केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने आठवडी बाजारात होणाऱ्या दुभत्या जनावरांच्या खरेदी-विक्रीवरच गदा आणली असतानाच यावरुन तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. रमझान महिना सुरु होण्यापूर्वीच हा निर्णय का घेतला असा प्रश्न बॅनर्जींनी उपस्थित केला आहे. निर्णय मागे घेतला नाही तर न्यायालयात जाण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने १९६० सालच्या प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टु अ‍ॅनिमल्स या कायद्यात दुरुस्ती केली आहे. यामुळे देशभरात ठिकठिकाणच्या आठवडी बाजारात होणाऱ्या दुभत्या जनावरांच्या खरेदी-विक्रीवर गदा आली आहे. गाई, म्हैस, वासरू, रेडकू आणि उंट यांची खरेदी विक्री खाटीकखान्यांसाठी करता येणार नाही अशी दुरुस्ती या कायद्यात करण्यात आली आहे. यावरुन तृणमूल काँग्रेस आणि तामिळनाडूतील डीएमकेने भाजपवर टीकास्त्र सोडले आहे.

मोदी सरकारने घातलेली बंदी ही ‘लोकशाहीविरोधी आणि घटनाविरोधी’ आहे. राज्यांच्या अधिकारावर अतिक्रमण करण्याचा हा हेतुपुरस्सर प्रयत्न घटनाविरोधी आणि अनैतिक आहे. आम्ही ही बंदी मान्य करणार नाही असे ममता बॅनर्जींनी सांगितले. राज्याच्या महाधिवक्त्यांशी चर्चा करून आपण या बंदीला कायदेशीर आव्हान देऊ. राज्याशी संबंधित विषयात हस्तक्षेप करून देशाची संघराज्य व्यवस्था नष्ट करू नका, अशी मी केंद्राला विनंती करणार असल्याचे बॅनर्जी यांनी म्हटले आहे. देशातील धर्मनिरपेक्ष पक्षांनी याप्रकरणात एकत्र यावे असे आवाहन त्यांनी केले.

तामिळनाडूतील डीएमकेनेही या बंदीचा विरोध दर्शवला आहे. ३१ मेला डीएमकेचे नेते चेन्नईत निदर्शने करणार आहेत. तर केंद्र सरकार हिंदूत्ववादी अजेंडा राबवत असल्याची टीका डाव्या पक्षांनी केली आहे.