माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील टीसीएस आणि इन्फोसिस या दोन कंपन्यांनी स्वतंत्रपणे आयटी उद्योग क्षेत्रासाठी विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ) स्थापित करण्याचे सादर केलेल्या प्रस्तावांवर येत्या शुक्रवारी केंद्र सरकारकडून निर्णय घेतला जाणे अपेक्षित आहे. दोन्ही कंपन्यांचा पुण्यात सेझ प्रकल्प सुरू करण्याचा प्रस्ताव आहे.

सेझ प्रकल्पासंबंधी निर्णय घेणाऱ्या सरकारमधील सर्वोच्च मंडळ ‘बोर्ड ऑफ अप्रूव्हल’ने १५ नोव्हेंबरला नियोजित बैठकीत या संबंधाने निर्णय होणे अपेक्षित आहे. या आंतर मंत्रिगट स्तरावरील मंडळाचे अध्यक्षपद वाणिज्य मंत्रालयाच्या सचिवाकडून केले जाते. इन्फोसिसने पुणे आणि कांचीपुरम येथे ‘सेझ’ प्रकल्प स्थापण्याचे, तर टीसीएसने तामिळनाडूसह पुण्यात आयटी सेझ स्थापण्याचा प्रस्ताव दिला असून, तो शुक्रवारच्या बैठकीच्या विषयपत्रिकेवर आहे.

इन्फोसिसने पुण्यात १० हेक्टर जागेवर, ३६१.५३ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून, तर टीसीएसने ९०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून हे प्रकल्प साकारणार असल्याचे नियोजन सादर केले आहे. यातून १२,००० प्रशिक्षितांना रोजगाराच्या संधी मिळणार आहे. दोन्ही प्रकल्पांना हिरवा कंदील मिळून, ३१ मार्च २०२० पासून व्यावसायिक कार्यान्वयाची अपेक्षा आहे.