रोकड काढण्यासाठी दररोज शहराकडे धाव

नोटाबंदीच्या निर्णयाला तीन आठवडे लोटत आले तरी, चलनतुटवडय़ाचे चटके नागरिकांना सोसावे लागत आहे. शहरी भागातील बँकांसमोर एकीकडे नागरिकांच्या रांगा लागत असताना, ग्रामीण भागात तर बँकांमध्ये पैसेच नसल्याने तेथील नागरिकांना पैशांसाठी दाहीदिशा फिरावे लागत आहे. भिवंडी परिसरातील ८० टक्के एटीएम गेल्या दोन आठवडय़ांपासून बंद असल्याने तेथील नागरिकांनी आता रोकड काढण्यासाठी कल्याण, ठाणे या शहरांकडे धाव घेण्यास सुरुवात केली आहे. भिवंडी, कोन, पिपळास यासारख्या गावांमधून कल्याणला केवळ पैसे काढण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची गर्दी दिसू लागली आहे.

केंद्र सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेऊन आता महिना होत आला आहे. नोकरदारांचे पगारही बँकांच्या खात्यात जमा झाले आहेत. शिवाय ज्येष्ठ नागरिकांची निवृत्तिवेतनाची प्रतीक्षा संपली आहे. खात्यात पैसे आहेत परंतु दैनंदिन वापरासाठी ते हवे तेव्हा काढता येत नाहीत अशी परिस्थिती मुंबई, ठाण्यासारख्या मोठय़ा शहरांमध्येही पाहायला मिळत आहे. केंद्र सरकारने आठवडय़ाला खात्यातून २४ हजार रुपये काढता येतील, असे फर्मान जाहीर केले असले तरी अनेक बँकांकडे पुरेसे चलन उपलब्ध नसल्याने दिवसाला दोन ते अडीच हजार रुपये मिळाले तरी खूप अशी काही ठिकाणची परिस्थिती आहे. ठाणे, डोंबिवलीसारख्या शहरी भागातील बँका तसेच एटीएमबाहेर अजूनही ग्राहकांच्या रांगा कायम असल्याचे चित्र असताना ग्रामीण भागातील ग्राहक आता पैसे काढण्यासाठी शहरांच्या दिशेने निघाल्याचे चित्र आहे.

कल्याणच्या आसपास असलेल चिंचपाडा, घेसर, बापगाव, कोण, पिपळास आदी भागांमधील तसेच भिवंडीसारख्या शहरातील अनेक एटीएम पैसे नसल्याने बंद आहेत. काही एटीएममध्ये दोन हजार रुपयांच्या नोटा मिळण्याचे सॉफ्टवेअर उपलब्ध नसल्याने नोटाबंदीचा निर्णय झाल्यापासून ते बंद असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. स्मार्ट सिटीचा गवगवा करत विकासाच्या मार्गावर आरूढ झाल्याचे चित्र भिवंडी परिसरात उभे केले जात असले तरी गेल्या २१ दिवसांपासून या शहरातील अगदी हाताच्या बोटांवर मोजता येतील इतकेच एटीएम सुरू आहेत. त्यामुळे पगाराच्या काही दिवस आधीपासूनच भिवंडीकरांनी एटीएममधून पैसे काढण्यासाठी कल्याणची वाट धरल्याचे चित्र दिसू लागले आहे. कल्याणमधील अनेक एटीएममध्ये एकदा रोख रक्कम आणून भरली जाते. तेव्हा भिवंडीतील नागरिक एटीएमच्या दारात रांग लावत आहेत.

दुप्पट पैसे काढण्याची नवी क्लृप्ती

पैसे काढण्यासाठी वारंवार कल्याण शहर गाठणे शक्य नसल्याने काही भिवंडीकर रात्रीच्या अकराच्या सुमारास कल्याण गाठतात. एकदा पैसे काढून झाले की पुन्हा रांगेत उभे राहतात. एखाद्याचा क्रमांक आलाच तर मागच्या पुढे करत पुन्हा मागे उभे राहतात. रात्री बाराचा ठोका पडताच पुन्हा एकदा एटीएममध्ये प्रवेश करून दुसऱ्यांदा पैसे काढतात आणि घरचा रस्ता गाठतात. काही जण स्वत:सोबत आणखी दोघा तिघांची कार्डे घेऊन पैसे काढत आहेत. त्यामुळे एटीएमबाहेरील रांग आणि पैसे काढण्याचा सरासरी वेळ वाढू लागला आहे.

नारपोली परिसरात आम्ही राहतो परंतु तेथील एटीएम बंद असल्याने एटीएमच्या शोधात आम्हाला कल्याणपर्यंत यावे लागत आहे. नारपोली भिवंडीच्या तुलनेत या भागातील एटीएम बऱ्यापैकी सुरू असतात. त्यामुळे काही मैल प्रवास करून येथे येणे त्रासाचे असले तरी पैशासाठी ते सोयीचे ठरते.

सुनील भोईर, भिवंडीकर