सर्वोच्च शिखरापासून माघार घेत सेन्सेक्सने मंगळवारी १०८.४१ अंश घसरण दाखविली. यामुळे गेल्या सलग पाच सत्रांत वधारणारा मुंबई निर्देशांक आता २१,८२६.४२ वर येऊन ठेपला आहे.
ऐतिहासिक टप्प्यावरील नफेखोरी गुंतवणूकदारांनी अनुभवल्यानंतर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही २५.३५ घसरून ६,५११.९० पर्यंत खाली आला आहे. दरम्यान, चलन बाजारातील व्यवहारानेही भांडवली बाजाराला साथ देत गेल्या पाच व्यवहारांपासून वधारणाऱ्या रुपयाला मंगळवारी घसरण नोंदविण्यास भाग पाडले. अमेरिकी डॉलरच्या समोर स्थानिक चलन ९ पैशांनी कमी होत ६१ नजीक, ६०.९४ रुपयांवर मंगळवारअखेर स्थिरावले. दिवसाच्या व्यवहारात मात्र रुपयाने १२ ऑगस्ट २०१३ नंतरचा ६०.५९ हा उच्चांक नोंदविला. सेन्सेक्सने मंगळवारच्या सुरुवातीच्या व्यवहारात २२,०१८ हा सर्वोच्च टप्पा गाठला. निफ्टीही या वेळी ६,५६२.८५ या सत्राच्या नव्या उच्चांकावर विराजमान झाला. मात्र यानंतर जाहीर झालेल्या घसरलेल्या फेब्रुवारीतील निर्यातीच्या आकडेवारीमुळे भांडवली बाजारावर दबाव निर्माण झाला. सलग दोन दिवस २२ हजारांपर्यंत पोहोचणाऱ्या सेन्सेक्सने तेजीतील पाच व्यवहारांत ९८८ अंशांची कमाई केली होती. दिवसअखेर मात्र एकूण मुंबई निर्देशांकासह सेन्सेक्समधील १८ कंपन्यांचे समभाग घसरले. टाटा स्टील, हिंदाल्को या पोलाद कंपन्यांना सर्वाधिक ५.५ टक्क्यांपर्यंत फटका बसला. एकूण हा क्षेत्रीय निर्देशांकही ३.४ टक्क्यांसह घसरणीत आघाडीवर राहिला.