सुशांतसिंह राजपूत या तरुण उमद्या कलाकाराचा अकाली मृत्यू चटका लावणारा होता. अभ्यासात निपुण असूनही सुशांतने वेगळी वाट चोखाळली. मुंबईतल्या मायावी मनोरंजन दुनियेत बस्तान बसवणाऱ्या अनेक यशोगाथा आपल्यासमोर दिसतात. पण त्यांच्या आड अपयशी ठरलेल्या हजारो शोकान्तिका आपल्यापर्यंत पोहोचतही नाहीत. सुशांतसिंहने मोजकेच पण दर्जेदार चित्रपट केले. त्यातील त्याच्या भूमिकाही गाजल्या. रविवापर्यंत तो एक यशोगाथा होता. मात्र काही तासांमध्ये शोकान्तिका बनला. त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडी याला कारणीभूत असतील वा नसतील. याप्रकरणी पुरेशी चौकशी होईल तेव्हा होईल. एक मात्र खरे. टाळेबंदीतून उद्भवलेल्या घरकोंडीमुळे, जवळपास तीनेक महिने घरांमध्येच कोंडले गेल्यामुळे (त्यात सध्या दिसू लागलेली शिथिलता ही खूप वरवरची आणि अलीकडची आहे) मनामध्ये सुरू झालेले खेळ विचित्र रूप धारण करू लागले आहेत. ‘डिजिटल दुरावे’ सांधल्याचा दावा सरकारकडून केला जात असला आणि त्यात तथ्य असले, तरी माणसा-माणसांतील संपर्काला डिजिटल संपर्काची सर कधीही येऊ शकत नाही. मानव हा सामाजिक प्राणी आहे, ही केवळ समाजविज्ञानातील व्याख्या नव्हे. समाजातील अभिसरण ही मानवाची बौद्धिक भूक आणि मानसिक गरज असते. ती बंद झाल्यास माणसे सैरभैर होतात. सुशांतसिंह गेले कित्येक दिवस एकाच घरात चार-पाच माणसांसह बंदिस्त होता. त्याच्या अकाली मृत्यूमुळे हा प्रश्न ऐरणीवर आला. पण त्याची व्याप्ती वलयांकितांपुरती मर्यादित नाहीच. सुशांतने २ जूनला इन्स्टाग्रामवर आपल्या आईविषयी लिहिले होते. तिच्या आठवणीने तो हळवा झाल्याचे स्पष्ट होते. पण हळवेपण बऱ्याचदा एकटेपणातून येते. हे एकटेपण करोनोद्भव टाळेबंदीमुळे अधिक गडद होताना दिसते. रक्ताच्या नात्यातील अनेक मंडळींना एकमेकांना भेटता येत नाही. काही बाबतींत मुले पालकांपासून दुरावली, पती-पत्नी परस्परांपासून दुरावले, भावंडे महिनोन्महिने एकमेकांना भेटू शकत नाहीत. भेटीगाठींमधून मैत्र वृद्धिंगत होते. या भेटीगाठी दुरापास्त झाल्या, तसे मैत्र अस्वस्थ होऊ लागले. हा अस्वस्थपणा कुठे घेऊन जातो हे अनेकांना कळतही नाही. अमेरिकेत वा युरोपातील प्रगत देशांत कित्येक जण घरातच निवर्तले, याला केवळ शारीरिक व्याधींचे कारण नव्हते. ते मृत्यू मानसिक विपन्नावस्थेतूनही झाल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. डिजिटल सरसकटीकरणाचा हा सोस सर्वत्र फोफावताना दिसतो आहे. ते निव्वळ पैसे चुकते करण्यापुरते राहिलेले नाही. शिक्षणाचा ऑनलाइन घोळ याच सोसाचा परिपाक. ‘माणसे कोंडलेली राहतील, तर राहू देत. एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी समक्ष भेटण्याची गरजच काय? डिजिटल माध्यमातून भेटतातच ना एकमेकांना?’ हे याचे समर्थन. पण या आभासी, कृत्रिम भेटीगाठींमुळे लाखो मने उद्ध्वस्त होत आहेत. आज डिजिटल बैठकीसाठी उपलब्ध नसण्याची सोय नाही. डिजिटल शाळेमध्ये न जाण्याची सोय नाही. हे डिजिटल सामोरे जाणे अनिवार्य बनते. मात्र, अनौपचारिक सरमिसळीचा आनंद निर्जीव, डिजिटल उपकरणांतून एका मर्यादेपलीकडे मिळू शकत नाही. टाळेबंदीचा विचार करताना बहुधा जनतेच्या शारीरिक आरोग्याचाच विचार अतिरेकाने केला गेला. पण मानसिक तुटलेपणातून येणाऱ्या दुष्परिणामांचा ना तेव्हा विचार झाला, ना आज तो होत आहे. संध्याछायेमुळे कातरलेल्या, कातावलेल्या मनांना परस्परभेटीशिवाय दुसरा समर्पक आसरा असूच शकत नाही. माणूस नावाचे डिजिटल बेट स्वबळावर जगू शकेल, पण रमू शकत नाही. रमणे कमी झाले, की जगण्याचा गंध, चव, रस कमी होत जाऊन संपतो. काही जणांसाठी तो जीवनाचा अंत असतो. सुशांतच्या बाबतीत हेच घडले असावे काय?

maharashtra Andhashraddha Nirmoolan Samiti offer cash reward for predict correctly voting
कंगना, गडकरी, राहूलना मते किती मिळतील ते अचूक सांगा, २१ लाख रुपये बक्षिस मिळवा – अंनिसचे ज्योतिषांना आव्हान
peter higgs marathi articles loksatta,
पदार्थ विज्ञानातील जादूगार…
conceit of painter whose exhibition made critics take the term Ambedkari art seriously
हे विचार, हे जगणं दृश्यात आणलं पाहिजे…
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !