सुहास सरदेशमुख

औषध निर्मितीतील चीनवरील अवलंबित्व कमी करून भारतीय औषधी कंपन्यांकडून ७० टक्के आयातपर्यायी पुरवठा जरी आता सुरळीत होत असला तरी औषधांच्या किमतीमध्ये काहीशी वाढ होऊ शकते, असे सांगण्यात येत आहे. औरंगाबादमध्ये विविध प्रकारची ५४ औषधे तर वैद्यकीय उपकरणांसह ७९ कंपन्यांची नोंदणी आहे. सर्व कंपन्यांचे उत्पादन चिनी आयातीविना आता मूळ पदावर येत आहे.

सीमेवरील ताज्या हिंसक संघर्षांला तोंड फुटण्यापूर्वीच, चीनमधून आयात होणाऱ्या घटकांवरील मदार कमी करण्यासाठी भारतीय औषध उद्योगात प्रयत्न सुरू झाले असून, त्यांनी आता वेग धरल्याचे दिसत आहे.

पॅरासिटॅमोलसह विविध प्रतिजैविकांमध्ये लागणारे घटक मिळण्यामध्ये अडचणी निर्माण होत होत्या. मात्र, आता बहुतांश कंपन्यांमध्ये सारे सुरळीत असल्याचा दावा अन्न व औषधी प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. मात्र उत्पादन खर्च वाढण्याची शक्यता मराठवाडा फार्मा क्लस्टरचे अध्यक्ष व सेवरा ग्रुपचे कमांडर अनिल सावे यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, ‘चीनमधील कार्यप्रणाली व कामगार उपलब्धता यामुळे तेथील औषधी घटक हे स्वस्त होते. आता त्या जागी स्वदेशी पर्याय वापरल्याने उत्पादन खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे.’ घटक पदार्थाच्या किमती बदलल्या तरी मूळ किमतीवर सरकारचे नियंत्रण असते.

औरंगाबाद शहरात नामांकित ल्युपिन, वॉखार्ट, कॅडिला, अजंता फार्मा यासह विविध कंपन्यांचे उत्पादन होते. त्यांचा कारभार आता सुरळीत झाला आहे. पहिल्या टप्प्यातील टाळेबंदीमध्ये अनेकजण घाबरले होते. पुरवठा विस्कळीत असला तरी उत्पादन सुरू होते. टाळेबंदीत शिथिलतेनंतर वाहन परवाना घेतल्यानंतर कारभार सुरू झाल्यानंतर चीनमधून येणाऱ्या औषधांमधील घटकांची कमतरता होती.  ‘भारतीय कंपन्यांनी प्रतिजैविकांमध्ये लागणारे घटक आणि तापाच्या औषधासाठी लागणारे पॅरासिटॅमोल आदी मिळत आहे. काही दिवस सॅनिटायझरच्या बाटलीला लागणारा २८ मिमीचा पंप मिळत नव्हता. अन्यही औषधींमध्ये लागणारे घटक आता भारतीय कंपन्या मोठय़ा प्रमाणात बनवत आहेत. मात्र, येत्या काही महिन्यात औषधांची मागणी चढीच राहील, असे गृहीत धरून उत्पादन वाढविले जात असल्याचेही कमांडर सावे यांनी सांगितले. कोविड-१९ आजारासाठी लागणाऱ्या सर्व औषधांचा पुरेसा साठा असल्याचे अन्न व औषध विभागाचे संचालक संजय काळे यांनी सांगितले.

तरी किंमतवाढ नाही!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

औरंगाबादमध्ये पॅरासिटॅमोल, अ‍ॅझिथ्रोमायसीन यासह विविध प्रतिजैविके तयार होतात. चिनी आयातीवरील अवलंबित्वावर मात करीत वैद्यकीय उपकरणेही तयार होतात. यातून उत्पादन खर्च वाढणार आहे. औषधांच्या किमतीवर सरकारचे नियंत्रण असते. जसे पॅरासिटॅमोलच्या दहा गोळ्यांची किंमत १६.८० रुपयांपेक्षा अधिक असणार नाही, असे ठरवून दिले आहे. आयातपर्यायी उत्पादनाने खर्च वाढला तरी औषधांच्या किमती मात्र वाढणार नाहीत.