नोटाबंदीचा निर्णय जाहिर झाल्यानंतर जुन्या पाचशे आणि हजाराच्या नोटा चलनातून बाद होऊन नव्या पाचशे आणि दोन हजारांच्या नोटा आल्या. या नोटा आल्यानंतर त्याबाबत अनेक तक्रारी समोर आल्यात. पहिल्याच आठवड्यात या नवीन नोटांचे रंग जात असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या. तेव्हा रंग जात असलेल्या नोटा या ख-या नोटा असल्याचे रिझर्व्ह बँकेने सांगितले होते. तर काही दिवसांपूर्वी मध्यप्रदेशातील हेमंत सोनी नावाच्या व्यक्तीला एक बाजू पूर्णपणे कोरी असलेल्या पाचशे रुपयाच्या नोटा मिळाल्या होत्या. अशातच एका ट्विटर अकाऊंटवरून अपलोड केलेल्या पाचशे रुपयाच्या नोटेचा एक फोटो व्हायरल होत आहे.

Viral Video: दोन हजाराच्या नोटांचा सोशल मीडियावर रंगला खेळ!

या व्यक्तीच्या पँटमध्ये असलेली पाचशेची नोट कपड्यांसोबत चुकून वॉशिंग मशीनमध्ये गेली जेव्हा त्याने ही नोट पाहिली तेव्हा तिचा रंग पूर्णपणे गेला होता. जुन्या पाचशेच्या नोटेसोबत असे क्विचितच पाहायला मिळाले होते. त्यामुळे ही नोट आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रवी हंडा यांच्या ट्विटर अकाऊंटवरून रंग गेलेल्या पाचशे रुपयाचा फोटो शेअर करण्यात आला. ‘आपले कपडे धुण्यास टाकण्यापूर्वी आधी कपड्यांचे खिसे नीट तापासून पाहा. नवीन नोट चुकून जर वॉशिंग मशीनमध्ये गेली तर ती टिकू शकणार नाही’ असे ट्विट करत त्याने या नोटेचा फोटो शेअर केला आहे.

वाचा : व्यावसायिकाकडे सापडलेल्या १३ कोटींच्या काळा पैशामागचे हे आहे सत्य

५०० रुपयांच्या नोटेबाबत तक्रार असणारी ही काही पहिला घटना नाही. काही दिवसांपूर्वी मध्यप्रदेशमधील शेतक-याला गांधीजींचा फोटो नसलेली नोट मिळाली होती. तर गेल्याच आठवड्यात मध्यप्रदेशातील हेमंत सोनी यांना एक बाजू पूर्णपणे कोरी असलेल्या पाचशे रुपयाच्या तीन नोटा मिळाल्या होत्या. नोटांबदीच्या निर्णयानंतर देशात चलन तुटवडा जाणवू नये यासाठी भारतीय रिझर्व्ह बॅंकेच्या छापखान्यांमध्ये ५०० आणि २,००० च्या नोटा छापण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले. सुरुवातीला हे काम दोन शिफ्टमध्ये सुरू असे नंतर ते ३ शिफ्टमध्ये होऊ लागले होते. त्यामुळेच गडबडीत ५०० च्या काही नोटा एका बाजूने कोऱ्या निघाल्या असल्याचे सांगितले.