पुणे ते दिल्ली प्रवासादरम्यान रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला सॅंडलने मारहाण केली. त्यानंतर ते वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी केवळ एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याने केलेल्या गैरवर्तणुकीवर प्रतिक्रिया दिली असे वक्त्यव्य एअर इंडियाच्या हवाई सुंदरीने केले आहे. ही हवाईसुंदरी त्या वेळी विमानावरच उपस्थित होती. रवींद्र गायकवाड हे अतिशय शांतपणे बोलत होते आणि ते चिडतील अशी चिन्हे कुठेच दिसत नव्हती.
एअर इंडियाचे कर्मचारी सुकुमार यांना मारण्याचे किंवा त्यांना विमानाच्या शिडीवरुन ढकलून देण्याचा रवींद्र गायकवाड यांचा विचार नव्हता असे त्या हवाईसुंदरीने म्हटले आहे. रवींद्र गायकवाड हे अतिशय सभ्यपणे सर्वांशी बोलत होते. त्यांनी आपला प्रश्न एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना सांगितला आणि आपणास व्यवस्थापक पदावरील व्यक्तीशी बोलावयाचे आहे असे त्यांनी म्हटले. गायकवाड यांना बोर्डिंग पासवर जे क्लास चे सीट मिळाले होते परंतु बसताना त्यांना इकोनॉमी क्लासची जागा मिळाली होती.
कारण या मार्गावर केवळ इकोनॉमी क्लासच उपलब्ध असतो असे त्या म्हणाल्या. आपल्याला एअर इंडियाच्या वरिष्ठ कर्मचाऱ्याला भेटायचे आहे असे ते म्हणाले आणि तिथेच बसून राहिले. त्यानंतर सुकुमार आले आणि ते बोलू लागले. सुकुमार आपले काम प्रामाणिकपणे करत होते परंतु अचानकपणे काय झाले कुणास ठाऊक त्यांच्याकडून काही चुकीचे बोलले गेले आणि गायकवाड यांचा पारा चढला असे त्या म्हणाल्या. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर दोघेही भांडू लागले होते. त्यानंतर गायकवाड यांनी आपली सॅंडल काढली आणि त्यांना ते मारणार होते.
त्यावेळी मी त्यांच्या भांडणात पडले आणि भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला असे त्या म्हणाल्या. रवींद्र गायकवाड यांचे माझ्याशी चांगले वर्तन होते तसेच ते मला ताई म्हणाले होते त्यामुळे गायकवाड मला काही करणार नाही अशी खात्री होती. त्यामुळे मी त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला असे त्या म्हणाल्या. त्यानंतर ते शांत झाले असे त्या हवाईसुंदरीने एएनआयला म्हटले. या प्रकारानंतर एअर इंडिया आणि इतर विमान कंपन्यांनी गायकवाड यांचे तिकीट रद्द केले. त्यामुळे त्यांना झेलम एक्सप्रेसने महाराष्ट्रात परत यावे लागले.