संतोष प्रधान

सत्तास्थापनेच्या अनुषंगाने चाललेल्या बैठकांत ‘अजित पवार यांचा कल भाजपकडे आहे’ अशी चर्चा होती. अजित पवार यांनी बंड करून त्यावर शिक्कामोर्तबच केले. या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर नक्कीच परिणाम होईल; कारण राजकारणात दीर्घकालीन उपायांपेक्षा सद्य:स्थितीत काय घडते, यास अधिक महत्त्व असते..

राज्य विधानसभेच्या २००४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे सर्वाधिक आमदार निवडून आले होते. साहजिकच मुख्यमंत्री पदावर राष्ट्रवादीचा दावा होता. पण पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री पद काँग्रेसकडे कायम ठेवण्यास मान्यता दिली. तेव्हाच अजित पवार यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. पक्षाने मुख्यमंत्री पदावरील दावा मागे घेऊन नुकसान करून घेतले, असे विधान अजितदादांनी केले होते. २००९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर विधिमंडळ पक्षनेते व उपमुख्यमंत्री पदावर अजितदादांनी दावा केला होता. पण शरद पवार यांनी तेव्हा छगन भुजबळ यांना संधी दिली होती. पक्षाच्या आमदारांची बैठक संपताच अजित पवार हे संतप्त होऊन निघून गेले. ही झाली दोन उदाहरणे. अगदी अलीकडेच शरद पवार यांच्या विरोधात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुन्हा दाखल करताच पवारांनी स्वत:हून ‘ईडी’ कार्यालयात जाण्याचे जाहीर करून राष्ट्रवादीने राज्यभर वातावरण तापविले होते. राष्ट्रवादीला त्याचा राजकीय फायदा झाला होता, पण त्याच दिवशी सायंकाळी अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा सादर करून खळबळ उडवून दिली. परिस्थिती आटोक्यात राहावी म्हणून शरद पवार यांना पत्रकार परिषद घ्यावी लागली आणि दुसऱ्या दिवशी पवार कुटुंबीयांची बैठक झाली.

त्याहीआधी, सिंचन घोटाळ्यात आरोप होताच अजितदादांनी तडकाफडकी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. ‘पक्षात निर्णय आपण तरुणांनी घ्यायचे असून, वरिष्ठांचा फक्त सल्ला घ्यायचा,’ असे विधान अजितदादांनी करताच ‘पक्षात सारे निर्णय मीच घेणार,’ असे शरद पवार यांनी दिलेले प्रत्युत्तर हे प्रसारमाध्यमांतून आल्यामुळे, पवार काका-पुतण्यांत आलबेल नाही, अशी अनेक वर्षे चर्चा सुरू होती. सुप्रिया सुळे यांना दिले  जात असलेले महत्त्व अजितदादांना खुपते ही कुजबुजही होती. यातच लोकसभा निवडणुकीत अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या उमेदवारीस शरद पवार यांनी आधी केलेला विरोध, नंतर उमेदवारी मिळूनही पार्थ यांचा झालेला पराभव अजित पवार यांच्या जिव्हारी लागला होता.

स्थापनेपासूनच राष्ट्रवादी काँग्रेस सतत १५ वर्षे राज्याच्या सत्तेत भागीदार होता. सत्ता गेली आणि राष्ट्रवादीला उतरती कळा लागली. छगन भुजबळ यांना गैरव्यवहारावरून झालेली अटक, प्रफुल्ल पटेल, अजित पवार, सुनील तटकरे यांच्यावर कारवाईची टांगती तलवार यातूनच राष्ट्रवादीची प्रतिमा डागाळण्यात भाजप यशस्वी झाला. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षाचे अनेक मातब्बर नेते भाजपमध्ये गेले. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीच्या अस्तित्वाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. शरद पवार यांनी ही सारी सूत्रे हाती घेतली आणि एकतर्फी लढा दिला. राष्ट्रवादीला ५४ जागा मिळाल्या. याचे सारे श्रेय शरद पवार यांनाच होते. शिवसेनेच्या भाजपविरोधी भूमिकेनंतर राज्यात पेच निर्माण झाल्यावर राष्ट्रवादीला महत्त्व प्राप्त झाले.

यापूर्वी २०१४ मध्ये राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा देण्याची तयारी दर्शविली होती. यातूनच राष्ट्रवादी भाजपबरोबर जाऊ शकते, अशी चर्चा सुरू झाली.  गेल्या रविवारी शरद पवार यांच्या पुण्यातील निवासस्थानी झालेली बैठक या दृष्टीने निर्णायक होती. कारण या बैठकीत सुनील तटकरे, धनंजय मुंडे यांनी शिवसेनेपेक्षा भाजपबरोबर जावे, असे मत मांडले होते, यामागे अजितदादाच होते. अजितदादांचा कल भाजपकडे होता हे स्षष्टच होते. चार दिवसांपूर्वी शरद पवार यांनी अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यावर संशय अधिकच बळावला खरा;  पण या भेटीनंतरही शिवसेना-काँग्रेसला बरोबर घेऊन महाआघाडीचे सरकार स्थापन करण्याच्या दृष्टीने पवारांनी प्रयत्न सुरू ठेवले होते.

अजित पवार यांनी बंड करून थेट शरद पवार यांना आव्हान दिले आहे. अजितदादांनी बंड करून वर्मावर घाव घातला आहे. आता हा घाव किती खोल जातो हे पाहण्यासाठी, नेमके किती आमदार फुटतात हे तेवढेच महत्त्वाचे ठरणार आहे. गेल्या काही वर्षांत राष्ट्रवादीत अजित पवार यांनी स्वत:ची ताकद निर्माण केली. आमदार किंवा कार्यकर्त्यांमध्ये अजितदादांना मानणारा मोठा वर्ग आहे. अजितदादांच्या बंडानंतर पक्षावर नक्कीच परिणाम होईल; कारण राजकारणात दीर्घकालीन उपायांपेक्षा सद्य:स्थितीत काय घडते याला अधिक महत्त्व असते. भले शरद पवार हे भविष्यात पक्षाला पुन्हा यश मिळवून देतीलही, पण पक्षात फूट पाडून अजितदादांनी राष्ट्रवादीची घडी विस्कटविली आहे. बारामतीमध्ये शरद पवार यांचे होर्डिग अजितदादांच्या समर्थकांकडून काढले जाणे हे या दृष्टीने बरेच सूचक मानले जाते.