दिल्लीतील वसंत विहार परिसरात बुधवारी रात्री एका महिलेवर गोळीबार करण्यात आला. ही महिला गतवर्षी एका 30 वर्षीय व्यक्तीविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली होती, या प्रकरणातील आरोपी अलिकडेच जामिनावर बाहेर होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आता त्याच आरोपीने पीडितेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांनी सांगितले की, अबूझैर सफी (३०) नावाच्या आरोपीने बुधवारी रात्री वसंत विहार येथील पूर्वी मार्ग परिसरात ऑटोरिक्षाने प्रवास करणाऱ्या पीडितेवर गोळी झाडली. सफी याच्यावर मागील वर्षी पीडित महिलेने बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. त्या प्रकरणात तो सध्या जामिनावर बाहेर होता. या हल्ल्याप्रकरणी त्याच्यासह अमन सुखला या त्याच्या साथीदारालाही अटक करण्यात आली आहे.
गोळीबाराच्या घटनेनंतर पोलिस नियंत्रण कक्षाला रात्री ९.४९ वाजता फोन आला. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना ऑटोरिक्षाचालकाने माहिती दिली की, एका महिला प्रवाशाला गोळी लागली असून तिला एम्स ट्रॉमा सेंटरमध्ये हलवण्यात आले आहे. रुग्णालयात महिलेची ओळख सफदरजंग परिसरातील रहिवासी म्हणून झाली.
महिलेवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून सध्या तिची प्रकृती स्थिर आहे. पोलिस उपायुक्त अमित गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेला शुद्धीवर आल्यावर तिने हल्ल्याची सविस्तर माहिती दिली. तिच्या म्हणण्यानुसार, ती ऑटोमध्ये फोनवर बोलत असताना, मागून काळ्या मोटारसायकलवरून दोन जण आले. त्यापैकी सफीने तिच्या छातीत गोळी झाडली.
या प्रकरणी वसंत विहार पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 307 (खूनाचा प्रयत्न), 34 (सामान्य हेतू) आणि शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिक माहितीच्या आधारे पोलिसांनी गुरुवारी अमन सुखला याला अटक केली. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली. त्यानंतर शुक्रवारी अबूझैर सफीलाही अटक करण्यात आली आणि त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल हस्तगत करण्यात आले.
पोलिस तपास सुरु असून, या प्रकरणामागे पूर्वनियोजित कटाचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. दोन्ही घटनांमधील दुवे शोधून काढण्यासाठी पोलीस अधिक तपास करत आहेत.