कोणत्याही सरकारचे मुख्य उद्दिष्ट हेच असते की जनतेचे प्राधान्याच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष व्हावे.. उरणसारख्या घटनांनी नेमके हेच साध्य होते.

कोझिकोड येथील भाषणात मोदी यांनी देशाला भेडसावणाऱ्या जवळपास सर्वच समस्यांसाठी पाकिस्तानास जबाबदार धरले. आपले अपयश झाकण्यासाठी शेजारील देशाकडे बोट दाखवण्याचा मार्ग या आधीच्याही अनेक सरकारांनी पत्करला, हा इतिहास आहे. मोदी केवळ त्यात वर्तमानाची भर घालीत आहेत, इतकेच.

राष्ट्रीय पौरुषत्व म्हणजे युद्ध ही कल्पना उरात बाळगून सत्ता मिळवली आणि ती मिळवल्यावरदेखील युद्ध करता येत नाही या वास्तवाची जाणीव झाली की उरणसारखे प्रकार घडतात. दोन-चार शाळकरी मुलींना ‘त्यांच्या’सारखे दिसणारे कोणी शस्त्रधारी दिसतात, त्याची बातमी होते, एरवी महत्त्वाच्या बातम्यांनी ढिम्म न हलणारे सरकार ‘ते’ दिसल्याच्या वात्रेने प्रचंड क्रियाशील होते आणि बघता बघता चॅनेलीय शूरवीरांच्या मदतीने देशभर युद्धज्वर पसरतोदेखील. हे सगळेच आपले बाळबोधपण दर्शवणारे आहे. उरी येथील लष्करी केंद्रावर पाकपुरस्कृत दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर हा प्रकार घडल्याने हे बाळबोधपण डौलाने उठून दिसते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाच्या केरळातील अधिवेशनात आपल्या परीने या बाळबोधतेस सुयोग्य हातभार लावला असून हे जे काही सुरू आहे त्याचा विचार आपण आता तरी शांत डोक्याने करणार की नाही, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

तो करावयाचा याचे कारण उरण प्रकरणाच्या आवृत्त्या आता देशभर होतील आणि २४ तास काही ना काही खाद्य हवे असणाऱ्या वाहिन्यांतील बुभुक्षित ध्वनिक्षेपकधारी शूरवीरांच्या कृपेने त्या देशभर पसरतील. तसे होण्याइतके आनंददायी सरकारसाठी अन्य काही नाही. कारण काहीही न करावे लागता युद्धज्वर तापलेला राहतो आणि जनतेचे मुख्य प्रश्नांवरचे लक्ष उडालेलेच राहते. कोणत्याही सरकारचे.. मग ते भाजपचेही का असेना.. मुख्य उद्दिष्ट हेच असते. जनतेचे मुख्य प्रश्नाकडे दुर्लक्ष होणे. उरणसारख्या घटनांनी नेमके हेच साध्य होते. असे होणे किती धोकादायक आहे हे ठाणे येथे शनिवारी घडलेल्या घटनेतून दिसून येते. त्या शहरातील एका टॅक्सीचालकास आतील प्रवासी ‘तसे’ वाटले आणि त्यांच्या धमाका कर लेंगे वगरे भाषेने दहशतवादी म्हणतात ते हेच अशी त्याची खात्री पटली. त्यातल्या त्यात शहाणपणाची बाब म्हणजे या चालकाने निदान पोलिसांना याची कल्पना तरी दिली. त्यामुळे पुढचा अनवस्था प्रसंग टळला. पण प्रत्येक वेळी असेच होईल असे नाही. विशेषत: मातृभूमी-प्रेमाने भारलेल्या स्वघोषितांची झपाटय़ाने वाढती संख्या पाहता केवळ एखादी व्यक्ती ‘तशी’ वाटली म्हणून तीवर दहशतवादी समजून हल्ला करण्यास हे देशप्रेमी कमी करणार नाहीत. स्वघोषित गोरक्षकांनी मांडलेला उच्छाद पाहता हे असे होणारच नाही याची काहीही हमी नाही. हे इतके बालिश आहे कारण दहशतवादी हा दहशतवाद्यासारखा फक्त निर्बुद्ध हिंदी सिनेमांतच दिसतो, याचे भान आपणास नाही. ९/११चा हल्ला करणारे हे ‘तसे’ दिसणारे अतिरेकी नव्हते. त्यातील एक तर प्रचंड बुद्धिमानांनाच फक्त जेथे प्रवेश असतो अशा लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या अभिजनांच्या संस्थेचा विद्यार्थी होता. हे इतके समजून घेण्याचे भान आजकालच्या फिल्मी राष्ट्रप्रेमींना नाही. धर्मासाठी, देशासाठी काही तरी करणे म्हणजे कोणाला तरी बडवणे आणि ही कोणी तरी व्यक्ती म्हणजे ‘तसे’ दिसणाऱ्यांपकीच असायला हवी अशी सुलभ मांडणी सर्वोच्च पातळीवरून केली जात असल्याने तळागाळात तेच तत्त्वज्ञान झिरपले आहे. असे होण्यात कमालीचा धोका संभवतो. संपूर्ण देशालाच तो धोका सध्या भेडसावत असल्याने सत्ताधीशांनी अधिक गांभीर्याने वागण्याची गरज आहे.

हे अधिक गांभीर्याने वागणे म्हणजे युद्ध नव्हे याची जाणीव आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना झाली, ते बरे झाले. विरोधी पक्षात असताना २४ तासांत पाकचा बंदोबस्त करण्याची वल्गना करणाऱ्यांना सत्ताधीश झाल्यावर पूर्वसुरींपेक्षा वेगळे काहीही करता येत नाही, हे पुन्हा एकदा दिसून आले. अर्थातच भाजपस हा युक्तिवाद मान्य होणार नाही. तो मान्य झाला तर आपले वेगळेपण ते काय राहिले, असा त्यांना प्रश्न पडेल. तेव्हा तो प्रश्नच टाळण्याचा सोपा मार्ग म्हणजे आम्ही वेगळे आहोत हे दाखवण्याचा आटापिटा. भाजपच्या केरळ अधिवेशनात तोच नेमका दिसून आला. या अधिवेशनात बोलताना पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तानला गरिबीविरोधात युद्ध करण्याचे आव्हान दिले. हे गरिबीविरोधातील आपले युद्ध उरी हल्ल्याच्या आधीही सुरूच होते आणि उरी प्रकरण घडले नसते तरीही ते सुरूच राहणार होते. तेव्हा या मुद्दय़ाचे आता औचित्यच नाही. प्रश्न आहे तो लष्करी वा छुप्या युद्धाचा. भाजप ते कसे लढणार, हा प्रश्न आहे. त्याचे उत्तर द्यावयाची वेळ आली की जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, असे गोलगोल विधान करावयाचे आणि जाहीर भाषणात मात्र शत्रुपक्षाला.. तेदेखील त्याचे नाव न घेता.. खणखणीत इशारे द्यावयाचे, हा प्रकार तर गेली ५० वष्रे आपल्या देशात सुरूच आहे. इतक्या मोठय़ा, नाटय़पूर्ण शैलीत नसेल पण तरीही माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हेच करीत होते. तेव्हा मग मोदी यांच्या सत्ताग्रहणाने त्यात बदल तो काय झाला? हा बदल झाला तो इतकाच की आपल्याला वाटते तितके युद्ध छेडणे सोपे नाही याची जाणीव मोदी यांना झाली. अशा वेळी या जाणिवेची कबुली प्रामाणिकपणे देऊन आम्ही अन्य मार्गाचा अवलंब करून पाकिस्तानला जेरीस आणणार आहोत, असे सांगण्यात अधिक मुत्सद्देगिरी होती. परंतु मुत्सद्देगिरी म्हणजे चलाख शब्दफेक असेच मानले जाण्याच्या आजच्या काळात हे वास्तव समजून घेतले जात नाही, हे दुर्दैव. ते समजून घेण्यात अनवधान नाही. हे समजून-उमजून केले जाते. या भाषणात मोदी यांनी देशाला भेडसावणाऱ्या जवळपास सर्वच समस्यांसाठी पाकिस्तानास जबाबदार धरले. यातही वेगळेपण काय? आपले अपयश झाकण्यासाठी शेजारील देशाकडे बोट दाखवण्याचा मार्ग या आधीच्याही अनेक सरकारांनी पत्करला, हा इतिहास आहे. मोदी केवळ त्यात वर्तमानाची भर घालीत आहेत, इतकेच. पाक हे दहशतवादाची निर्यात करणारे राष्ट्र आहे, असेही मोदी म्हणाले. परंतु लाहोरात वाकडी वाट करून शरीफ यांच्या अभीष्टचिंतनास मोदी यांनी जाण्याआधीही ते तसेच होते. तेव्हा यातही नवीन काही नाही. उरी घटनेनंतर ‘सव्वासो क्रोर’ भारतीयांच्या संयत प्रतिक्रियेने आपणास बळ(?) मिळाल्याचा युक्तिवाद मोदी यांनी केला. तो शुद्ध हास्यास्पद म्हणावा लागेल. कारण संसदेवर हल्ला झाला तेव्हा, कारगिल घडले तेव्हा आणि अगदी मोदी यांचे पूर्वसुरी भाजप सरकार कंदाहार अपहरणानंतर मौलाना मसूद अझर आणि दोन अतिरेक्यांना घरपोच सोडण्यास गेले तेव्हाही हे ‘सव्वासो क्रोर’ देशवासी असेच संयत वागले होते. तेव्हा प्रश्न या देशवासीयांचा नाही. तो आहे एका दाताच्या बदल्यात जबडा घ्यायला हवा अशी मागणी करणाऱ्या मोदी यांच्या राम माधव वा अन्य संतमहंत यांच्यासारख्या उल्लूमशाल सहकाऱ्यांच्या आकलनशक्तीचा. अशा वेळी प्रयत्नच करायचा असेल तर मोदी यांनी स्वपक्षीयांची आकलनशक्ती वाढवण्यासाठी करावा. ते मात्र होताना दिसत नाही.

कारण वास्तव हे आहे की मोदी आणि सहकाऱ्यांनी आता पाकिस्तानच्या नावे ऊर बडवेगिरी बंद करावी. पाकिस्तान कसा होता, आहे आणि असेल हे भारतीयांना पुरते ठाऊक आहे. तो देश किती संदर्भ हरवून बसलेला आहे हे संयुक्त राष्ट्र संघटनेच्या ताज्या अधिवेशनात दिसले. भारत वगळता एकही देश पाकिस्तानचे नावदेखील घेत नाही, इतका तो देश जगाच्या खिजगणतीतून गेला आहे. अशा वेळी आपल्या प्रत्येक समस्येसाठी पाकिस्तानला जबाबदार धरणे म्हणजे त्यास मोठे करणे. ते कसे टाळता येईल याचा सरकारने विचार करावा. सतत युद्धज्वर तापता ठेवण्यात काहीही शहाणपणा नाही. उरी आणि उरणने या मुद्दय़ावरील उरस्फोडीच्या मर्यादा दाखवून दिल्या आहेत.