scorecardresearch

प्रायव्हेट कंपन्यांमध्ये काम करणाऱ्यांसाठी गुड न्यूज… लवकरच मिळणार घसघशीत पगारवाढ; IT कर्मचारी होणार मालामाल

एऑन ही आंतरराष्ट्रीय स्तरावर कंपन्यांसंदर्भात सर्वेक्षण करणारी फर्म असून त्यांनी नुकताच एक अहवाल जाहीर केलाय. या अहवालामध्ये हा अंदाज व्यक्त करण्यात आलाय.

प्रायव्हेट कंपन्यांमध्ये काम करणाऱ्यांसाठी गुड न्यूज… लवकरच मिळणार घसघशीत पगारवाढ; IT कर्मचारी होणार मालामाल
सर्वेक्षणामधून व्यक्त करण्यात आलाय अंदाज

करोनाच्या प्रादुर्भावानंतर आर्थिक संकटांचा सामना करणाऱ्या खासगी क्षेत्रातील नोकरदारवर्गासाठी एक आनंदाची बातमी आहे. २०२२ सालामध्ये खासगी क्षेत्रातील कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना सरासरी ९.४ टक्के पगारवाढ देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. असं खरोखर झाल्यास मागील चार वर्षांमधील ही सर्वात मोठी सरासरी वेतनवाढ ठरणार आहे. करोनानंतर पूर्वपदावर येत असणारं अर्थचक्र आणि कौशल्य असणाऱ्या कामगारांना आपल्या कंपनीमध्ये नोकरी देण्यासाठी कंपन्यांमधील स्पर्धा पाहता एट्रिशन रेट हा २० टक्क्यांपर्यंत असेल असा अंदाज व्यक्त केला जातोय. त्यामुळेच सरासरी वेतनामध्येही मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

एऑनने जारी केलेल्या वार्षिक वेतनासंदर्भातील सर्वेक्षमामध्ये पुढील वर्षात सरासरी वेतनवाढ ही ९.४ टक्के असेल असा अंदाज व्यक्त केलाय. यापूर्वी २०१८ मध्ये खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना सरासरी ९.५ टक्के पगारवाढ मिळाली होती. यंदाही सरासरी पगारवाढ ही ८.८ टक्के राहीली आहे. ही पगारवाढ ७,७ टक्के असेल असा अंदाज व्यक्त केला जातोय. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनचे निर्बंध उठवण्यात आल्यानंतर आर्थिक गाडा पुन्हा सुरु झाला असून अनेक कंपन्यांनी पुन्हा आपलं दैनंदिन काम सुरु केल आहे. त्यामुळेच कामगारांची मागणी आणि पगारवाढीवरही याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. २०२२ म्हणजेच पुढील सहा महिन्यांमध्ये ही पगारवाढ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. अनेक कंपन्या या नवीन वर्ष आपआपल्या धोरणांप्रमाणे निश्चित करत असल्याने जानेवारीपासून साधारणपणे वेगवेगळ्या क्षेत्रातील कंपन्या कर्मचाऱ्यांनी मागील वर्षी केलेल्या कामाच्या आधारे पगारवाढीचा निर्णय घेताना दिसतात.

एऑन ही आंतरराष्ट्रीय स्तरावर कंपन्यांसंदर्भात सर्वेक्षण करणारी फर्म आहे. त्यांनी केलेल्या या सर्वोक्षणामध्ये ३९ वेगवेगळ्या क्षेत्रांमधील १३०० हून अधिक कंपन्यांची माहिती गोळा करण्यात आल्यानंतर अहवाल सादर करण्यात आलाय. सर्व माहिती गोळा करुन त्याचं सखोल विश्लेषण केल्यानंतरच पगारवाढीसंदर्भातील अंदाज बांधण्यात आलीय. सर्वेक्षणामध्ये पुढील वर्षी माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये ११.२ टक्के सरासरी पगारवाढ होण्याची शक्यता असून हे सर्वाधिक पगारवाढ होणारं क्षेत्र ठरणार आहे. त्यानंतर प्रोफेश्नल सर्व्हिसेस देणाऱ्या आणि ई-कॉमर्स सेक्टरमधील कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांनाही मोठा लाभ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. या दोन्ही क्षेत्रामध्ये सरासरी पगारवाढ ही १०.६ टक्के राहील असं अंदाज आहे. तसेच रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांना ८.८ टक्के सरासरी पगारवाढ मिळणार असल्याचं या सर्वेक्षणात म्हटलं आहे. रिअल इस्टेटसंदर्भातील आकडेवारी तुलनेने कमी वाटत असली तरी मागील काही वर्षांमध्ये या क्षेत्रातील सरासरी पगारवाढ ही ६.२ टक्के राहिली आहे. म्हणजेच २०२२ मध्ये रिअल इस्टेट क्षेत्रातील पगार हे सामान्य सरासरीपेक्षा २.६ टक्के अधिक प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व अर्थसत्ता ( Arthasatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-09-2021 at 16:52 IST

संबंधित बातम्या