकुमार मेघमाळे, पर्यावरणतज्ज्ञ अतुल देऊळगावकर, पोलीस अधीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण आदी उपस्थित होते.
बळीराजा सबलीकरण अभियानांतर्गत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातून गतवर्षी १ कोटी २ लाख ५ हजार ३०६ रुपये जमा झाले. शासकीय योजनेव्यतिरिक्त करावा लागणारा खर्च या निधीतून करण्याचे निश्चित केले. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या दोन शेतक ऱ्यांचा वैद्यकीय खर्च, एका विद्यार्थ्यांच्या अभियांत्रिकी शिक्षणाचा खर्च, एका शेतकऱ्याच्या ट्रॅक्टरचा हप्ता भरणे अशा माध्यमातून गतवर्षी पाच लाख २९ हजार रुपयांची मदत करण्यात आली. शासकीय वैद्यकीय अधिकारी व गावपातळीवरील आशा कर्मचारी यांना मानसिक आरोग्याबाबत प्राथमिक उपचाराचे प्रशिक्षण देण्यात आले. मानसिक तणावाखाली आलेल्या व्यक्तीला प्राथमिक आरोग्य केंद्रावरच प्राथमिक उपचार करता येतील, अशी व्यवस्था अस्तित्वात असल्याचे पोले यांनी सांगितले.
मानसोपचारतज्ज्ञ डॉ. मिलिंद पोतदार यांनी मानसिक तणावाखाली असलेल्या कोणाही व्यक्तीला सकाळी ८ ते रात्री १०पर्यंत १८००२३३१४३४ या क्रमांकावर विनाशुल्क दूरध्वनी मदतसेवा सुरू करण्यात आली आहे. आत्महत्येचे विचार मनात येण्याला अनेक कारणे आहेत. प्रारंभी नराश्य येणे, ही बाब गांभीर्याने घेतली जात नाही. त्यामुळेच वैयक्तिकरीत्या व समाज म्हणून मोठी किंमत चुकवावी लागते. गतवर्षी लातूर जिल्हय़ात ५० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. याशिवाय १ हजार २० आत्महत्या जिल्हय़ात झाल्या आहेत. सर्वच आत्महत्या दुर्दैवी असून त्या थांबविण्यासाठी ही सेवा आहे. शासकीय व खासगी ठिकाणी योग्य उपचार होऊ शकतात. प्रशासकीय यंत्रणा मदतीस सज्ज आहे. ‘जगण्यासाठी बोलू काही’ या नावाने हा मोफत उपक्रम सुरू केला आहे. अधिकाधिक लोकांपर्यंत याची माहिती पोहोचवण्याचे आवाहन पोतदार यांनी केले. दिनकर जगदाळे, देऊळगावकर, महेश मेघमाळे, प्रतिभा पाटील कव्हेकर व कल्याण पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. शाळांच्या माध्यमातून यासंबंधी मोठय़ा प्रमाणात जागृती करण्याची तयारी विविध शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींनी या प्रसंगी दाखवली.