रशियाचे विघटन झाल्याने आता साम्यवादी आणि भांडवलशाही राष्ट्रांमधील शीतयुद्ध संपले असले तरी मध्यपूर्व भागातील अरब-इस्लामिक राष्ट्रे विरुद्ध पाश्चिमात्य जग असा नवा संघर्ष निर्माण झाला आहे. ११ सप्टेंबर २००१ रोजी अल-कायदा या दहशतवादी संघटनेने अमेरिकेतील प्रमुख व्यापारी केंद्र असलेले ट्विन टॉवर्स उडवून एका नव्या युद्धाला आमंत्रण दिले. अमेरिकेने मग आखाती देशांमध्ये फोफावलेल्या दहशतवादाविरुद्ध आघाडी उघडली. इराकच्या सद्दाम हुसेन याची सत्ता उलथवून त्याला मृत्युदंड दिला. अल-कायदा संस्थेचा म्होरक्या ओसामा बिन लादेन याचा पाकिस्तानमधील गुप्त अड्डा हुडकून त्याला ठार केले. २१ व्या शतकाच्या पहिल्या दशकापासून सातत्याने युद्धजन्य परिस्थितीला तोंड देत असलेल्या अरबी प्रदेशातील अनेक देशांमध्ये दुसऱ्या दशकात विद्यमान जुलमी राजवटींविरुद्ध उठाव झाले. एखाद्या क्षुल्लक कारणाने ठिणगी पडली आणि क्रांतीचा भडका उडाला, असे अनेक देशांमध्ये घडले. जगासमोर आपली भूमिका मांडण्यासाठी आंदोलकांनी मोठय़ा प्रमाणात सोशल मीडियाचा वापर केला. त्यामुळे ‘फेसबुक क्रांती’ म्हणूनही या उठावांची संभावना केली गेली. अरब जगतातील या उठावांच्या निमित्ताने मध्य-पूर्व भागातील देशांमध्ये सुरू असलेल्या घडामोडींचा चौफेर आढावा घेण्याचा प्रयत्न म्हणजे ज. द. जोगळेकर यांचे ‘युग-परिवर्तनाच्या उंबरठय़ावरचे अरब जग’ हे नवे पुस्तक.
पुस्तकाच्या पहिल्या विभागात टय़ुनिशिया, इजिप्त, बाहरिन, येमेन, सीरिया आणि लिबिया या देशांमधील उठावांची थोडक्यात माहिती देण्यात आली आहे. दुसऱ्या विभागात मध्य-पूर्वेतील घडामोडींविषयी अतिशय उपयुक्त टिपण्णी करणाऱ्या काही ग्रंथांचा परिचय आहे. ‘द क्रायसिस ऑफ इस्लामिक सिव्हिलायझेशन’, ‘फ्रॉम फतवा टु जिहाद’, ‘द कमिंग रेव्होल्यूशन’,  ‘द सर्च फॉर अल-कायदा’ आदी पुस्तकांचा त्यात समावेश आहे. तिसऱ्या विभागात मध्य-पूर्वेत सध्या नेमके कोणते वैचारिक वारे वाहत आहेत, याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे. त्या- त्या वेळी ‘द न्यूयॉर्क टाइम्स’, ‘द वॉल स्ट्रीट जर्नल आदी अमेरिकन नियतकालिकांमध्ये आलेली वार्तापत्रे तसेच लेखांचा आधार घेत अरेबियन प्रदेशातील खळबळीचे शब्दचित्र रेखाटण्यात आले आहे. मध्य-पूर्वेतील राजकीय तज्ज्ञ ब्रुस रिडेल त्यांच्या ‘द सर्च ऑफ अल-कायदा’ या पुस्तकात तालिबानी आणि अल-कायदासारख्या संघटनांचा समूळ नायनाट करण्यासाठी पॅलेस्टीन आणि काश्मीरचा प्रश्न सोडवावा लागेल, असे मत मांडतात. पुस्तकात ठिकठिकाणी असे दाखले दिलेले आढळतात.
आपल्या देशाला जसा बांगलादेशामधून येणाऱ्या निर्वासितांचा प्रश्न भेडसावतो, तीच समस्या सध्या युरोपपुढे आहे. कारण मध्य-पूर्वेतील इस्लामी लोक मोठय़ा संख्येने अनधिकृतरीत्या युरोपमध्ये प्रवेश करीत आहेत. तुर्कस्थानमार्गे येणाऱ्या या लोंढय़ांना कसे रोखायचे, हा युरोपीय समुदायापुढे मोठा प्रश्न आहे. तसेच एकेकाळी समृद्धीचे कारण ठरलेली बहुसांस्कृतिक व्यवस्थाच (मल्टिकल्चररॅलिझम) अप्रत्यक्षरीत्या दहशतवादास पोषक ठरत असल्याचे दिसून आल्याने आता युरोप वेगळी वाट चोखाळताना दिसत आहे. पाश्चात्त्य जगात कामानिमित्त राहायचे असेल तर तेथील रीतिरिवाज पाळावे लागतील, असे आता युरोपीयन शासन यंत्रणा परदशी कारागीर तसेच तंत्रज्ञांना बजावू लागली आहे.   
एकीकडे अरबी देशांमध्ये क्रांतीचे वारे वाहत असताना या प्रदेशातील संपन्न राष्ट्र असा लौकिक असणारे सौदी अरेबिया मात्र या सुधारणावादी उठावांपासून अलिप्त राहिले. या श्रीमंत देशाने पैशाच्या जोरावर देशात शांतता आणि सुव्यवस्था कायम राखली असली तरी जगातील नागरिकांना मिळणारे मूलभूत अधिकार आपल्यालाही मिळावेत, अशी मागणी आता सौदी जनता करू लागली आहे. र्निबधांच्या सोनेरी पिंजऱ्यात राहण्याऐवजी त्यांना आता स्वातंत्र्याचा आनंद घ्यायचा आहे. मतदानाच्या हक्कापासून अद्यापि वंचित असलेल्या सौदीतील महिलांनी आता वाहन चालविण्याचा परवाना मिळविण्यासाठी आंदोलन सुरू केलेले आहे. अशा रीतीने आधुनिक जगाला तेलरूपी इंधन पुरविणाऱ्या अरबी प्रदेशात गेल्या पाच-दहा वर्षांपासून घडत असलेल्या घडामोडींची त्रोटक स्वरूपातली माहिती या पुस्तकातून मिळते.
‘युग परिवर्तनाच्या उंबरठय़ावरचे अरब जग’ – ज. द. जोगळेकर,
 नवचैतन्य प्रकाशन, मुंबई.  
पृष्ठे- १७६, मूल्य- १८० रुपये.