केंद्र सरकारने छोटया बचत योजनांवरील व्याजदरात कपात केली आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेली बचत योजना, पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC), किसान विकास पत्र, सुकन्या समृद्धी योजना आणि रिकरींग डिपॉझिट खात्यांच्या व्याजदरात कपात करण्यात आली आहे.
२०२०-२१ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीसाठी वरील बचत योजनांमध्ये ०.७ टक्के ते १.४ टक्के कपात करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या बचत योजनांवरील व्याजदरात ८.६ टक्क्यांवरुन ७.४ टक्के कपात करण्यात आली आहे. आजपासून अंमलात आलेली ही व्याजदर कपात ३० जूनपर्यंत म्हणजे पहिली तिमाही संपेपर्यंत कायम राहणार आहे.
मागच्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत पीपीएफ वरील व्याजदरात ७.९ टक्क्यावरुन ७.१ टक्क्यापर्यंत कपात करण्यात आली होती. तीच कायम राहणार आहे. छोटया बचत योजनांवरील व्याजदर तिमाहीनुसार ठरवण्यात येणार आहेत.
– खास मुलींसाठी असलेल्या सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर ७.६ टक्के असेल. आधी हाच व्याजदर ८.४ टक्के होता.
– राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रावरील व्याजदर ७.९ टक्क्यावरुन ६.८ टक्के करण्यात आला आहे. किसान विकास पत्रावरील व्याजदर ७.६ टक्क्यावरुन ६.९ टक्के करण्यात आला आहे.
– एक ते तीन वर्षांपर्यंतच्या मुदत ठेवींवर ६.९ टक्क्यावरुन ५.५ टक्के व्याज मिळणार आहे.
– पाचवर्षांच्या मुदत ठेवींवर आधी ७.७ टक्के व्याज मिळत होते. ते आता ६.७ टक्के व्याज मिळेल. रिकरिंग डिपॉझिटवरील व्याजदरात १.४ टक्के कपात करण्यात आली आहे. पाच वर्षांच्या रिकरिंग डिपॉझिटवर ७.२ टक्केऐवजी ५.८ टक्के व्याज मिळेल.