मंगळवारच्या सत्रअखेरची तेजी दुसऱ्या दिवशीच्या व्यवहारांभी कायम राखणाऱ्या भांडवली बाजारांच्या प्रमुख निर्देशांकांनी बुधवारची अखेर मात्र घसरणीने केली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सत्राच्या शेवटी मंगळवारच्या तुलनेत १७३.२५ अंशांनी घसरून २९,८९३.९६ वर स्थिरावला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी दिवसअखेर ४३.४५ अंश घसरणीसह ८,७४८.७५ पर्यंत बंद झाला.

करोनाबाधितांच्या तसेच बळींच्या वाढत्या संख्येने गुंतवणूकदारांमध्ये पुन्हा धास्ती निर्माण झाली आहे. त्याचबरोबर येत्या आठवडय़ात संपुष्टात येणाऱ्या टाळेबंदीचा कालावधीत वाढण्याची शंकाही घसरणीला निमित्त ठरली आहे.

बुधवारच्या सत्राची सुरुवातच तेजीसह करताना पहिल्या अर्ध्या तासातच मुंबई निर्देशांक ३० हजारापुढे पोहोचला. तर तासाभरात त्याने ३१ हजारापलिकडील टप्पा गाठला. या दरम्यान तो ३१,२२७.९७ पर्यंत झेपावला होता. यानंतर मात्र निर्देशांकात घसरण सुरू होऊन सत्रअखेर मंगळवारच्या तुलनेत नकारात्मक राहिली. सेन्सेक्सचा सत्रतळ ३० हजाराच्या काठावर होता. व्यवहाराच्या वरच्या टप्प्यापासून मुंबई निर्देशांकांने सत्रअखेर १,३०० अंशांचा घसरणफरक नोंदविला.

बुधवारी घसरलेल्या सेन्सेक्समध्ये टाटा समूहातील टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेस सर्वाधिक, ३.९१ टक्के मूल्य घसरणीसह अग्रणी राहिला. त्याचबरोबर टायटन कंपनी, आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक, आयटीसी, भारती एअरटेलचे मूल्यही जवळपास याच प्रमाणापर्यंत घसरले. तर सन फार्मा, एनटीपीसी, इंडसइंड बँक, बजाज फायनान्स यांचे मूल्य वाढले.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये स्थावर मालमत्ता, ग्राहकोपयोगी वस्तू, माहिती तंत्रज्ञान, दूरसंचार, बँक निर्देशांक घसरले. तर आरोग्यनिगा, वाहन तसेच बहुपयोगी क्षेत्रीय निर्देशांक मात्र काही प्रमाणात वाढले. मुंबई शेअर बाजारातील मिड कॅप व स्मॉल कॅप प्रत्येकी जवळपास २ टक्क्य़ांपर्यंत वाढले.

रुपयाचा ऐतिहासिक तळ

मुंबई : डॉलरच्या तुलनेत रुपयाने बुधवारी त्याचा ऐतिहासिक नीचांक नोंदविला. परकीय चलन विनिमय मंचावर स्थानिक चलन एकाच व्यवहारात तब्बल ७० पैशांनी आपटले. रुपया सत्रअखेर ७६.३४ पर्यंत खाली आला. भारतातील टाळेबंदीचा कालावधी विस्तारला जाण्याची धास्ती भांडवली बाजाराप्रमाणे परकीय चलन विनिमय मंचावरही उमटली.