भूर्ज वृक्षाची साल म्हणजेच भूर्जपत्रावर कोरलेले आणि युनेस्कोच्या ‘वर्ल्ड रजिस्टर’ मध्ये नोंद झालेले ऋग्वेदाचे हस्तलिखित.. इ. स. ९०६ मधील ताडपत्रावर लिहिलेला ‘उपमिती-भव-प्रपंच-कथा’ हे जैन हस्तलिखित, १३२० मधील ‘चिकित्सा सार संग्रह’ हा आयुर्वेदाचा ग्रंथ.. १६४८ मधील भागवत पुराणाची सचित्र पोथी.. ‘हिस्ट्री ऑफ धर्मशास्त्र’ हा भारतरत्न डॉ. पां. वा. काणे यांनी लिहिलेला ग्रंथ.. नस्त अलिक लिपीतील फारसी भाषेतील सचित्र शाहनामा.. विश्वरचनेचा जैन नकाशा.. सचित्र शिवलीलामृत.. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेतील दुर्मिळ हस्तलिखिते आणि पोथ्यांचा हा खजिना शनिवारी अभ्यासकांसाठी खुला झाला.
भांडारकर संस्थेतर्फे आयोजित दुर्मिळ हस्तलिखिते आणि संस्थेच्या प्रकाशनांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन सिम्बायोसिसचे अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या हस्ते झाले. संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. नंदू फडके व इतर उपस्थित होते. रविवारी (९ फेब्रुवारी) सकाळी दहा ते रात्री आठ या वेळात हे प्रदर्शन खुले राहणार आहे.
संस्कृत, प्राकृत, फारसी, उर्दू, अरबी, चिनी, तिबेटी आणि मराठी या भाषा त्याचप्रमाणे देवनागरी, शारदा, उडिया, कन्नड, नस्त अलीक, आवेस्ता, चिनी आणि तिबेटी या लिपींमधील ग्रंथ या प्रदर्शनात ठेवण्यात आले आहेत. जैन धर्मातील पर्यूषण पर्वाविषयी माहिती देणारा ‘पर्यूषणा-क्लसूत्र’ हा सचित्र गं्रथ, जगभरातील वेदाभ्यासाची डॉ. रा. ना. दांडेकर यांनी केलेली ‘वेदिक बिब्लिओग्राफी’ ही सूची, प्राकृत-इंग्रजी शब्दकोश पाहण्यासाठी उपलब्ध आहे.