03 March 2021

News Flash

चिंताजनक घसरण

रोम जळत होते, तेव्हा निरो फिडेल वाजवत होता..

मुंबई विद्यापीठ

रोम जळत होते, तेव्हा निरो फिडेल वाजवत होता.. इथे भारतातही शिक्षण क्षेत्रात काही तरी वेगळे घडते आहे. सरकार बदलले की तसे ते घडतेच; पण ‘नॅशनल इन्स्टिटय़ूशनल रँकिंग फ्रेमवर्क’च्या (एनआयआरएफ) माध्यमातून उच्चशिक्षण क्षेत्रात स्पर्धात्मकता आणण्याचा केंद्रीय मनुष्यबळ विकास विभागाचा प्रयत्न तसा स्तुत्यच म्हणायला हवा. देशभरातील शिक्षणसंस्थांची कामगिरी विविध निकषांवर तपासण्याच्या या प्रयत्नात यंदा ३३१९ संस्था सहभागी झाल्या होत्या. या सगळ्यात १५८ वर्षांची परंपरा सांगणारे मुंबई विद्यापीठ १५८व्या स्थानावरही नाही. अर्थात निरोप्रमाणे मुंबई विद्यापीठालाही करण्यासारख्या इतर अनेक अवांतर गोष्टी आहेत.. ते कधी हेलिकॉप्टर उडवण्यात रमते, तर कधी दिवाळी अंकाच्या निर्मितीत. मराठी संस्कृतीची दिवाळी अंकांची उज्ज्वल परंपरा जोपासण्यासाठी विद्यापीठाने कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्या नेतृत्वाखाली या वर्षीपासून हा उपक्रम सुरू केला. असे अनेक ‘ऑफबीट’ (की ऑफट्रॅक) उपक्रम सुरू करण्याचे श्रेय डॉ. देशमुख यांना जाते. अमेरिकेत विद्यापीठाचे संकुल सुरू करण्याचा मानसही (नव्हे उद्योग) त्यांचाच. या उपक्रमांच्या भाऊगर्दीत १६०कडे झुकलेल्या मुंबई विद्यापीठाचे ज्ञानार्जनाच्या परंपरेचे काय, असा प्रश्न एनआयआरएफच्या २०१७च्या नुकत्याच जाहीर झालेल्या क्रमवारीनंतर पडतो.  शिक्षणसंस्थांची कामगिरी तपासणाऱ्या पहिल्या १०० विद्यापीठांच्या यादीत मुंबई विद्यापीठ कुठेच नाही.  सर्व प्रकारच्या शैक्षणिक संस्थांची क्रमवारी जाहीर करण्याचा हा प्रयोग गेल्या वर्षीपासून सुरू झाला. तोपर्यंत ऐकीव माहितीचा किंवा खासगी नियतकालिकांनी अथवा वर्तमानपत्रांनी केलेल्या शिक्षणसंस्थांच्या क्रमवारीचा (त्याही अनेकदा ‘पेड’च) आधार विद्यार्थ्यांना प्रवेशाकरिता घ्यावा लागे. केंद्र सरकारने पुढाकार घेतल्यास या क्रमवारीत वस्तुनिष्ठता येईल आणि त्याचा उपयोग प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना होईल, असा विचार त्यामागे आहे. पहिल्या वर्षी फारच थोडय़ा संस्थांनी त्याला प्रतिसाद दिला. यंदा मुंबई विद्यापीठासह तीन हजारांहून अधिक संस्थांनी या प्रक्रियेत भाग घेतला, पण ज्या क्रमवारीत कोलकाता, हैदराबाद, केरळ, पंजाब अशी विद्यापीठेही सामावली जातात, त्यात आपण कुठेच कसे नाही, असा प्रश्न मुंबई विद्यापीठाच्या आजी-माजी विद्यार्थी-शिक्षकांना नक्कीच पडावा. विद्यापीठाच्या अखत्यारीत येणाऱ्या सुमारे ७०० महाविद्यालयांपैकीही केवळ सेंट झेवियर्स आणि काही व्यवस्थापन शास्त्र विषयांची महाविद्यालये वगळता फारसे कुणीच नाही. एरवी मुंबई विद्यापीठाचे स्थान कसे वर जाते आहे, हे विद्यापीठाच्या जनसंपर्क विभागाकडून आवर्जून कळविले जाते; परंतु आपल्या ‘देशी’ क्रमवारीत विद्यापीठ कुठेच का नाही, हे कळवायलादेखील विद्यापीठाला रात्रीचे नऊ वाजले. या क्रमवारीकरिता आकडेवारी सादर करताना काही तरी घोळ झाला आहे, असा जुजबी खुलासा विद्यापीठाने केला. प्रवेशापासून पदवी प्रमाणपत्र देण्यापर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर गोंधळाचीच मालिका चालविणाऱ्या आणि विद्यार्थ्यांच्या मनस्तापाला कारणीभूत ठरणाऱ्या मुंबई विद्यापीठाकडून एनआयआरएफला माहिती देताना गडबड झाली असावी, याबाबत कुणाला आश्चर्यही वाटणार नाही. अनेकदा या गोंधळी कारभारावर आम्हाला ७०० महाविद्यालयांचा पसारा कसा आवरावा लागतो, अशी सारवासारव करणारे उत्तर दिले जाते. देशाच्या आर्थिक राजधानीतील प्रमुख विद्यापीठाला या आनुषंगिक प्रश्नांना सामोरे जावेच लागते. दुर्दैवाने विद्यापीठाच्या नावाने येणारे मानमरातब झेलताना हा काटेरी मुकुट पेलण्याच्या आव्हानालाही आपल्याला सामोरे जायचे आहे, हे विद्यापीठातील अनेक उच्चपदस्थांच्या ध्यानात येत नाही. अर्थात फिडेल वाजविणे हेच आपल्या प्राधान्यक्रमावर असेल, तर त्याचे सोयरसुतक बाळगण्याचेही कारण नाही.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2017 2:36 am

Web Title: national institute ranking framework mumbai university marathi articles
Next Stories
1 आत्मपरीक्षण कोणी करायचे?
2 गेंडय़ाच्या कातडीचे अधिकार
3 न्यायालयात गुणसूत्रे..
Just Now!
X