हिंदुत्वाच्या मुद्दय़ावर सरसंघचालकांच्या निवेदनामागील प्रयोजन लक्षात आले नाही तरी त्यामुळे होणारे परिणाम निश्चितच सकारात्मक असू शकतील..

चीनपेक्षा मोठे व्हायचे ते कसे, यावर फार न बोलता विशेषत: तिघा शेजारी देशांसंदर्भात, विवाद होत राहतात पण संबंध बिघडता नयेत, ही महत्त्वाची बाब ते अधोरेखित करतात तेव्हा वास्तवच समोर येते..

सरसंघचालक मोहनराव भागवत यांचे यंदाचे विजयादशमी मार्गदर्शन अनेकार्थानी लक्षवेधी ठरते. संपता संपत नसलेला करोनाकाळ, तो हाताळताना निर्माण झालेली आव्हाने, त्यात चीनसारख्या महत्त्वाच्या आणि आपल्यापेक्षा काही पट शक्तिमान देशाने मुसंडी मारून बळकावलेला सीमावर्ती भूभाग आणि एकूणच बदलती जागतिक परिस्थिती या पार्श्वभूमीवर सरसंघचालक काय मार्गदर्शन करणार याकडे अनेकांचे डोळे लागलेले असतील. पूर्वी या भाषणाच्या सविस्तर अन्वयार्थासाठी दुसऱ्या दिवसाची वाट पाहावी लागत असे. भाजपचे सरकार सत्तेवर आल्यानंतर सरकारी मालकीच्या दूरदर्शन वाहिनीवरून त्याचे थेट प्रक्षेपण होऊ लागले. त्यामुळे माध्यमांची आणि संघसमर्थक, निरीक्षक अशा सर्वाचीच सोय झाली. संघप्रणीत भाजपने समाजमाध्यमाच्या क्षेत्रात घेतलेली आघाडी लक्षात घेता अलीकडच्या काळात हे भाषण या नवमाध्यमांतूनही प्रक्षेपित केले जाते. परंपरेच्या जतनासाठी तंत्रज्ञान कसे कामास येते याचे हे उत्तम उदाहरण. तथापि वार्षिक विजयादशमी सोहळ्यास कोणा अन्य सुप्रतिष्ठित असामीस बोलावण्याची परंपरा मात्र या वेळी संघाने खंडित केल्याचे दिसले. नोबेल पारितोषिक विजेते कैलाश सत्यार्थी ते एका बलाढय़ संगणक कंपनीचे प्रवर्तक शिव नाडर अशा अनेक मान्यवरांनी अलीकडच्या काळात संघाचा विजयादशमी सोहळा भूषवला आहे. करोना विषाणूने यंदा या परंपरेस खीळ घातली. वास्तविक दूरसंचाराच्या माध्यमातून कोणा मान्यवराचे मार्गदर्शन यंदाही आयोजित करता आले असते. संघाने ते केले नाही. असो. त्यामुळे या सोहळ्यास फक्त सरसंघचालकांचेच मार्गदर्शन झाले. करोनाकालीन निर्बंधात अवघ्या ५० स्वयंसेवकांसमोर आयोजित या सोहळ्यात सरसंघचालकांनी आपल्या तब्बल ७० मिनिटांच्या भाषणात विविध विषयांस स्पर्श केला. त्यातील बहुतांश वेळ करोनाने निर्माण केलेली परिस्थिती आणि सरकारकडून त्याची हाताळणी यावरील ऊहापोहात गेला. तसे ते अपेक्षितही होते. त्या व्यतिरिक्त त्यांनी स्पर्श केलेले महत्त्वाचे मुद्दे दोन. एक म्हणजे हिंदुत्व आणि दुसरा मुद्दा म्हणजे चीनच्या आव्हानाच्या निमित्ताने त्यांनी आपल्या एकूणच परराष्ट्र धोरणांवर केलेले भाष्य.

यातील हिंदुत्वाच्या मुद्दय़ावर त्यांना नव्याने स्पष्टीकरण द्यावयाची गरज का वाटली हे कळावयास मार्ग नाही. कारण तसे काही तातडीचे प्रयोजन त्यामागे होते असे नाही. अलीकडच्या काळात संघाच्या हिंदुत्वाबाबत कोणी काही लक्षणीय प्रश्न निर्माण केले होते असेही नाही. त्यामुळे उपस्थितच न झालेल्या प्रश्नांची उत्तरे का आणि कोणासाठी असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. हिंदुत्व ही कल्पना विशाल आहे आणि तीस ‘पूजासे जोडकर’ संकुचित करण्याचे कारण नाही, असे सरसंघचालक जेव्हा म्हणतात ते स्वागतार्ह ठरते. हिंदू धर्माच्या इतिहासात या धर्माच्या कडव्यातील कडव्या टीकाकारांनाही साधुत्वाचा दर्जा दिला गेल्याची अभिमानास्पद नोंद आहे. म्हणजे धर्माचे रूढार्थाने पालन करणारे तर आदरणीय आहेतच पण धर्म संकल्पना नाकारून नास्तिकत्वाचा प्रसार करणारेही आदरणीयच. तेव्हा या औदार्यपूर्ण परंपरेचा आठव विजयादशमीच्या सुमुहूर्तावर साक्षात सरसंघचालकांनीच करून दिला हे योग्य झाले. हिंदू या व्याख्येत, सरसंघचालकांच्या मते, १३० कोटी भारतीय येतात आणि त्यात भेदाभेदाचे कारण नाही. हिंदुत्वासाठी ‘कट्टरपंथ छोडना पडता है’ आणि हा धर्म अहिंसेचा पुरस्कार करतो, असेही सरसंघचालकांनी आवर्जून या मेळाव्यात नमूद केले. ही निश्चितच सर्वसमावेशक स्वागतार्ह बाब. सरसंघचालकांनीच ती नमूद केल्यामुळे यापुढे करोनाकाळात उगाच कोणी मंदिरांच्या टाळेबंदीमुक्तीसाठी आंदोलने करणार नाही, ही आशा. आणि तसे ते कोणी केलेच तर त्यामागे संघाचे वैचारिक अधिष्ठान असणार नाही, याची खात्री असल्याने संबंधित सरकार अशा आंदोलकांवर कायद्याप्रमाणे कारवाई करू शकेल. आपल्यासाठी हिंदुराष्ट्र ही संकल्पना प्रथा-परंपरांवर आधारित मूल्यपद्धतीवर आधारित आहे हे स्पष्ट करून सरसंघचालकांनी ती राजकीय वा सत्ताकेंद्री नाही, हे नमूद केले. ही बाबदेखील फार महत्त्वाची. याचे कारण त्यातून क्षुद्र राजकीय उद्दिष्टांसाठी निवडणुकीच्या काळात हिंदुत्वाचा वापर केला जाणार नाही, अशी हमी मिळते. अशा तऱ्हेने हिंदुत्वाच्या मुद्दय़ावर सरसंघचालकांच्या निवेदनामागील प्रयोजन लक्षात आले नाही तरी त्यामुळे होणारे परिणाम मात्र निश्चितच सकारात्मक असू शकतील. म्हणून हे प्रतिपादन स्वागतार्ह.

या भाषणातील दुसरा मुद्दादेखील तितकाच महत्त्वाचा. तो चीन संदर्भातील आहे. करोना-प्रसारात चीनचा हात किती याबाबत ‘संदिग्धता’ आहे हे स्पष्ट करणारे सरसंघचालक त्याच चीनने भारतीय सीमावर्ती भागात ‘अतिक्रमण किया और कर रहा है’ हे सत्य नि:संदिग्धपणे मान्य करतात, ही बाबदेखील कौतुकास्पद. त्यामुळे चिनी सैनिक भारतात घुसलेच नाहीत हा सरकारी दावा परस्पर निकाली निघू शकतो. त्याचबरोबर या अतिक्रमणास भारताकडून मिळालेल्या प्रतिसादामुळे चीन ‘ठिठक गया’ आणि त्या देशास ‘धक्का मिला’ असेही उद्गार सरसंघचालक काढतात. भारताच्या नजरेतून पाहिल्यास त्यांचे उद्गार रास्तच. तथापि आंतरराष्ट्रीय पातळीवरून याकडे पाहिल्यास चीनला आपल्या नक्की कोणत्या कृतीमुळे धक्का बसला ही बाब अधिक स्पष्ट व्हायला हवी. मे-जूनपासून सुरू असलेल्या या संघर्षांवर तोडगा काढण्यासाठी अर्धा डझनाहून अधिक चर्चेच्या फेऱ्या होऊनही चिनी सेना काही माघारी जाण्यास तयार नाही. आता उभय देशांत ‘डोकलामसदृश’ तोडग्याची चर्चा सुरू आहे. आपले सैन्य आधी मागे घेतले जावे मग चीन माघार घेईल, असा त्या देशाचा प्रस्ताव असल्याचे वृत्त आहे. याबाबत आपण साशंक आहोत. कारण चीनवर विश्वास ठेवावा अशी स्थिती नाही. तेव्हा चीनला डोकलामपूर्व जैसे थे अथवा पूर्वलक्ष्यी जैसे थे स्थिती मान्य कशी करायला लावायची हे अद्यापही आपणास उमगलेले नाही. चीनच्या वृत्तीसंदर्भात हे सत्य सरसंघचालकही मान्य करतात. चीनने आपल्यावर ‘नही सोची थी’ अशी परिस्थिती लादली असा त्यांच्या म्हणण्याचा मथितार्थ. तो एका अर्थी आपल्या परराष्ट्र संबंध हाताळणीतील भोंगळपणाचा निदर्शक ठरतो. कारण मैत्रीच्या आणाभाका घेणारा चीन ‘असा’ वागेल असे आपल्याला वाटले नाही. म्हणजेच चीनने आपणास गाफील गाठले. या संदर्भात अनेक तज्ज्ञांचे हेच तर म्हणणे आहे.

तेव्हा चीनची कोंडी करण्यासाठी आपणास ‘पडोसी’ देशांशी संबंध सुधारावे लागतील अशी सरसंघचालकांची मसलत आहे. या संदर्भात त्यांनी श्रीलंका, ब्रह्मदेश, बांगलादेश आणि नेपाळ या देशांचा आवर्जून उल्लेख केला. त्यांच्या मते हे सर्व देश ‘हमारे स्वभाववाले’ आहेत आणि आपण त्यांच्याशी ‘जल्दी जोड लेना चाहिए’ असे त्यांचे सांगणे. विवाद होत राहतात पण संबंध बिघडता नयेत, ही महत्त्वाची बाब ते अधोरेखित करतात तेव्हा वास्तवच समोर येते. ते असे की या सर्व देशांशी आपले संबंध तूर्त हवे तसे नाहीत आणि ते लवकरात लवकर सुधारायला हवेत. बांगलादेशचाही उल्लेख या संदर्भात ते भारताच्या मित्रदेशांत करतात. त्यामुळे त्या देशाची संभावना ‘वाळवी’ अशी होणार नाही, याचीच एक प्रकारे हमी मिळते. चीनपेक्षा आपण मोठे होणे हे त्यांच्या मते यावरचे उत्तर. ते खरेच. पण हे मोठे होण्याचे मार्ग त्यांनी विस्ताराने सांगितले असते तर भारत सरकारला त्याचा उपयोग झाला असता.

याखेरीज सरसंघचालकांनी अनेक अन्य मुद्दय़ांना स्पर्श केला. ‘स्वदेशी’चे महत्त्व, ‘टुकडे टुकडे गँग’ची, देशात अस्थिरता निर्माण करू पाहणाऱ्या परकीय हस्तकांची आणि हिंदुत्वाबाबत ‘भ्रम पैदा करने’वाल्यांची निर्भर्त्सना आदी अनेक बाबींवर त्यांनी भाष्य केले. त्याबाबत कोणाचेच दुमत असणार नाही. संघाशी संबंधित सर्व जण सरसंघचालकांच्या या विजयादशमी विचारांस योग्य त्या गांभीर्याने घेतील, ही आशा.