हार्बरवर रुळांनजीक संरक्षक भिंती न बांधल्याने अपघात

हार्बर आणि ट्रान्स हार्बर रेल्वेच्या रुळांलगत संरक्षक भिंती बांधण्यात न आल्याने जीव धोक्यात घालून रूळ ओलांडणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे अपघातांच्या घटना घडत असल्याचे निदर्शनास आले आहे. नवी मुंबईत रेल्वे रूळ ओलांडताना सर्वाधिक अपघात होत असतात. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वेने सोयीसुविधा पुरविण्यासाठी काय पुढाकार घेतला आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. गेल्या वर्षभरात दोन्ही मार्गावर चार हजार ५०० जणांचा अपघातात मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

हार्बर मार्गावर वाशी रेल्वे स्थानकाजवळ आजवर १८२ जणांचा बळी गेला आहे. यात १२२ जणांचा रूळ ओलांडताना मृत्यू झाला आहे. यातील ५८ जण लोकलमधून पडून मरण पावले आहेत. अपघातांत १२८ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये १०२ पुरुष, तर २६ महिला आहेत. २०१५ मध्ये एकूण १९२ मृत्युमुखी, तर १५७ जखमी झाले आहेत. रूळ ओलांडताना १०९ मृत, तर २५ जखमी झाले होते. यात सर्वाधिक प्रवासी हे रूळ ओलांडताना मरण पावले आहेत. रुळांनजीक संरक्षक भिंती उभारल्यास हे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असे रेल्वे सुरक्षा पोलिसांनी स्पष्ट केले.   मुंबई उच्च न्यायालयाने २००२ मध्ये रेल्वे स्थानकांलगत संरक्षक भिंती बांधण्याचे आदेश रेल्वेला दिले होते; मात्र आजतागायत या आदेशाची अंमलबजावणी झालेली नाही, असे वाशी रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद ढावरे यांनी सांगितले.

रूळ ओलांडताना होणारे अपघात रोखण्यासाठी मध्य रेल्वेने एकूण १९ हजार मीटरची सुरक्षा भिंत बांधण्यासाठी सुमारे १४ कोटी रुपयांचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठविला होता; परंतु हा प्रस्तावच फेटाळून लावण्यात आल्याने प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर सोडण्यात आली आहे.

१४ कोटी रुपयांचा प्रस्ताव फेटाळला

२०१६-१७ या आर्थिक वर्षांसाठी छत्रपती शिवाजी टर्मिनस ते कल्याण दरम्यान २४०० मीटर, कल्याण ते कर्जतदरम्यान १३०० मीटर, कल्याण ते कसारा दरम्यान ३३०० मीटर, पनवेल ते वसई दरम्यान १६०० मीटर, सानपाडा ते ऐरोली दरम्यान १५०० मीटर आणि वाशी ते पनवेल दरम्यान ९४५० मीटरची संरक्षक भिंत बांधण्याची योजना आहे. या एकूण १९ हजार ५५० मीटर लांबीच्या संरक्षक भिंतीसाठी १३.९६ कोटींचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे मध्य रेल्वेने पाठविला आहे; मात्र आर्थिक सल्लागार आणि मुख्य लेखापालांनी रेल्वेचा हा प्रस्ताव फेटाळून लावला आहे.