या बंगल्यात डॉ. आंबेडकरांचे सन १९४९ ते १९५४ या काळात येऊन-जाऊन वास्तव्य होते. येथील मुक्कामात बाबासाहेब ज्ञानसाधना करत, राजकीय, सामाजिक, चळवळीना दिशा देणारे विषय ठरवत. बंगल्यात भेटीला येणाऱ्या पाहुण्यांना ते एकतरी झाड लावण्यास सांगत. अनेक वेळा ते स्वत: कुदळ, फावडा घेऊन रोपटी लावत असत.

मावळ परिसरातील तळेगाव दाभाडे या गावाला अनेक वर्षांपासूनचा इतिहास आहे. या भागात सरसेनापती खंडेराव दाभाडे, उमाबाई दाभाडे यांच्यासारखे वीर, गो. नी. दांडेकरांसारखे साहित्यिक, लेखिका वसुधा माने, लोककवी मनमोहन नातू यांचे अनेक वर्ष वास्तव्य होते. याच बरोबर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे या गावात अनेक वर्षे वास्तव्य असल्याची साक्ष त्यांचा दिमाखदार बंगला आजही देत आहे. ही वास्तू म्हणजे महाराष्ट्राचंच नव्हे तर साऱ्या देशवासीयांचं श्रद्धास्थान आहे.
तळेगाव दाभाडे येथील हरणेश्वर टेकडीच्या पायथ्याशी तळेगाव चाकण रोडवरील अल्टीनो कॉलनीत एकूण ६५ एकर जागेवर सर्वे क्र. ७०० ते ७०४ वरील जागेतील बंगला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २६ नोव्हेंबर १९४८ रोजी रु. १६,०००/- किमतीस खरेदी केला. हा बंगला पूर्वी क्लीमेंट बरुख ऑफीक या पारसी गृहस्थाच्या मालकीचा होता. तसेच वडगाव-कातनी या गावाच्या हद्दीतील थेळवंडे नावाच्या शेतकऱ्याची २२ एकर जमिन- सर्वे क्र. ५०१ बाबासाहेबांनी रु. ८०००/- किमतीस विकत घेतली. ही जागा तळेगाव येथील लिंबाजी अमृत गायकवाड यांनी मिळवण्यासाठी बाबासाहेबांना मदत केली. या परिसराचं बाबासाहेबांना मोठंआकर्षण होतं. मावळचा निसर्गरम्य परिसर, हिरवी वनराई, सह्य़ाद्रीच्या उत्तुंग गिरी-शिखरांच्या रांगा व या गिरीशिखरांच्या कणखर कातळात बुद्धपर्वातल्या कार्ले, भाजे, बेडसे यांसारख्या अलौकिक शिल्पांच्या लेण्या, बुद्ध-धम्म् संघाच्या वंदनेचे निर्मळ आनंददायी सूर अशा विलक्षण चेतनेने भरलेला असा हा परिसर. या भूमीत बुद्ध-धम्म संघाचं अधिष्ठान पुन्हा एकदा रुजवता येईल व त्यासाठी शैक्षणिक आणि धार्मिक बीज पेरण्यासाठी तळेगावची ही भूमी अनुरुप आहे, अशी डॉ. आंबेडकरांची धारणा होती. त्यामुळे त्यांनी या परिसराची निवड केली.
या बंगल्याच्या सभोवती तारेचे कुंपण असून, बंगल्याभोवती आंबा, गुलमोहर, पेरू, सीताफळ ही झाडं तसेच शोभेची फुलझाडं, जमिनीवर हिरवळ, बंगल्याला ऐसपैस व्हरांडा, दरवाजा रस्त्याच्या बाजूला, बंगल्यात लाकडाची कलाकुसर, आतला प्रशस्त हॉल, दोन्ही हॉलच्या बाजूला दोन मोठय़ा खोल्या, हॉलला लागून स्वयंपाक घर, त्या जवळ स्नानगृह, स्वच्छतागृह, प्रत्येक खोलीतील भिंतीत सागवानी लाकडाची कपाटं, आपणास बंगल्यात पहावयास मिळतात. पूर्वी बंगल्याचे प्रवेशदार पुढील बाजूला होते. पण कालांतराने मागील बाजूला केले आहे. मोठे अंगण, अंगणात एका बाजूला विहीर असून अंगणात डॉ. आंबेडकर व माता रमाई यांचे प्लास्टरचे दोन पुतळे आहेत. डाव्याबाजूच्या एका खोलीत गौतमबुद्धांची मोठी साडेचार फुट उंच धातूची मूर्ती ठेवली असून, तेथील भिंतीवर बुद्धाची व बाबासाहेबांची मोठी तसबीर लावली आहे. डॉ. आंबेडकरांच्या जीवनातील विविध प्रसंगांची अनेक छायाचित्रे बंगल्यात सर्व खोल्यांत लावली आहेत. यात महत्त्वाची म्हणजे पुणेकरार, बाबासाहेब कायदामंत्रीपदाची शपथ घेताना, भारताचे संविधान राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्याकडून स्वीकारताना अशी विविध छायाचित्रे आहेत. तसेच हॉलमध्ये एका मोठय़ा टेबलावर साधारण चार-साडेचार फूट लांबी-रुंदी असलेली नागपूर येथील दिक्षाभूमीची लाकडी प्रतिकृती आपणास दिसते. या प्रतिकृतीच्या समोरील भिंतीवर सम्राट अशोकाचेही छायाचित्र लावले आहे.
या बंगल्यात डॉ. आंबेडकरांचे सन १९४९ ते १९५४ या काळात येऊन-जाऊन वास्तव्य होते. येथील मुक्कामात बाबासाहेब ज्ञानसाधना करत, राजकीय, सामाजिक, चळवळीना दिशा देणारे विषय ठरवत. बंगल्यात भेटीला येणाऱ्या पाहुण्यांना ते एकतरी झाड लावण्यास सांगत. अनेक वेळा ते स्वत: कुदळ, फावडा घेऊन रोपटी लावत असत. या बंगल्याची देखभाल करणारे लिंबाजींचे पुत्र दत्तोबा यांना बरोबर घेऊन साऱ्या परिसरात फिरणे, लिंबाजींच्या पत्नी काशिबाई यांच्या हातचे पिठल भाकरी, वांग्याचं भरीत, डाळीची आमटी, बोंबीलाची चटणी हे त्यांच्या आवडीचे जेवण जेवणे व बरोबर आणलेली पुस्तके वाचता-वाचता थोडी विश्रांती घेणे असा त्यांचा दिनक्रम असे. इथे असताना ते सोबतच्या सहकाऱ्यांना सांगत, ‘मंडळी, जगात साऱ्या प्रकारच्या क्रांत्या होत राहतील, धार्मिक क्रांती होईल, राजकीय क्राती होईल, पण मी सांगतो, की पायाभूत क्रांती फक्त शैक्षणिक क्रांतीच करू शकते. जसजसा शिक्षणाचा प्रचार होईल, तसा वर्णभेद, जातीभेद या गोष्टी कमी होतील, मला या भूमीत नेमकं हेच घडवायचं आहे.’
बाबासाहेबांचं तळेगावातील वास्तव्य जसं जनतेच प्रेरणास्थान झालं होतं, तसं कार्यकर्त्यांच्या विचारांची शाळा झाली होती. त्याचप्रमाणे मोठय़ा व्यक्तींना, विचारवंतांना निवांतपणे अनेक विषयांवर मनमोकळी चर्चा करण्याचं ठिकाण झालं होत. अशा या वास्तूला अनेकांनी भेटी दिल्या. त्यापैकी काही म्हणजे- आचार्य अत्रे, गो.नी. दांडेकर, गाडगे महाराज, पठ्ठेबापूराव, कवी-गायक राजानंद गडपायले!
१४ एप्रिल १९५१ रोजी शेडय़ुल कास्ट फेडरेशनची बैठक या बंगल्यात आयोजित करण्यात आली. योगायोगाने त्या दिवशी बाबासाहेबांचा ६०वा वाढदिवस होता. त्या दिवशी त्यांना भेटून शुभेच्छा देण्यासाठी असंख्य लोकांची रिघ बंगल्याच्या परिसरात लागली होती. तळेगावच्या भेटीत त्यांच्या सोबत माई आंबेडकरही येत असत.
२५ डिसेंबर १९५४ रोजी बाबसाहेबांनी देहू रोडच्या धम्मभूमीत बुद्धमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याचा निर्णय घेऊन धम्मचक्र प्रवर्तनाचे रणशिंग याच परिसरात फुंकले व याच परिसरात चेतवलेली समतेच्या परिवर्तनाची ज्योत दिक्षाभूमीकडे वाटचाल करीत १४ ऑक्टोबर १९५६ रोजी पेटवली.
ज्या महामानवाने आपल्या मृतप्राय समाजाला जागवण्यासाठी अनेक भाषणांच्या, स्वत:च्या स्वतंत्र वृत्तपत्रांच्या आणि सत्याग्रहांच्या माध्यमातून अखंड प्रबोधन केले, त्या युगपुरुषाच्या, क्रांतीसूर्याच्या वास्तव्याने पावन झालेल्या वास्तूचे दर्शन एकदा तरी घ्यावे. सध्या या वास्तूचा ताबा तळेगाव-दाभाडे नगरपरिषदेकडे आहे.
अमेय गुप्ते ameyagupte66@yahoo.com