प्रियंका ही आतापर्यंत काँग्रेसची झाकलेली मूठ होती. ती उघडण्याचा निर्णय त्या पक्षाने आता घेतला आहे..

प्रियंका गांधी यांनी सक्रिय राजकारणात येण्याचा निर्णय घेतल्याने काँग्रेसवाल्यांनी जसे आनंदाने चेकाळून जाण्याचे कारण नाही तसेच भाजपने सात्त्विक संताप वा उद्वेगाने किरकिर करण्याचेही काही कारण नाही. कोणा एका व्यक्तीच्या प्रवेशामुळे पोत किंवा दिशा बदलेल इतके आपले राजकारण एकपदरी किंवा एकमार्गी राहिलेले नाही. त्यात प्रियंका गांधी म्हणजे काही कोणी मार्गारेट थॅचर वा इंदिरा गांधी नव्हेत. तसेच त्यांनी आतापर्यंत आपली क्षमता सिद्ध करून दाखवलेली आहे, असेही नाही. प्रियंका ही आतापर्यंत काँग्रेसची झाकलेली मूठ होती. ती उघडण्याचा निर्णय त्या पक्षाने घेतला, इतकेच. अशा वेळी त्यामागील कारणे काय आणि मूठ उघडण्याचे परिणाम काय, यावर कर्कशपणा बाजूस ठेवून चर्चा होऊ शकेल.

Kerala IUML president Panakkad Sayyid Sadiq Ali Thangal
काँग्रेससारखे डावे पक्ष अल्पसंख्याकांचे संरक्षण करू शकत नाहीत, केरळच्या IUML प्रमुखांना विश्वास
Manifesto of Samajwadi Party released
हमीभावासाठी कायदा करण्याचे आश्वासन; समाजवादी पक्षाचा जाहीरनामा प्रकाशित
congress
सांगलीत मैत्रीपूर्ण लढत की माघार ? दिल्लीच्या निर्णयाची काँग्रेस नेत्यांना प्रतीक्षा
Gadchiroli, Congress
गडचिरोली : घटक पक्षातील नाराजी व जातीय समिकरणाचे काँग्रेसपुढे आव्हान !

प्रियंका यांना राजकारणात उतरवणे ही काँग्रेसची अपरिहार्यता होती हे सर्वप्रथम लक्षात घ्यायला हवे. या अपरिहार्यतेची अनेक कारणे आहेत. प्रकृतीअस्वास्थ्यामुळे आई सोनिया किती जोमाने स्वत:स पक्षकार्यास जुंपू शकतील यावर उमटलेले प्रश्नचिन्ह हे अर्थातच यातील एक प्रमुख कारण. त्यात सत्ताधारी भाजप सरकार या कुटुंबीयांच्या मागे हात धुऊन लागलेले असताना प्रियंका गांधी यांनी स्वस्थ बसून राहणे अपेक्षित नव्हतेच. नॅशनल हेरॉल्डचे वा अन्य काही प्रकरणे ही सत्ताधाऱ्यांहातची गांधी कुटुंबीयांविरोधातील अस्त्रे आहेत, यात शंका नाही. यात किती तथ्य वा किती प्रचार हे न्यायालयीन लढाईनंतर कळेलच. पण तोपर्यंत, गांधी कुटुंबीयांना न्यायालयीन लढाईत अडकवण्याइतके काही त्यात आहे हा समज दृढ होत राहील. त्यामुळे एका बाजूने सोनिया-राहुल या लढाईत अडकलेले राहतीलच. दुसऱ्या आघाडीवर प्रियंकापती रॉबर्ट वढेरा यांच्यामागेही सरकारी ससेमिरा आहेच. त्यातील सत्यही यथावकाश बाहेर येईलच. पण मोदी सरकार सत्तेवर आल्या आल्या त्यांच्यावर कारवाई सुरू झाली असती तर त्याच्या परिणामकारकतेचा संबंध निवडणुकांशी लावला गेला नसता. तसाही, अन्य कशापेक्षा दंड बेटकुळ्यांसाठीच ओळखल्या जाणाऱ्या या गृहस्थाचे नक्की कर्तृत्व काय, हा प्रश्नच आहे. सोनिया गांधी यांच्या कुंडलीतील हा दहावा ग्रह ही त्या कुटुंबीयांची आणखी एक डोकेदुखी. या पाश्र्वभूमीवर पक्ष म्हणून उभे राहावयाचे काँग्रेसचे निकराचे प्रयत्न हे प्रियंका यांच्या ताज्या निर्णयामागील तिसरे कारण. सभ्यतेचे संकेत पाळावयाचे तर या तिसऱ्या मुद्दय़ावर अधिक चर्चा व्हायला हवी.

ती करताना प्रियंका यांची लोकप्रियता नजरेआड करता येणार नाही आणि त्याच वेळी या लोकप्रियतेची कधी परीक्षा झालेलीच नाही, ही बाबदेखील दुर्लक्षित करून चालणार नाही. काँग्रेसने प्रियंका यांच्याकडे उत्तर प्रदेशच्या पूर्व भागाची जबाबदारी सोपवली आहे. ही बाब सूचक. उत्तर प्रदेशातील ८० लोकसभा जागांपैकी साधारण निम्म्या जागा पूर्व भागात आहेत. त्यातही लक्षणीय बाब म्हणजे अमेठी, रायबरेली, फूलपुर अशा गांधी घराण्याशी संबंधित जागा याच पूर्व उत्तर प्रदेशात येतात. तेव्हा प्रियंका यांच्या न तपासलेल्या गेलेल्या क्षमतेचा चतुर उपयोग काँग्रेसला या प्रदेशात होईल यात शंका नाही. एकंदरच उत्तर प्रदेशात आणि विशेषत: त्या प्रदेशात नेहरू घराण्याविषयी कमालीचे ममत्व अजूनही टिकून आहे. पं. नेहरू यांचा कितीही द्वेष करावयाचा असला तरी ही बाब नाकारता येणारी नाही. तेव्हा त्यांच्या घराण्यातील पुढची पिढी, इंदिरेची नात म्हणून प्रियंका यांना पाहायला तरी तुडुंब गर्दी होणार. याआधीही तशी ती झाली होतीच. त्या वेळी प्रियंका केवळ दौरे करीत होत्या.

आता त्या सक्रिय आहेत. या दोहोंतील फरक केवळ वरवरचा नाही. तो सामाजिक आहे. पूर्व उत्तर प्रदेश हा सामाजिकदृष्टय़ा तुलनेने पुढारलेल्या जाती-जमातींचा आहे. हा वर्ग खरे तर भाजपचा पाठीराखा. परंतु मुख्यमंत्री अजय बिश्त ऊर्फ योगी आदित्यनाथ यांच्यामुळे तो भाजपपासून दुरावल्याचे दिसते. भाजप जेव्हा अस्तित्वात नव्हता त्या वेळी पं. नेहरू आणि कुटुंबीयांमुळे या वर्गाचा पािठबा सर्रास काँग्रेसला मिळत असे. त्याचमुळे या कुटुंबीयांचे तीनही मतदारसंघ याच प्रदेशात आहेत. फूलपुर हा पं. जवाहरलाल नेहरू आणि नंतर विजयालक्ष्मी पंडित यांचा मतदारसंघ. अलीकडच्या काळात हा वर्ग काँग्रेसला कंटाळून भाजपकडे गेला आणि त्या पक्षाचा आधारस्तंभ बनला. तथापि सद्य:स्थितीत स्थानिक राजकारणामुळे त्या वर्गाचा भाजपस असलेला पािठबा डळमळीत झाल्याचे दिसते. प्रियंका यांच्या उदयामुळे भाजपपासून सल झालेला हा वर्ग काँग्रेसकडे जाऊ शकतो. सदर प्रदेशातील काँग्रेसजनांच्या उत्साहामागे आणि त्याच वेळी भाजप गोटातील कडवट प्रतिक्रियांमागे हे कारण आहे. म्हणजे एका बाजूने भाजपवर नाराज असलेल्या दलित, मुसलमानांना आकृष्ट करण्यासाठी बसप-सप यांची युती होत असताना दुसऱ्या बाजूने उच्चवर्गीयांचा भाजपला असलेला पािठबा खिळखिळा कसा करता येईल याचा विचार यामागे दिसतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसी आणि मुख्यमंत्री योगींचा गोरखपूर हे मतदारसंघ याच पूर्व उत्तर प्रदेशातील ही बाबदेखील महत्त्वाची.

इंदिरा गांधी यांची नात आणि राजीव यांची कन्या म्हणून उच्च वर्गात जशी प्रियंका यांच्याविषयी आपुलकी आहे तशीच अत्यंत गरीब आणि मागासवर्गातही ती आहे. गत खेपेस त्यांच्या दौऱ्यास मिळणाऱ्या प्रतिसादावरूनही ते जाणवले. म्हणजेच भाजपच्या भात्यातील उच्चवर्गीयांना जशा प्रियंका आकृष्ट करू शकतात तसेच ज्यांच्याकडे गमावण्यासारखे काहीच नाही, अशा वर्गालाही त्यांचे आकर्षण आहे. ही खास भारतीय मानसिकता. म्हणजे त्या अर्थाने त्या मायावती/अखिलेश यांच्या आघाडीसमोरील आव्हान नाही तरी निदान डोकेदुखी ठरू शकतात. समाजवादी पक्षाकडे एके काळी मुसलमान मोठय़ा आशेने गेले. पण त्यांचा भ्रमनिरास झाला. उत्तर प्रदेशात २० टक्के मुसलमान आहेत. काँग्रेस अलीकडच्या काळात दाखवू लागलेली धुगधुगी आणि त्यात प्रियंका यांचे आगमन यामुळे सपाकडे असलेला उरलासुरला मुसलमान मतदार त्या पक्षास तलाक देणारच नाही असे नाही. तेव्हा त्या बाजूनेही प्रियंका यांचा निर्णय परिणामकारक ठरू शकतो. याखेरीज प्रियंका यांचे महत्त्व आहे त्यापेक्षा वाढण्यास आणखी एक घटक कारणीभूत ठरेल.

तो म्हणजे भाजपची प्रतिक्रिया. भाजपला आपल्या पक्षातील संबित पात्रा वा तत्समांना यासाठी आवरावे लागेल. कारण ज्या पद्धतीने ही मंडळी किरकिर करू लागली आहेत ते पाहता ते प्रियंका यांचे महत्त्व निश्चितच वाढवतील. एका बाजूने म्हणायचे प्रियंका येण्याने काही फरक पडणार नाही आणि तरीही ती किती निर्थक घटना आहे हेच सांगत बसायचे. असे केल्याने उलट त्या पक्षाचे भेदरलेपण दिसते. प्रियंका यांच्या आगमनाने राहुल गांधी अनुत्तीर्ण झाल्याचेच अधोरेखित होते, असेही भाजपला वाटते. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांतील निकालांनंतरही भाजपला राहुल गांधी अनुत्तीर्ण वाटत असतील तर तो त्या पक्षाच्या यश/अपयश समजून घेण्यातील दृष्टिकोनाचा प्रश्न ठरेल. आणि समजा ते अनुत्तीर्णच असतील तर एका नापासाची दखल भाजपने किती आणि का घ्यावी हादेखील प्रश्नच. राहता राहिला मुद्दा घराणेशाहीचा. सर्वच पक्षांतील नेत्यांची पुढची पिढी पाहिली तर खरे तर या मुद्दय़ाचा उल्लेख करणेदेखील वायफळ ठरते.

तेव्हा ‘सोनिया’च्या ताटीची ही ज्योत उजळणार की नाही ते कळेलच. नाही तर म्हणायला वेडय़ा बहिणीची वेडी माया.. आहेच.