दक्षिण आफ्रिकेचा निवृत्त अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिस आणि वेस्ट इंडिजचा तडाखेबंद फलंदाज किरॉन पोलार्ड हे चॅम्पियन्स लीग ट्वेन्टी-२० स्पर्धेमध्ये आपल्या आयपीएलच्याच संघांकडून खेळणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. यंदा चॅम्पियन्स लीग ट्वेन्टी-२० स्पर्धा १३ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीमध्ये भारतामध्ये रंगणार आहे.
‘‘या स्पर्धेत आठ खेळाडू असे आहेत की त्यांचे दोन संघ या स्पर्धेत आहेत. या परिस्थितीमध्ये स्थानिक संघाला पहिले प्राधान्य दिले जाते, पण जर हा महत्त्वाचा खेळाडू आयपीएलमधील संघाला हवा असल्यास त्यांना एक लाख  ५० हजार डॉलर्स स्थानिक संघाला द्यावे लागतील,’’ असे आयोजकांनी सांगितले.
त्यामुळे आयपीएलमधील संघांनी ही रक्कम भरून काही नावाजलेल्या खेळाडूंना आपल्या संघात घेतले आहे. कॅलिस कोलकाता नाइट रायडर्ससाठी, तर पोलार्ड, कोरे अँडरसन आणि लसिथ मलिंगा मुंबई इंडियन्ससाठी खेळणार आहेत. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार जॉर्ज बेली या वेळी किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडून खेळणार आहे. संघाच्या ढाच्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. स्पर्धेची सुरुवात पात्रता फेरीने होणार आहे. साखळी फेरी १७ ते ४ ऑक्टोबर दरम्यान रंगणार असून एकूण २९ सामने खेळविण्यात येणार आहेत.

स्पर्धेतील गट
‘अ’ गट : कोलकाता नाइट रायडर्स, डॉल्फिन्स, पर्थ स्कॉर्चस, चेन्नई सुपर किंग्ज, पात्रता फेरीतील संघ.
‘ब’ गट : किंग्ज इलेव्हन पंजाब, केप कोब्रास, होबार्ट हुरिकॅन्स, बार्बाडोस ट्रायडेंट्स, पात्रता फेरीतील संघ : पात्रता फेरीतील संघ : मुंबई इंडियन्स, लाहोर लायन्स, नॉर्दर्न नाइट्स आणि साऊर्दन एक्स्प्रेस.

व्हेटोरी खेळणार
वेलिंग्टन : पुढील महिन्यात भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स लीग ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेत न्यूझीलंडचा माजी कर्णधार डॅनियल व्हेटोरी नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट प्रोव्हिन्से संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. ३५ वर्षीय व्हेटोरीच्या जमैकाच्या संघाचे कॅरेबियन प्रीमियर लीगमधील आव्हान संपुष्टात आले आहे. त्यामुळे तो या संघाकडून खेळणार आहे.  नॉर्दर्न डिस्ट्रिक्टचा संघ अद्याप निश्चित झाला नसला तरी स्कॉट स्टायरिस, केन विल्यम्सन, टिम साऊदी, ट्रेंट बोल्ट, बी जे वॉटलिंग आणि डॅनियल फ्लिन यांचा समावेश होण्याची दाट शक्यता आहे.