वाडय़ावर चाहत्यांची गर्दी

नितीन गडकरी आगे बढो.. देश का नेता कैसा हो, नितीन गडकरी जैसा हो.. भारत माता की जय अशा घोषणा देत ढोल-ताशांच्या निनादात भाजपच्या कार्यकर्त्यांंनी ६१ किलोचा केक कापून नितीन गडकरी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा केला. महालातील गडकरी वाडय़ाच्या अवती भोवती लागलेले मोठमोठे शुभेच्छा देणारे फलक, वाडय़ात करण्यात आलेली आकर्षक सजावट, सकाळपासून विविध क्षेत्रातील मान्यवर, कार्यकर्ते आणि त्यांच्या चाहत्यांची शुभेच्छा देण्यासाठी उसळलेली गर्दी बघता उत्साहाचे वातावरण होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध मान्यवरांनी वाडय़ावर जाऊन गडकरी यांना शुभेच्छा दिल्या.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना एकसष्ठीनिमित्त शुभेच्छा देण्यासाठी महालातील वाडय़ावर सकाळपासून चाहत्याची गर्दी सुरू झाली होती. सकाळी कांचन गडकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी ६१ दिवे लावून नितीन गडकरी यांना औक्षवण केल्यानंतर त्यांनी उपस्थित असलेल्या ज्येष्ठाचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट आणि आसामचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी सर्वप्रथम वाडय़ावर येऊन गडकरी यांना शुभेच्छा देऊन त्यांचे अभीष्टचिंतन केले. त्यानंतर शुभेच्छा स्वीकारण्यासाठी लोकांनी वाडय़ावर एकच गर्दी केली. कोणी पुष्पगुच्छ देत तर कोणी भेट वस्तू देत नितीन गडकरी यांना शुभेच्छा देण्यासाठी विविध राजकीय पक्षातील मान्यवरांसह भाजपचे विविध जिल्ह्य़ातील पदाधिकारी, कार्यकर्ते, उद्योजक यांची वाडय़ावर सकाळपासून रीघ लागली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, राज्याचे कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर, उत्तरप्रदेशचे कृषीमंत्री सूर्यप्रताप शाही, खासदार विनय सहस्रबुद्धे, खासदार डॉ. विकास महात्मे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, गृहराज्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते दीपक केसरकर, संजय राठोड, सुनील देशमुख, संजय पोटे, आमदार जोगेंद्र कवाडे या मान्यवरांसह काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गेव्ह आवारी, माजी मंत्री अनिस अहमद, महापालिकेतील विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे,

किशोर जिचकार, महापौर नंदा जिचकार, आमदार अनिल सोले, आमदार कृष्णा खोपडे, खासदार अजय संचेती, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ. सुधाकरराव देशमुख, आ. विकास कुंभारे, सुधीर पारवे, विजय घोडमारे, जयकुमार वर्मा, अशोक मानकर, अरुण लखानी, रवी बोरटकर, जिल्हा परिषद अध्यक्ष निता सावरकर, उमहापौर दीपराज पार्डीकर, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, दयाशंकर तिवारी, प्रवीण दटके, बळवंतराव ढोबळे यांच्यासह उद्योजक, नगरसेवक पूर्तीमधील अधिकारी, कर्मचारी, परिसरातील नागरिक, व्यापारी आणि मोमीनपुरातील मुस्लिम बांधव मोठय़ा प्रमाणात शुभेच्छा देण्यासाठी वाडय़ावर आले होते.

माजी महापौर प्रवीण दटके यांच्या नेतृत्वाखाली मध्य नागपुरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ६१ किलोचा केक आणला होता. रेशीमबागेतील कावरे क्रिकेट क्लबचे शंभर विद्यार्थी आणि पंचवटी वृद्धाश्रमातील महिला नितीन गडकरी यांना शुभेच्छा देण्यासाठी वाडय़ावर आले होते.