आपल्या पत्नीच्या कर्तृत्वाची पणती पेटती राहावी म्हणून स्वत:च्या अस्तित्वाची वात जाळत राहिलेले पुरुष विरळा. प्रिन्स फिलीप हे त्या विरळांपैकी एक…

आपल्या जीवनकाळात इतिहासाला वळण देणाऱ्या अनेक घटना त्यांनी पाहिल्या आणि त्या प्रत्येक वळणावर सम्राज्ञी एलिझाबेथच्या पाठीशी आपल्या मिस्कील हास्यासह ते उभे राहिले…

Ram Navami 2024: Mughal version of Ramayana
Ram Navami 2024: ‘या’ मुघल सम्राटाच्या आईला प्रिय होते रामायण? कोण होता हा सम्राट?
Raj Thackeray meets Salman khan
Video: राज ठाकरेंनी घेतली सलमान खानची भेट; गोळीबार प्रकरणात हल्लेखोरांचे फोटो आले समोर
nagpur crime news, suspicion of character nagpur
प्रेमविवाहानंतर पत्नीच्या चारित्र्यावर संशय; पतीने पत्नीला पाजले विष, पोलिसांनी…
mukhtar ansari umar ansari
“कट रचून विषप्रयोग केला”, मुख्तार अन्सारीच्या मुलाचे गंभीर आरोप; म्हणाला “तीन दिवसांपूर्वी त्यांनी…”

प्रिन्स फिलीप यांच्या निधनाच्या वृत्तास जी प्रसिद्धी मिळाली त्यावरून काही त्याचे वर्णन ‘हे गुलामी मानसिकतेचे लक्षण’ असे करतील. अशांचे काहीही होऊ शकत नाही. खरे तर कोणतेही पद नाही, कसलेही अधिकार नाहीत, आयुष्यात सम्राज्ञीच्या प्रभावळीत राहण्यापलीकडे काही कृती नाही आणि तरीही संपूर्ण जग, यात ‘राष्ट्रकुल’बाह्य देशही आले, या व्यक्तीच्या निधनाची इतकी दखल का घेतात याचा विचार व्हायला हवा. रामायणात राम आणि लक्ष्मण यांच्या गुणगौरवात मग्न होत उर्मिलेचे स्मरणही न करणाऱ्या समाजात असा विचार केला जाणे असंभव. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते असले काही बकवास ऐकण्याची सवय झाली, की एके काळच्या खऱ्याखुऱ्या महासत्तेच्या सम्राज्ञीमागे आपले अस्तित्व विरघळून टाकणाऱ्या या पुरुषाचे मोठेपण लक्षात न येण्याचा धोका आहे. तो टाळून ड्युक ऑफ एडिंबरा यांचे आयुष्य काय होते आणि म्हणून ते संपणे म्हणजे काय, हे लक्षात घ्यायला हवे.

वास्तविक फिलीप हे राणी एलिझाबेथ हिच्यापेक्षाही अधिक राज-रक्ताचे. एलिझाबेथ या फक्त वडिलांकडूनच खानदानी घराण्यातल्या. पण फिलीप यांचा राज-वारसा दोन्ही बाजूंचा. ग्रीसआणि डेन्मार्क या दोन्ही देशांतील सम्राटाचे हे घराणे. पुढे त्याची वाताहत झाली आणि वडील भलतीचाच हात धरून नौकेवर राहू लागले. अशा वेळी निर्वासिताचे जगणे नशिबी आलेले फिलीप आधी शिक्षण आणि नंतर नोकरीच्या निमित्ताने ब्रिटनला आले. ब्रिटिश नौदलात त्यांची निवड झाली आणि अंगभूत कर्तबगारीने प्रगतीची संधीही समोर होती. अशा वेळी तरुण एलिझाबेथ त्यांच्या प्रेमात पडते काय आणि अकल्पितपणे सम्राज्ञीपदाचा मुकुट मस्तकी धारण करण्याची वेळ तिच्यावर येते काय… सारेच अचंबित करणारे! वास्तविक एलिझाबेथ यांचे वडील सम्राटपदाच्या रांगेत नव्हते. पण त्यांचे ज्येष्ठ बंधू, म्हणजे एलिझाबेथ हिचे काका किंग एडवर्ड (आठवे) यांना प्रेमासाठी राजघराण्याचा त्याग करावा लागल्याने एलिझाबेथ यांच्या वडिलांकडे सम्राटपद गेले. त्यांना दोन्ही मुली. एलिझाबेथ आणि मार्गारेट. ते कडवे धूम्रपानी अग्निहोत्री. तेव्हा अकाली मरण अटळ. ते आले आणि ध्यानीमनी नसताना त्यांची ज्येष्ठ कन्या म्हणून एलिझाबेथ यांना सम्राज्ञीपदाचा मुकुट मस्तकी धारण करावा लागला. वैयक्तिक कथा म्हणावी तर इतकीच. पण त्याची महाकथा तयार झाली ती वातावरणाच्या पार्श्वभूमीमुळे!

प्रिन्स फिलीप यांचे लग्न झाले तेव्हा ते २६ वर्षांचे होते आणि एलिझाबेथ अवघ्या २१ वर्षांच्या. साल १९४७. दुसऱ्या महायुद्धाची राख अजूनही धगधगत होती आणि ग्रेट ब्रिटनच्या महासत्तामुकुटातील ‘कोहिनूर’ भारत हा स्वतंत्र झाला होता. ब्रिटनचे उरलेसुरले महासत्तापणही संपवून टाकावे यासाठी सोव्हिएत युनियन ते अनेक युरोपीय देश देव पाण्यात बुडवून बसले होते आणि आयसेनहॉवर यांची अमेरिका पाहुण्याच्या वहाणेने विंचू मेला तर बरे म्हणत ब्रिटनच्या वाताहतीकडे शांत पाहात होती. दुसऱ्या महायुद्धाने ब्रिटनला विजयी केले खरे. पण सर्व रया गेली होती. पण काप गेल्यावरही भोके राहतात त्याप्रमाणे स्वत:चे महासत्तापण ब्रिटनच्या मनातून उतरत नव्हते. पक्षाघाताच्या झटक्यानंतरही चर्चिल यांची सत्ताकांक्षा संपली नव्हती आणि त्यानंतर पंतप्रधानपदी आलेले अ‍ॅटली यांची ते पद सांभाळण्याची कुवत नव्हती. अत्यंत अननुभवी सम्राज्ञी आणि आसपासची परिस्थिती ही अशी! अशा वातावरणात राजबिंड्या, कर्तृत्ववान फिलीप यांचा पुरुषीपणाचा फणा पदोपदी दुर्लक्षिला जात होता. नौदलातील आश्वासक कारकीर्द की महाराणीचा काहीही अधिकार नसलेला साथीदार- यातून एक पर्याय निवडण्याचा अवघड प्रसंग त्यांच्यासमोर होता. अनपेक्षितपणे सर्वस्व हिरावून जाणे हे जितके शोककारी असते तितकेच नको असताना, इच्छा नसताना बरेच काही मिळणे हेदेखील तापदायक असते. फिलीप हे अनुभवत होते. त्यांचा मोठेपणा असा की, सनातनी, पुरुषप्रधान, अहंकारी समाजात जगत असतानाही त्यांनी अत्यंत पुरोगामी, स्त्रीसन्मानकारी आणि नम्र निर्णय घेतला. आपल्यावर जिचे नितांत प्रेम आहे त्या एलिझाबेथसाठी आपल्या साऱ्या पुरुषीपणास त्यांनी मुरड घातली आणि आपल्या जोडीदारीणीचा साथीदार बनून दुय्यम आयुष्य जगणे निवडले. सम्राट पुरुषासाठी आपले सर्वस्व पणास लावणाऱ्या आणि तेजाची सावली बनून जगणाऱ्या महिला अनेक आहेत. पण आपल्या पत्नीच्या कर्तृत्वाची पणती पेटती राहावी म्हणून स्वत:च्या अस्तित्वाची वात जाळत राहिलेले पुरुष विरळा. महाराजपद कधीही आपल्याला मिळणारे नाही, आयुष्यभर आपण फक्त प्रिन्स… राजपुत्रच… राहणार हे मनाने स्वीकारणे अवघड. ड्युक ऑफ एडिंबरा हिज रॉयल हायनेस प्रिन्स फिलीप यांनी ते लीलया स्वीकारले आणि आयुष्यभर पत्नीच्या मागे दोन पावले राखतच ते जगले.

पण ते हेवा वाटावे असे! दहा जन्मांतही अनेकांना जे अनुभवता येणार नाही, ते या महाराणी-राजपुत्रास एका जन्मात भोगता आले. जन्म झाला तो लेनिनची रशियन राज्यक्रांती चार-पाच वर्षांच्या तान्ह््या अवस्थेत असताना, ऑटोमन साम्राज्य लयाला जात असताना आणि पहिले महायुद्ध नुकतेच संपलेले असताना; दुसऱ्या महायुद्धाच्या ज्वालात लष्करी सेवेची संधी, हिटलरचा पाडाव, स्टालिनचा आधी गुणगौरव करणारे आणि नंतर त्याच्यातील कू्ररकर्मा दिसल्याने हादरणे, मोहनदास करमचंद गांधी नावाच्या शांतिदूताचा उदय आणि लग्नानंतर अवघ्या काही महिन्यांत त्याची झालेली हत्या, एके काळच्या आपल्या साम्राज्याचा भाग असलेल्या वैराण वाळवंटातून पश्चिम आशियाई तेलसम्राटांचा उदय, इराणातील क्रांती आणि अयातोल्ला खोमेनी, १९८९ सालच्या ९/११ च्या मुहूर्तावर बर्लिनची भिंत कोसळणे आणि सोव्हिएत रशियाचा अस्त, आयसेनहॉवर यांच्यापासून ते जो बायडेन व्हाया रेगन, निक्सन, क्लिंटन, ओबामा असा अमेरिकेचा प्रवास आणि त्यात ट्रम्प नावाच्या शिळेवर त्या देशाचे धडकणे, फोनचा जनक स्कॉटिश अलेक्झांडर बेलचा मृत्यू आणि १९८९ नंतर पुढे फक्त फोन या संकल्पनेलाच मूठमाती देणाऱ्या इंटरनेटचा जन्म, आपल्या चिरंजीवाचा घटस्फोट व परीकथेतली वाटावी अशा सुनेस- लेडी डायना हिला वाचवू शकलो नाही ही खंत… अशा किती घटना सांगाव्यात. यातली प्रत्येक घटना इतिहासाला वळण देणारी आणि त्या प्रत्येक वळणावर सम्राज्ञी एलिझाबेथ यांच्या पाठीशी ड्युक ऑफ एडिंबरा हिज रॉयल हायनेस प्रिन्स फिलीप आपल्या मिस्कील हास्यासह उभे!

हे त्यांचे शेवटपर्यंत अबाधित राहिलेले वैशिष्ट्य. आपल्या राजघराण्यातील मोठेपणास काहीही अर्थ नाही, ते फक्त शोभेचे, याची जाणीव त्यांना सतत होती. पण अशा जाणिवेतून एक कडवटपणा येतो. तो त्यांच्यात कधीही नव्हता. कोणत्याही समारंभात, मग भले तो विम्बल्डनचा बक्षीस समारंभ असो, त्यांना कोणी मोठेपणा द्यायला गेला की ते राणीकडे बोट दाखवत. कित्येकदा फुलांचे गुच्छही ते आपल्या पत्नीच्याच हाती दिले जातील याची खात्री करून ते स्वीकारणे अव्हेरत. हे मोठेपण समजून घेतल्याखेरीज समजणार नाही. त्यांना त्यांच्याविषयी बोललेले कधीही आवडले नाही. ‘‘स्वत:विषयी कधीही बोलू नका. त्यात बोलणारा सोडला तर कोणालाही काडीचाही रस नसतो,’’ असे अत्यंत करडे, वैश्विक सत्य अत्यंत खट्याळपणे मांडत ते विषय बदलत. आपल्यावर आणि आपल्या पत्नीवर सम्राटपदाचे जगणे लादले गेलेले आहे याची वास्तववादी जाणीव सतत बाळगत सामान्यांचे जगणे कसे उंचवता येईल यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. आपल्या पत्नीवर मोकळेपणाच्या मर्यादा आहेत, परंपरेचे ओझे वागवत वावरावे लागत असल्याने तिचा वेग मंदावलेला आहे आणि तो तसाच राहणार आहे हे सत्य ओळखत या गृहस्थाने स्वत:च्या आयुष्याचा वेग त्यानुसार बदलला. महत्त्वाचे म्हणजे, शरीराने असो की मनाने; फिलीप शेवटपर्यंत ताठ होते. दोन वर्षांपूर्वी, ९६-९७ वर्षांचे असताना ब्रिटिश नौदलातल्या तरुण तुकडीने त्यांना मानवंदना दिली तो सोहळा ‘बीबीसी’वर ज्यांनी पाहिला असेल त्यांना या विधानाची प्रचीती येईल. दंडातल्या बेटकुळ्या दाखवत सुडौल देहयष्टीचा रास्त अभिमान बाळगत समोर आलेले लवलवीत तरुण त्या वेळी भरपावसात भिजत त्यांच्याइतक्याच ताठ देहाने ‘नमवी पहा भूमी’ वृत्तीने पावले टाकत शंभरीकडे निघालेल्या प्रिन्स फिलीप यांना पाहून हरखून जात होते. महत्त्वाचे म्हणजे, त्यात एक नैसर्गिक डौल आणि आब होता. उगाच, ‘पाहा, वाटतो का मी सत्तरीचा’ असे विचारत वात आणणाऱ्या आणि ‘सुपारीच्या खांडाचेही व्यसन नाही’ असे मिरवत डोके उठवणाऱ्या वृद्धांसारखे ते कधीही वागले नाहीत. आणि ते तसे नव्हतेही. चहुबाजूंनी, चहुअंगांनी आयुष्य उपभोगत ते जगले.

आणखी काही आठवडे राहाते तर शतक महोत्सव साजरा करते! त्यांचा जन्म झाला तेव्हा लॉइड जॉर्ज हे ब्रिटनचे पंतप्रधान होते. आज बोरिस जॉन्सन आहेत. काळाच्या या विशाल टप्प्यात त्या एका देशात २२ पंतप्रधान होऊन गेले. त्यातील काही सन्माननीय अपवाद वगळता अन्य अनेक विस्मृतीतही गेले. पण कोणतेही पद, लौकिक अधिकार नसलेला ड्युक ऑफ एडिंबरा हिज रॉयल हायनेस प्रिन्स फिलीप हा पुराणपुरुष मात्र त्या काळावर मात करून अनंताच्या प्रवासास मार्गस्थ झाला. सुमारे पाऊण शतकाच्या संसारानंतर राणी एलिझाबेथ जेव्हा आता मागे पाहतील, तेव्हा त्यांना लक्षात येईल : आपली सावली नाही!