अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी व्हाईट हाऊसमध्ये ‘केम छो’ म्हणत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वागत केले. उभयतांमध्ये जवळपास दीड तास चर्चा झाल्यानंतर सर्वांनी सहभोजनाचा आनंद घेतला. व्हाइट हाऊसमधील ‘ब्ल्यू रूम’मध्ये मोदींसाठी शाही खाना ठेवण्यात आला होता. परंतु, नवरात्रीचे उपवास सुरु असल्याने मोदी फक्त गरम पाणी प्यायले.



दरम्यान, भारत आणि अमेरिकेद्वारे समृद्धी आणि शांतीतेसाठी संयुक्तपणे प्रयत्न करण्यात येणार असून त्यासाठी ‘चले साथ साथ’ हे व्हिजन स्टेटमेंटही मंगळवारी जारी करण्यात आले.
भारत आणि अमेरिका ही विविध परंपरा आणि धर्म असलेली जगातील दोन लोकशाहीप्रधान राष्ट्रे केवळ एकमेकांच्या फायद्यासाठी एकत्रित काम करणार नाहीत, तर जगाच्या फायद्यासाठी संयुक्तपणे काम करतील, असं व्हाईट हाऊसतर्फे जारी करण्यात आलेल्या अधिकृत पत्रात म्हटले आहे.



या वेळी अध्यक्ष ओबामा यांच्याबरोबरच उपाध्यक्ष जो बिदेन, परराष्ट्रमंत्री जॉन केरी आणि अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सुसान राइस आदी मंडळीही उपस्थित होती. तर मोदींसह परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोव्हाल आणि भारताचे अमेरिकेतील राजदूत एस. जयशंकर आदी मंडळी या भोजनास हजर होती.