05 August 2020

News Flash

फंड विश्लेषण : हरवले ते गवसले का?

लार्ज कॅप फंड गटात अ‍ॅक्सिस ब्ल्यू चिप फंड हा एक चांगला ‘एसआयपी’ परतावा असलेला फंड आहे

प्रतिनिधिक छायाचित्र

लार्ज कॅप फंड गटात अ‍ॅक्सिस ब्ल्यू चिप फंड हा एक चांगला ‘एसआयपी’ परतावा असलेला फंड आहे. लार्ज कॅप फंड गटात सुरुवातीच्या दोन तिमाही वगळता क्रिसीलच्या ‘टॉप टू क्वारटाइल’मध्ये आपले स्थान अबाधित राखलेला हा फंड आहे. फंडाच्या पहिल्या जाहीर नक्त मालमत्ता मूल्य अर्थात ‘एनएव्ही’पासून ५००० रुपयांच्या ‘एसआयपी’द्वारे गुंतविलेल्या १.०२ लाख रुपयांचे २६ जुलैच्या रेग्युलर ग्रोथ एनएव्हीनुसार १.९६ लाख रुपये झाले असून परताव्याचा वार्षिक दर १४.९३ टक्के आहे. राष्ट्रीय शेयर बाजाराचा ‘निफ्टी’ या योजनेचा मापदंड निर्देशांक आहे. सद्य कॅलेंडर वर्षांच्या पहिल्या दोन तिमाहीत आपापल्या मापदंड निर्देशांकांपेक्षा उजवी कामगिरी करणाऱ्या मोजक्या योजनांमध्ये अ‍ॅक्सिस ब्ल्यू चिप फंडाचा समावेश होतो. लार्ज कॅप केंद्रित समभाग गुंतविणारा हा फंड एका एकूण गुंतवणुकीच्या ३५ टक्कय़ांहून अधिक गुंतवणूक मिड कॅप समभागात करीत नाही.

‘सेबी’च्या आदेशानुसार फंडाच्या सुसूत्रीकारणामुळे या फंडाला अ‍ॅक्सिस ब्ल्यू चिप फंड ही नवीन ओळख १६ एप्रिलपासून मिळाली. हा फंड अन्य स्पर्धकांच्या तुलनेत २०१६ च्या चौथ्या (ऑक्टोबर ते डिसेंबर) तिमाहीपासून परताव्याच्या तुलनेत काहीसा मागे पडला होता. फंडाच्या सुरुवातीला गुंतवणुकीची सूत्रे चंद्रेश निगम आणि पंकज मोरारका यांच्याकडे होती. त्यानंतर फंडाच्या गुंतवणुकीची सूत्रे जिनेश गोपानी आणि आशीष नाईक यांच्याकडे होती. फंड घराण्याने नोव्हेंबर २०१६ मध्ये या फंडाची धुरा श्रेयस देवलकर यांच्याकडे सोपविली. श्रेयस देवलकर हे या फंड घराण्याच्या या योजनेबरोबर अ‍ॅक्सिस मिड कॅप आणि अ‍ॅक्सिस मल्टी-कॅप या अन्य दोन फंडांचे निधी व्यवस्थापक आहेत. नवीन फंड व्यवस्थापकांनी केलेल्या बदलांचे परिणाम दिसू लागले असून जनेवारी २०१७ ते जून २०१८ या कालावधीतील स्पर्धक फंड एसबीआय ब्ल्यू चिप, आदित्य बिर्ला सन लाईफ फ्रंटलाईन इक्विटी फंड, इन्व्हेस्को लार्ज कॅप, यूटीआय इक्विटी फंड, एचडीएफसी इक्विटी यांच्यापेक्षा या फंडाची कामगिरी सरस ठरली आहे. १ जानेवारी २०१८ पासून (‘इयर टू डेट’) या फंडाने ‘निफ्टी’च्या ६.७६ टक्के परताव्याच्या तुलनेत १२.२६ टक्के भांडवली लाभाच्या बळावर हा फंड लार्ज गटात अव्वल कामगिरी करणारा फंड ठरला आहे.

फंड निवडताना ‘ट्रु टू लेबल’ हा निकष महत्त्वाचा असतो. अनेकदा निधी व्यवस्थापक अधिक परताव्याच्या हव्यासापोटी अनेक अनुसूचित प्रथा पाडत असतात. याचे ताजे उदाहरण सध्या मालमत्तेत प्रथम क्रमांकावर असलेल्या फंड घराण्याने अनेक फंडात आपल्याच ईटीएफच्या युनिट्समध्ये केलेली गुंतवणूक. सक्रिय पोर्टफोलिओ व्यवस्थापनासाठी शुल्क आकारणाऱ्या या फंडात ईटीएफची गरज काय याचे उत्तर हे फंड घराणे देत नाही. मागील दोन वर्षांत अनेक निधी व्यवस्थापकांनी परतावा वाढविण्यासाठी मिड कॅप समभागात गुंतवणूक केली. समभागांच्या वर्गीकरणाबाबत ‘सेबी’च्या नवीन नियमांनुसार २९,२६३ कोटी रुपयांपेक्षा अधिक भांडवली मूल्य असलेल्या कंपन्या लार्ज कॅप गटात मोडतील. या फंडाच्या वर्गीकरणाच्या आधीन म्हणजे ‘ट्रु टू लेबल’ प्रकारात मोडणारी आहे. गुंतवणूकअसलेल्या समभागांपैकी २९ समभाग लार्ज कॅप गटात तर ३५ समभाग ७५०० कोटींपेक्षा अधिक भांडवली मूल्य असलेले मिड कॅप गटातील आहेत. फंड व्यवस्थापनाने सध्या बँक, वित्तीय कंपन्या, वाहन उद्योग आणि पूरक उत्पादने तसेच माहिती तंत्रज्ञान ही सर्वाधिक गुंतवणूक असलेली उद्योग क्षेत्रे निश्चित केली आहेत. १५ टक्के गुंतवणूक अल्प मुदतींच्या रोख्यांत रोख स्वरूपात गुंतविलेली आहे.

एचडीएफसी, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, लार्सन अँड टुब्रो, रिलायन्स इंडस्ट्रीज या समभागात फंडाची मोठी गुंतवणूक आहे. मागील महिन्याभरात फंडाने भारती एअरटेल आणि टेक महिंद्रा या कंपन्यांना वगळले असून या काळात कोणत्याही नवीन समभागाचा अंतर्भाव केलेला नाही. १ जानेवारीपासून निफ्टीने ६.७६ टक्के वाढ नोंदविली असली तरी अनेक लार्ज कॅप फंडांच्या गुंतवणुकीवर तोटा होत असल्याने गुंतवणूकदार चिंताग्रस्त आहेत.

अनेकांच्या मनात ‘एसआयपी’ बंद वगैरे करण्याचे विचार पिंगा घालत आहेत. ‘एसआयपी’ बंद करावी किंवा कसे हा स्वतंत्र लेखाचा विषय असला तरी जर कोणी ‘एसआयपी’ हरविलेल्या परताव्याअभावी बंद केली असेल त्यांनी या फंडाचा ‘एसआयपी’साठी जरूर विचार करावा. कदाचित हरवलेला परताव्याचा दर चार पाच वर्षांत सापडेल सुद्धा..

अ‍ॅक्सिस ब्ल्यू चिप फंड

लार्ज कॅप फंड

*  फंडाची पहिली एनएव्ही:  ५ जाने. २०१०

*  सध्याची एनएव्ही  (२७ जुलै २०१८ रोजी)

वृद्धी पर्याय      : २८.५३ रु.

लाभांश पर्याय   : १६.७२ रु.

(तपशील रेग्युलर ग्रोथ योजनेचा)

*  संदर्भ निर्देशांक  :    निफ्टी ५००  टीआरआय

*  किमान एसआयपी    :      १,००० रुपये

*  किमान गुंतवणूक     :      ५,००० रुपये

*  पोर्टफोलिओ पी/ई     :      ४१.६८

*  पोर्टफोलिओ बीटा     :       ०.८४

*  प्रमाणित विचलन    :         ०.६२

*  एग्झिट लोड :

३६५ दिवसांआधी १ टक्का;

३६५ दिवसांनंतर लोड नाही

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 30, 2018 1:03 am

Web Title: fund analysis axis bluechip fund axis mutual fund
टॅग Mutual Fund
Next Stories
1 बाजाराचा तंत्र कल : ‘दिसते मजला सुखचित्र नवे’
2 माझा पोर्टफोलियो : व्यवस्थादृष्टय़ा मोलाची साखळी
3 क.. कमोडिटीचा  : उसाच्या प्रश्नावर इथेनॉलचा उतारा
Just Now!
X