म्युच्युअल फंडाबाबत, विशेषत: नियमित व दीघरेद्देशी गुंतवणुकीची शिस्त लावणाऱ्या एसआयपी (‘सिप’) सामान्य गुंतवणूकदारांमध्ये सजगता वाढत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. सरलेल्या एप्रिल २०१६ अखेर नियमित ‘सिप’ सुरू असलेल्या खात्यांच्या संख्येने गाठलेला ४ कोटी ८० लाखांचा टप्पा आणि केवळ एप्रिल महिन्यांत नव्याने सुरू झालेली ४.०९ लाख नवीन खाती याचा पुरेपूर प्रत्यय देतात. निश्चित केलेल्या दूरचे आर्थिक लक्ष्य गाठण्यासाठी ‘सिप’ हा सर्वोत्तम उपयुक्त पर्याय ठरत आहेच, परंतु हे उद्दिष्ट लवकर गाठायचे झाल्यास ‘सिप टॉप-अप’ गुंतवणुकीचे आणखी एक साधन बनून पुढे आले आहे.
आर्थिक नियोजनाची पहिली पायरी म्हणजे आपले आर्थिक उद्दिष्ट पक्के करणे. म्हणजेच निश्चित केलेल्या जबाबदाऱ्या व लक्ष्यांसाठी जसे, मुलांचे शिक्षण, स्व-मालकीचे घर, सेकंड होम, दुचाकी वा चारचाकी वाहन, परदेशात सहल, निवृत्तिपश्चात जीवनमानासाठी तजवीज वगैरे व तत्सम कारणासाठी निश्चित स्वरूपाची पुंजी उभी करीत गेले पाहिजे. बचत आणि गुंतवणुकीतून या निश्चित केलेल्या उद्दिष्ट रकमेची उभारणी करण्याचा ‘सिप’ हे महत्त्वाचे साधन आहे. आणि या ‘सिप’ला टॉप-अपची जोड देणे म्हणजे ‘सिप’च्या रकमेत दरसाल उत्पन्नात होणाऱ्या वाढीप्रमाणे (वेतनात होत जाणाऱ्या वाढीनुसार) वाढवत नेणे होय.
आयसीआयसीआय प्रुडेन्शियल अॅसेट मॅनेजमेंट कंपनी या सध्याच्या घडीला देशातील ४३ म्युच्युअल फंड घराण्यात सर्वाधिक गुंतवणूक मालमत्तेचे व्यवस्थापन पाहणाऱ्या फंड घराण्याने ही ‘सिप टॉप-अप’ सुविधा आपल्या गुंतवणूकदारांना देऊ केली आहे. येत्या १५ जून २०१६ पासून अमलात येणाऱ्या या सुविधेत गुंतवणूकदार त्यांच्या सध्याच्या ‘सिप’ रकमेत ५ टक्के आणि त्या पटीत वाढीचा पर्याय निवडू शकतील.
तुमचे उत्पन्न जसे वाढत जाते तसा तुमच्या बचतीतील गुंतवणुकीचा टक्काही वाढत जाणे अपेक्षित असते. वेतनवाढीसरशी घडेलच याची खात्री देता येत नसल्याने, गुंतवणूकदारांसाठी ही टॉप-अपची सुविधा उपयुक्त  ठरेल. जसे दरमहा विशिष्ट तारखेला तुमच्या बँक खात्यातून ‘सिप’ची रक्कम वळती केली जात असते, त्याचप्रमाणे प्रत्येक वर्षी विहित प्रमाणात या रकमेत वाढीची सूचना तुमच्या फंड व्यवस्थापन कंपनीला देता येईल. म्हणजे सध्या जर दरमहा ५,००० रुपयांची तुमची ‘सिप’ सुरू असेल आणि तुम्ही १० टक्के टॉप-अपचा पर्याय निवडल्यास, पुढील वर्षी एप्रिलपासून दरमहा ‘सिप’चे प्रमाण ५,५०० रु. तर त्यानंतरच्या वर्षांतील एप्रिलपासून ते ६,०५० रुपये असे तुम्ही निश्चित केलेल्या वर्षांपर्यंत सुरू राहील. तुमच्या आर्थिक लक्ष्यापर्यंत द्रुतगतीने पोहोचणारी वाटच यातून खुली होईल.
’  निमेश शाह,
कार्यकारी संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी,
आयसीआयसीआय प्रुडेन्शियल एएमसी
‘सिप’च्या माध्यमातून होणाऱ्या गुंतवणुकीला जसे चक्रवाढीचे बळ मिळून संपत्ती निर्माण घडते, तर साध्या ‘सिप टॉप-अप’ या गुंतववणुकीला अधिक प्रभावी आणि चमकदार वळण दिले जाते. उदाहरणच द्यायचे झाल्यास आयसीआयसीआय प्रुडेन्शियल व्हॅल्यू डिस्कव्हरी फंडात तुम्ही दरमहा ५,००० रुपयांची ‘सिप’ केल्यास, १० वर्षांत तुमची गुंतवणूक ६ लाख इतकी होईल. गत १० वर्षांतील या फंडाच्या कामगिरीचा निकष लावल्यास, या १० वर्षे सुरू राहिलेल्या ‘सिप’ गुंतवणुकीतून तुम्ही १६,६६,१०० रुपयांचे गुंतवणूक मूल्य उभे केले असते. बरोबरीने जर तुम्ही दरसाल १० टक्के टॉप-अपची या गुंतवणुकीला जोड दिली असती तर फंडातील तुमची १० वर्षांतील एकूण गुंतवणूक ९,५६,२४६ रुपये असती आणि तुम्ही उभे केलेले गुंतवणूक मूल्य हे २३,४५,१२१ रुपये इतके असते. म्हणजे सामान्य ‘सिप’च्या तुलनेत तुमच्या कमाईत ६,७९,०२१ रुपयांची भर घालणारी किमया साधली जाते.
’  पंकज मठपाल,
मुंबईस्थित प्रमाणित गुंतवूक सल्लागार