उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर बहुचर्चित सिंचन घोटाळा प्रकरणाच्या तपासाला गती आली आहे. नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने घोडाझरी सिंचन प्रकल्पाच्या कालवा बांधकामात मोठा गैरव्यवहार झाला असल्याचा ठपका ठेऊन कंत्राटदार कंपनी आणि विदर्भ सिंचन विकास महामंडळाचे (व्हीआयडीसी) अभियंते, अशा सात जणांविरुद्ध सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सिंचन घोटाळा प्रकरणात विदर्भातील हा पहिला गुन्हा आहे.

२००६ मध्ये जलसंपदा विभागाने चंद्रपूर जिल्ह्य़ातील घोडाझरी सिंचन प्रकल्पाच्या ४२.६० ते ८८.०० कि.मी. कालवा बांधकामासाठी निविदा मागविल्या होत्या. या प्रक्रियेत तीन कंपन्यांनी भाग घेतल्याचे दाखवून व्हीआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी एफ.ए. कन्स्ट्रक्शन कंपनीला कामाचे कंत्राट देऊन लाभ पोहोचविला, असे खुल्या चौकशीत उघड झाले. त्यामुळे व्हीआयडीसीचे सेवानिवृत्त मुख्य अभियंता सोपान रामराव सूर्यवंशी (६५,रा. सहकारनगर, उस्मानपुरा, औरंगाबाद), सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता रमेश दौलतराव वर्धने (५८, रा. कपील अपार्टमेंट, कॅनाल रोड, नागपूर), एफ. कन्स्ट्रक्शन कंपनीचा संचालक फतेह मोहम्मद अब्दुल्ला खत्री, निसार फतेह खत्री, जैतून मोहंमद फतेह खत्री, अबीद फतेह खत्री आणि जाहीद फतेह खत्री या सात जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.