आयुष्यात काही अचाट करावे असे प्रत्येकास वयाच्या योग्य टप्प्यावर वाटतेच वाटते. या मनातील वाटण्यास शॉन कॉनरी यांनी शारीर रूप दिले..

जगातील प्रत्येक पुरुषास आपण तसे असायला हवे आणि प्रत्येक महिलेस ‘आपला’ पुरुष असा असायला हवा अशी भावना.. खरे तर गंड.. ज्याने दिला त्याचे नाव शॉन कॉनरी. अमिताभ बच्चन यांची उंची, दिलीप कुमार यांची शब्दफेक/ अभिनय

आणि राजेश खन्ना यांच्या अभिनयकाळातील लडिवाळपणाचा काही अंश एकाच व्यक्तिमत्त्वात एकत्र आल्यास जे रसायन होईल त्याचे नाव शॉन कॉनरी असे असेल. एखाद्यास एकाच आयुष्यात काय काय साध्य व्हावे आणि एखाद्याच्या पदरात किती पडावे याचेही उदाहरण म्हणजे शॉन कॉनरी. चित्रपटप्रेमी असोत वा आपणास इतरांपेक्षा अधिक कळते अशा चष्म्यातून पाहणारे आणि समीक्षक म्हणवून घेणारे असोत, या सर्वाना शॉन कॉनरींविषयी आदर होता आणि त्यांच्याविषयी सर्वाच्याच मनात अदब होती. सर्वसाधारण अनुभव असा की, लोकप्रियतेची गर्दी ज्याच्या मागे असते त्याच्यापासून दर्दीमंडळी लांब जातात. जेम्स बॉण्डच्या अजरामर व्यक्तिरेखेमुळे शॉन यांना अभूतपूर्व लोकप्रियता मिळाली. पण तरीही जॉन गिलगुड (‘मर्डर ऑन द ओरिएण्ट एक्स्प्रेस’)सारख्या शेक्सपिअरी अभिनेत्याबरोबरीने वा ऑड्री हेपबर्नसारख्या अभिनेत्रीसमोर (‘रॉबिनहूड’) पडद्यावर येण्याचा प्रयोग करण्यात हा गडी कधी हटला नाही. म्हणून दर्दीनाही त्याचे कौतुक. एक कलाकार म्हणून यातील सर्वात लक्षात घ्यावी अशी बाब म्हणजे बॉण्डेतर चित्रपटांत काम करताना शॉन कॉनरी यांची एकही बॉण्ड लकब त्यात आढळत नाही. ही बाब महत्त्वाची अशासाठी की, कोणत्याही मर्यादित उंचीच्या कलाकारास आपल्या क्षेत्रातील हमखास टाळीच्या जागा माहीत असतात आणि ते वळण त्यांना टाळता येत नाही. कॉनरी यांनी हा धोका अत्यंत अलवारपणे टाळला. कदाचित हे बॉण्डचे भूत डोक्यावरून उतरवण्याची त्यांचीही इच्छा होती.

त्यांनी ती वारंवार बोलून दाखवली होती. ‘‘या जेम्स बॉण्डला मला मारून टाकायचे आहे,’’ अशी त्यांची प्रतिक्रिया अनेकदा व्यक्त झाली. कारण बराच काळ जगाच्या पाठीवर कॉनरी दिसले की ‘तो पाहा जेम्स बॉण्ड’ असेच उद्गार जनसामान्यांत उमटत. याचा त्यांना तिटकारा होता. यातील योगायोग असा की, बॉण्डचे तीर्थरूप इयान फ्लेमिंग यांनाही हा असा ‘ताडमाड, पैलवानी’ बॉण्ड नकोसाच होता. माझा बॉण्ड हा नौदलाच्या राजबिंडय़ा कमांडरसारखा हवा, अशी त्यांची भावना होती. पण त्यांच्या प्रेयसीने कॉनरी हाच आदर्श बॉण्ड ठरेल असा प्रेमळ आग्रह (हेच कॉनरी यांचे नशीब) फ्लेमिंग यांच्याकडे धरला. त्यामुळे ते ही भूमिका कॉनरी यांना द्यायला तयार झाले. पण पहिल्याच (‘डॉ. नो’) चित्रपटानंतर फ्लेमिंग यांचे मत बदलले. आपल्या स्वप्नातील बॉण्ड प्रत्यक्षात आलाच तर तो असाच असेल, हे त्यांनी मान्य केले. त्यानंतर ते इतके शॉनवादी झाले की, त्यांनी नंतरच्या बॉण्डपटात त्याचे आईवडील शॉन कॉनरी यांच्याप्रमाणे स्कॉटिश असल्याचे दाखवले. तथापि कॉनरी यांच्या बॉण्डपटास अमाप यश मिळाले तरी ते आपल्यापेक्षा प्रत्येकाच्या मनात दडलेल्या परिकथेतील राजकुमाराचे यश आहे, हे त्यांना ठाऊक होते. आयुष्यात असे काही अचाट करावे असे प्रत्येकास वयाच्या योग्य टप्प्यावर वाटतेच वाटते (असे ज्यांना वाटत नाही त्यांचे काय होते हे सांगण्याची गरज नाही). या मनातील वाटण्यास शारीर रूप फक्त आपण दिले, खरे यश आहे ते प्रत्येकाच्या मनातील स्वप्नभावनेचे, याची जाणीव त्यांना सतत होती. अर्थात हे खरे की, नंतरच्या रॉजर मूर आणि पीअर्स ब्रॉस्नन यांच्यापेक्षा कॉनरी यांचे पौरुषत्व अधिक आकर्षक होते आणि डॅनियल क्रेगपेक्षा ते अधिक जिवंत होते. तथापि पहिलाच बॉण्डपट मूर अथवा ब्रॉस्नन यांनी केला असता तर बॉण्डच्या लोकप्रियतेचे निकष त्याप्रमाणे बेतले गेले असते का, हाही एक प्रश्न. म्हणजे पहिला बॉण्ड साकारण्याचे म्हणून जे काही फायदे आहेत ते त्यांना मिळाले हे निश्चित. पण तरी अन्य बॉण्डच्या तुलनेत कॉनरी कोणत्याही पिढीच्या चित्रपटरसिकास अधिक भावले हेही अमान्य करता येणार नाही.

त्यांच्या शारीर व्यक्तिमत्त्वाचा त्यात निश्चितच मोठा वाटा. सव्वासहा फूट उंची, तरुणपणी व्यायामशाळेत कमावलेले शरीर, त्याही आधी लहानपणी पोटासाठी घरोघर दूध टाकण्यासारखी, तरुणपणी मुले सांभाळण्याची वा वाहनचालकाची केलेली शारीरिक कामे वगैरेंमुळे त्यांच्यात जात्याच एक रांगडेपण मुसमुसून भरलेले होते. त्यात मूळ स्कॉटलंडच्या डोंगरी प्रदेशातील. डोंगरदऱ्यातला सर्वसाधारण स्कॉटिश माणूस तसाही हाडापेराने मजबूत असतो. अमेरिकी नागरिकांत टेक्सासमधल्यांत जसे एक रांगडेपण दिसते, तसे इंग्लंडातल्या हायलँड्समधील स्कॉटिशांत एक धिप्पाडपणा येतो. पण यांत फरक असा की, टेक्सनमधल्यांत एक सरासरी बिनडोकपण सर्रास आढळते. स्कॉटिशांत ते अजिबात नसते. टेक्सन काऊबॉइज् घोडय़ावरून मिरवताना दिसतात. पण स्कॉटिश आपल्या हातातल्या बॅगपाइपमुळे रांगडेपणास सुरेल महिरपीत बसवतात. कॉनरी हे त्याचे मूर्तिमंत उदाहरण. ते बॉण्ड म्हणून जितके लोभस होते त्यापेक्षा कित्येक पटींनी ते स्कॉटिश पेहरावात हवेहवेसे वाटत. वरती कोट, कंबरेला ते मोठय़ा लाल-काळ्या चौकडय़ांचे स्कर्टसदृश काही, पायात तगडे बूट आणि दोन्ही हातांत धरून फुंकून वाजवावयाचे बॅगपाइप यांतले कॉनरी अधिक खरे वाटत. चित्रपट हा काही त्यांनी स्वत:हून निवडलेला व्यवसाय नव्हता. पोटासाठी अनेक उद्योगांच्या बरोबरीने मॉडेलिंग करताना रस्त्यात अचानक सापडलेला मार्ग होता. त्या आधी त्यांना फुटबॉलपटूही व्हायचे होते. पण फुटबॉलपटू तिशीतच विझतात हे लक्षात आल्याने त्यांनी तो मार्ग सोडला. मॉडेलिंगच्या मार्गाने रंगभूमी, दूरचित्रवाणी आणि मग चित्रपट अशा चढत्या क्रमाने त्यांची कारकिर्द रंगत गेली. चित्रपटातही प्रवेश मिळाला तोही योगायोगानेच. एका दंडबेटकुळ्या दाखवण्याच्या स्पर्धेत संभाव्य चित्रपटासाठी कलाकारांची निवड चाचणी होती आणि त्यात हे निवडले गेले.

कॉनरी यांचे रूपडे असे की, प्रत्येक टप्प्यावर त्यांना एखाद्या महिलेने पुढे जायला मदत केली. बॉण्डसाठी निवड झाल्यावरदेखील त्यांची शिकवणी घेतली ती सुरुवातीस या चित्रपटांतील तितकीच अजरामर व्यक्तिरेखा असलेल्या पहिल्या मिस मनीपेनी लुइस मॅक्सवेल यांनी. या मनीपेनीबाई ब्रिटिश गुप्तहेर यंत्रणा ‘एमआय फाय’मध्ये बॉण्डच्या साहेब. बॉण्डवर त्यांचा कमालीचा विश्वास. त्यामुळे त्या दरवेळी संकटात पडतात आणि दरवेळी बॉण्ड त्यांना श्वास रोखून धरायला लावतो. प्रसंगी आपल्या साहेबिणीलाही तो पटवतो. ही अशी उपकथानके बॉण्डप्रेमींस ठाऊकच असतात. या सर्वात लक्षात राहतात त्या बॉण्डच्या लकबी. कॉनरी यांच्याकडून त्या मॅक्सवेल यांनी घोटून घेतल्या. त्यासाठी त्या कॉनरी यांना उच्चभ्रूंच्या मेजवानी सोहळ्यांत घेऊन जात. या श्रीमंती लकबी हेदेखील बॉण्डच्या लोकप्रियतेमागील कारण आहे. सामान्यांना त्यांचे मोठे आकर्षण असते आणि त्या वर्तुळात जाऊन तसे वागण्याची त्यांची मनीषा असते. बालगंधर्वाच्या लोकप्रियतेत त्यांच्या शालू नेसण्याचा आणि पदर घेण्याचा मोठा वाटा होता, तसेच कॉनरी यांचेही. तथापि कॉनरी यांच्यातील सच्च्या कलाकारास या स्वप्निल बॉण्डचा तिटकारा आला. त्यामुळेच त्यांनी त्यापासून घटस्फोट घेतला. ‘नेव्हर से नेव्हर अगेन’ हा त्यांचा शेवटचा बॉण्डपट. त्याच्या नावातच कॉनरी यांचा बॉण्ड कंटाळा दिसून येतो. त्यानंतर तशाच पद्धतीच्या ‘द मॅट्रिक्स’ आणि अलीकडच्या ‘द लॉर्ड ऑफ द रिंग’सारख्या चित्रपटांतल्या प्रचंड कमाईच्या भूमिका त्यांनी नाकारल्या. ‘हॉलीवूडमधल्या या नव्या वेडपटांना आवरायला हवे’ अशा अर्थाचे त्यांचे विधान त्या वेळी गाजले. त्याच वेळी स्टिव्हन स्पिलबर्गच्या ‘इंडियाना जोन्स’पटांत त्यांनी कामे केली. चित्रपट, रंगभूमी आदींवर त्यांचे मनापासून प्रेम होते. पण कोठे थांबावे हे त्यांना कळत होते. त्यानुसार ते थांबले आणि सरळ कलासंन्यास घेतला. त्यानंतरही त्यांना निमंत्रणे येतच होती. पण ‘निवृत्तीतला आनंद तुम्हाला काय कळणार’ असे म्हणून ते ती धुडकावत. कोठे थांबावे हे कळणे हीदेखील कला क्षेत्रातील दुष्प्राप्यच बाब. ती त्यांना सहज साधली. हाही मोठेपणाच.

आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांना ब्रिटनच्या महाराणीने ‘सर’की देऊन गौरवले. पण म्हणून ‘मी तृप्त आहे’, ‘हा तर माझ्या माहेरचा सन्मान’ अशी काहीही नाटकी विधाने त्यांनी केली नाहीत. ब्रिटनच्या राणीने गौरवले म्हणून स्वतंत्र स्कॉटलंडची मागणी त्यांनी अजिबात सोडली नाही. अन्यत्र कोठे ‘फुटीरतावादी’ ठरवून घेणे त्यांच्या नशिबी आले असते. पण त्यांच्या.. आणि आपल्याही.. सुदैवाने शॉन कॉनरी योग्य देशात जन्मले. आणि तृप्त भौतिकसुख उपभोगून येथून निघाले. तुकारामाचा एक अभंग आहे, त्यातील ‘राजस सुकुमार’ हे वर्णन शॉन कॉनरी यांस चपखल बसते. त्यापुढील ‘मदनाचा पुतळा..’ हे ओघाने आलेच. भूतलावरील भौतिक जगण्यावर प्रामाणिक प्रेम करणाऱ्या सर्वाच्या वतीने भरभरून जगलेल्या या कलाकारास ‘लोकसत्ता’तर्फे आदरांजली.