सार्वजनिक क्षेत्रातील राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळाच्या (एनटीपीसी) करमुक्त रोखे विक्रीला मुदतीपूर्वीच प्रतिसाद मिळाला असून पहिल्याच दिवशी विक्रीचा ११.०४ पटीने भरणा झाल्याने प्रक्रिया थांबविण्यात आली.

७०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीसाठी उपलब्ध असताना दोन दिवसात ४,४०० कोटी रुपयांची मागणी नोंदविली गेली. बुधवारपासून सुरू झालेली ही रोखे विक्री प्रत्यक्षात ३० सप्टेंबपर्यंत सुरू राहणार होती.
द्वैमासिक पतधोरणाद्वारे रिझव्‍‌र्ह बँकेकडून महिनाअखेर होणारी संभाव्य व्याजदर कपात व सर्वोच्च पतधारण करणाऱ्या रोख्यांची बाजारातील कमतरता या पाश्र्वभूमीवर गुंतवणूकदारांनी रोखे विक्रीला प्रतिसाद दिल्याचे मानले जात आहे.
कंपनीने हाती घेतलेल्या एकूण १,००० कोटी रुपयांच्या रोखे विक्रीमधील उर्वरित ७०० कोटी रुपयांची रोखे विक्री अवघ्या एका दिवसातच पार पडली. ३०० कोटी रुपयांची रोखे विक्री प्रक्रिया काही आठवडय़ांपूर्वीच पूर्ण झाली आहे.