‘रोल्स रॉइस’च्या क्रमांकासाठी मुकेश अंबानींचा दौलतजादा; अंकज्योतिषाच्या सल्ल्यानुसार क्रमांक मिळवण्यासाठी २४ लाख खर्च
दारासमोर एक गाडी असावी, असं प्रत्येक मध्यमवर्गीयाचं स्वप्न असतं. अगदीच नाही तर किमान लाखाची ‘नॅनो’तरी घरी यावी, यासाठी आयुष्यभराच्या कमाईनिशी त्याची जुळवाजुळव सुरू असते. पण गर्भश्रीमंतांसाठी लाख-दोन लाख म्हणजे फुटकळ चिल्लर. त्यामुळेच जेवढय़ा पैशांत किमान २० मध्यमवर्गीयांचे गाडीचे स्वप्न पूर्ण होऊ शकते, तेवढे पैसे खर्च करून अब्जाधीश उद्योगपती मुकेश अंबानी यांनी आपल्या नव्या ‘रोल्स रॉइस’ गाडीसाठी क्रमांक मिळवला. उद्योगजगतातील आपला अव्वल क्रमांक गाडीवरही झळकावा म्हणून मुकेशभाईंनी १२ लाख रुपये भरून ‘००१’ असा क्रमांक गाडीला मिळवला. मात्र त्यांच्या ‘राजज्योतिषा’ने हा क्रमांक अशुभ असल्याचे सांगताच या क्रमांकापुढे आणखी एक ‘शून्य’ जोडण्यासाठी परत १२ लाख मोजले!
जगातील गर्भश्रीमंताच्या यादीतील हमखास भारतीय असलेल्या मुकेश अंबानी यांच्या साडेचार कोटी रुपयांच्या ‘रोल्स रॉइस’साठी हा ‘अंक’प्रपंच झाल्याची माहिती ताडदेव येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाने दिली. ‘रोल्स रॉइस’ खरेदी करण्याचे अंबानींचे स्वप्न अलीकडेच पूर्ण झाले. त्या गाडीची नोंदणी १६ एप्रिल रोजी ताडदेव येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात करण्यात आली. त्या वेळी १२ लाख रुपये खर्च करून या गाडीसाठी ००१ हा क्रमांक घेण्यात आला होता. मात्र ज्योतिषांनी हा क्रमांक फायदेशीर ठरणार नसल्याचे सांगितल्यावर अंबानी यांनी दुसऱ्या क्रमांकासाठी प्रयत्न केले. त्यानुसार त्यांना ०००१ हा क्रमांक मिळालादेखील, पण त्यासाठी त्यांना आणखी १२ लाख रुपये खर्च करावे लागले. अशा प्रकारे अंबानींना गाडीच्या क्रमांकासाठी २४ लाख रुपये भरावे लागले.
‘०००१’ हा क्रमांक अंबानींसाठी कितपत फायदेशीर हे अद्याप उघड व्हायचे आहे. मात्र अंकज्योतिषाच्या सल्ल्याचा प्रादेशिक परिवहन कार्यालयाला मात्र फायदा झाला आहे. परिवहन कार्यालयांच्या नियमानुसार आवडीचा क्रमांक घेण्यासाठी ऑनलाइन पद्धत सुरू करण्यात आली आहे. उपलब्ध व्हीआयपी क्रमांकांची किंमतही ठरवण्यात आली असून त्यासाठी सात हजार रुपयांपासून पुढे १२ लाख रुपयांपर्यंतचे शुल्क भरावे लागते. गेल्या वर्षभरात एकटय़ा ताडदेव विभागाने ३४९७८ वाहनांद्वारे या व्हीआयपी क्रमांकांच्या नोंदणीपोटी २५.२८ लाख रुपये उत्पन्न मिळवल्याची माहिती ताडदेव कार्यालयातील सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे यंदा मुकेश अंबानींच्या एकाच गाडीसाठी दोन वेळा रक्कम भरावी लागल्याने यंदा विशेष क्रमांकातून गोळा होणाऱ्या महसुलाची सुरुवात चांगली झाल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले.