केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) आयकर परतावा भरण्याला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. गुरूवारी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने याबाबात माहिती दिली. आयकर परतावा भरण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली असून आता 31 ऑक्टोबरपर्यंत आता आयकर परतावा भरता येणार आहे.

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने यासंदर्भात माहिती दिली असून ही मुदतवाद केवळ ज्यांच्या आयकर खात्यांसाठी लेखापरीक्षणाची आवश्यकता आहे त्यांनाच देण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. तर केवळ आयकर परतावाच नाही तर टॅक्स ऑडिट रिपोर्ट जमा करण्यासाठीही मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी टॅक्स ऑडिट रिपोर्ट जमा करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर होती. तीदेखील वाढवून 31 ऑक्टोबर करण्यात आली आहे.

आयकर कायद्याच्या कलम 44 एबी अंतर्गत ज्या कंपन्यांच्या आयकर परताव्याचे परीक्षण केले जाते त्याच कंपन्यांना ही मुदतवाढ लागू होणार आहे. या कंपन्यांच्या खात्यांचा परतावा दाखल करण्यापूर्वी त्यांचे लेखापरीक्षण होणे आवश्यक असते.