मराठवाडय़ात भूगर्भातील पाण्याची पातळी आणखी खोल गेल्याचे अहवाल जानेवारीमध्ये करण्यात आलेल्या पाहणीत नोंदविण्यात आले आहेत. बीड जिल्ह्यातील आष्टी, तसेच उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी तालुक्यात पाण्याची पातळी पाच मीटरहून अधिक खोल गेली आहे. येत्या तीन महिन्यांत मराठवाडय़ातील तब्बल साडेपाच हजार िवधनविहिरी घेण्याचे नियोजन सरकारी पातळीवरून सुरू आहे. उसासाठी पाण्याचा होणारा बेसुमार उपसा हे भूजल पातळी घटण्याचे मुख्य कारण असल्याचे सांगितले जाते.
औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्याची पाणीपातळी मागील ५ वर्षांच्या तुलनेत २.९ मीटरने खाली गेली आहे. अन्य सर्व तालुक्यांत ही पातळी तुलनेने चांगली आहे. फुलंब्री तालुक्यातील अतिवृष्टीमुळे या तालुक्यातील भूगर्भातील पाणी कमी झाले असले, तरी ती नगण्य म्हणावी लागेल. या तालुक्यात केवळ ०.२३ मीटरने पाणीपातळी कमी झाली आहे. खुलताबाद, सिल्लोड, सोयगाव, कन्नडमधील पाणीपातळी घटली असली, तरी अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत ती चांगली आहे.
औरंगाबादसारखीच स्थिती जालन्याची आहे. परतूर, घनसावंगी, मंठा, जालना तालुक्यांत पाणीपातळी एक मीटरहून अधिक घटली आहे, तर भोकरदन, जाफराबाद, अंबड, बदनापूर तालुक्यांत भूगर्भात तुलनेने अधिक पाणी असेल, असे अहवाल आहेत. औरंगाबाद, जालना वगळता अन्य सहा जिल्ह्यांतील पाणीपातळीची घट तीन मीटरपेक्षा अधिक आहे.
टँकरवर अवलंबून असणाऱ्या लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्याची पाणीपातळी ४.४९ मीटरने घटली आहे. मात्र, अत्यंत झपाटय़ाने पाणीपातळी घटलेल्या तालुक्यांमध्ये आष्टी व वाशीचा समावेश आहे. लातूर जिल्ह्यातील काही क्षेत्र या पूर्वीच अतिशोषित पाणलोटाच्या यादीत आहे. या भागातून पाण्याचा उपसा करू नये, अशा सूचना आहेत. हा भाग मांजरा नदीच्या पट्टयातील आहे. सुमारे ४०० गावांची वाटचाल वाळवंटाकडे जात असल्याचे अहवाल होते. मात्र, या भागात जलपुनर्भरणाचे कार्यक्रम घेतलेच नाहीत. आता नव्याने पाणीपातळी घटली आहे.
उस्मानाबाद, बीड व लातूर जिल्ह्यांतील घट चिंतनीय असल्याचे संबंधित अधिकारी सांगतात. परभणी जिल्ह्यात पूर्णा, सेलू व परभणी तालुक्यांतही मोठी घट दिसून आली आहे. नांदेड, लोहा यासह सर्व तालुक्यांत पाणीपातळीत घट दिसून आली. उस्मानाबाद जिल्ह्यातील  वाशी, परंडा, लोहारा, उमरगा तालुक्यांतही चार मीटरहून अधिक घट दिसून आली. १२६ विहिरींच्या पातळीची नोंद भूजल विकास यंत्रणेकडून घेतली जाते. या नोंदी कोरडेपणा कसा वाढत जातो आहे, हे सांगणाऱ्या आहेत.
तीन मीटरहून अधिक पाणीपातळी घटलेले तालुके
बीड – आष्टी (५.६५), परळी (४.६४), अंबाजोगाई (३.६०), पाटोदा (३.९६), बीड (३.०५).
लातूर – अहमदपूर (४.४९), जळकोट (४.४२), चाकूर (३.६०), उदगीर (३.२७), लातूर (३.४९)
परभणी – पूर्णा (३.६६), परभणी (३.९९), सेलू (४.८१).
उस्मानाबाद – उस्मानाबाद (३.२८), तुळजापूर (३.७९), उमरगा (३.६५), लोहारा (४.४१), भूम (३.५६), कळंब (३.१३), वाशी (५.४५), परंडा (४.२३).
नांदेड – नांदेड (४.८९), मुदखेड (३.४७), अर्धापूर (३.८५), भोकर (३.२५), देगलूर (३.९८), मुदखेड (३.८४), कंधार (३.७६), बिलोली (३.१३), धर्माबाद (३.९९), नायगाव (३.९३), लोहा (४.९९)
औरंगाबाद, जालना आणि हिंगोली या तीन जिल्ह्य़ांत तीन मीटरहून अधिक पाणीपातळी घटलेली नाही.