मुंबई : कोटय़वधींची देणी थकलेल्या ‘डीएचएफएल’वर म्युच्युअल फंड व्यवसायातून बाहेर पडण्याची वेळ येऊन ठेपली आहे. कंपनी तिच्या फंड क्षेत्रातील दोन उपकंपन्यांमधील संपूर्ण हिस्सा विकण्याच्या तयारीत आहे.

डीएचएफएल प्रामेरिका अ‍ॅसेट मॅनेजर्स व डीएचएफएल प्रामेरिका ट्रस्टी या दोन उपकंपन्यांमध्ये डीएचएफएलची प्रत्येकी ५० टक्के भागीदारी आहे. या भागीदारीतून पूर्णपणे बाहेर पडण्यासाठी कंपनीने ‘सेबी’कडे केलेल्या अर्जाला होकारार्थी परवानगी मिळाली आहे. परिणामी, दोन्ही उपकंपन्यांमधील पूर्ण हिस्सा लवकरच विकण्यात येईल, अशी माहिती डीएचएफएलने बुधवारी भांडवली बाजाराला दिली.

डीएचएफएलच्या म्युच्युअल फंड कंपनीमार्फत ७,६२७ कोटी रुपयांचे मालमत्ता व्यवस्थापन हाताळले जाते. देशातील विविध ४२ फंड घराण्यांमध्ये या कंपनीचे १० वे स्थान असून डीएचएफएल बाहेर पडल्यानंतर कंपनीवर अमेरिकेच्या प्रुडेन्शिअल फायनान्शियलचा पूर्ण ताबा असेल.

डीएचएफएलने गुंतवणूकदारांचे ३७५ कोटी रुपये विहित मुदतीत फेडता न आल्याचे उघडकीस आले आहे. पैकी १५० कोटी रुपये मुदतवाढ मिळवत तिने फेडले. कंपनीने अद्यापही २२५ कोटी रुपयांची देणी थकविली आहेत.

यापूर्वी अपरिवर्तनीय रोख्यांची ८५० कोटींची रक्कम देण्यास कंपनी अयशस्वी ठरली. परिणामी, क्रिसिलने संबंधित रोख्यांचे पतमानांकनही कमी केले होते. अतिरिक्त रोकड उपलब्ध होताच उर्वरित देणी लवकरच फेडली जातील, असे कंपनीने म्हटले आहे.