पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या निशाण्यावर आहेत. भारत जोडो यात्रेपासून ते संसदेपर्यंत राहुल गांधी मोदींवर टीका करत आहेत. आता राहुल यांना प्रत्युत्तर देण्यासाठी केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री स्मृती इराणी मैदानात उतरल्या आहेत. राहुल गांधीवर पलटवार करत इराणी म्हणाल्या की, राहुल यांच्यासह गांधी कुटुंब अमेठीचा विकास करू शकलं नाही. अमेठी मतदारसंघातल्या लोकांनी राहुल यांना जादू दाखवली होती.

संसदेत गौतम अदाणींवरुन पंतप्रधान मोदींना घेरण्याचा प्रयत्न करताना राहुल यांनी जादू या शब्दाचा वापर केला होता. त्यावरून आता इराणी यांनी राहुल यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

गांधी कुटुंबियांचं नाव न घेता इराणी म्हणाल्या की, “१९८१ मध्ये अमेठीमध्ये एका प्रसिद्ध संस्थेने ६२३ रुपयांच्या भाडेतत्वावर ४० एकर जमीनीवर कब्जा केला होता आणि त्या जमिनीवर वैद्यकीय सुविधा उभारण्याचं आश्वासन दिलं होतं. ३० वर्ष अमेठीतल्या लोकांना सांगितलं जात होतं की, तिथे एक वैद्यकीय महाविद्यालय सुरू केलं जाईल. परंतु ज्या जमिनीवर महाविद्यालय उभारलं जाणार होतं तिथे त्या कुटुंबाने स्वतःसाठी गेस्ट हाऊस बांधलं.”

गांधी कुटुंबांचा बालेकिल्ला असलेल्या अमेठी मतदारसंघात २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांचा पराभव झाला. स्मृती इराणी यांनी राहुल यांना त्यांच्या बालेकिल्ल्यात धूळ चारली होती. इराणी यांनी राहुल यांना त्यांच्या पराभवाची आठवण करून दिली.

हे ही वाचा >> Video: “…मग अदाणी कुणाचे मित्र झाले?” मनोहर पर्रीकरांचा जुना व्हिडीओ व्हायरल; विधानसभेतच काँग्रेसला सुनावलेलं!

“…आणि ते लोक संसदेत गरिबांबद्दल बोलत आहेत”

एका घटनेची माहिती देताना इराणी म्हणाल्या की, “त्या कुटुंबाने लोकांना एक कारखाना सुरू करण्यासाठी बोलावलं होतं, त्यासाठी जमीन घेतली. पण तो कारखाना अचानक बंद झाला. त्यानंतर त्या जमिनीवर कुटुंबाने कब्जा केला. तिथल्या शेतकऱ्यांनी त्या कुटुंबाविरोधात न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर ते न्यायालयाचा आदेश घेऊन आले. परंतु त्या आदेशाची अवज्ञा केली गेली, जमिनीचा ताबा कायम ठेवला गेला आणि मग तेच लोक संसदेत येऊन गरीबांबद्दल बोलू लागले आहेत.”