सुहास सरदेशमुख

करोनाच्या भीतीमुळे सार्वजनिक वाहतुकीऐवजी स्वत:चे वाहन घेण्याकडे कल वाढला असून ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या मधील गेल्या १५ दिवसात दुचाकी आणि छोटय़ा चारचाकीच्या विक्रीमध्ये वाढ दिसून येत आहे. ही वाढ करोनापूर्व काळाएवढी असून काही मोटारींची नोंदणी केल्यानंतर ती मिळण्यास तब्बल १५ ते २० दिवसाचा प्रतीक्षा कालावधी लागत आहे. ऑटोमोटिव्ह क्षेत्रातील ही वाढ आशादायक असल्याचे उद्योजक सांगत आहेत. दरम्यान ‘फेडरेशन ऑफ ऑटोमोटिव्ह डिलर असोसिएशन’च्या वतीने ऑगस्ट महिन्यात आठ लाख ९८ हजार ७७५ दुचाकींची विक्री झाली आणि गेल्या वर्षीच्या ऑगस्टमधील तुलनेत ही विक्री २८ टक्केहून कमी आहे. पण छोटय़ा मोटारी घेण्याचे प्रमाणही वाढत आहे. दुचाकी आणि मोटार विक्री क्षेत्रातील मानसिंग पवार म्हणाले,‘ गेल्या सहा महिन्यापैकी पहिले तीन महिने विक्री शून्य होती. मात्र, आता करोनापूर्व विक्रीचा वेग गाठला जात आहे. पाच लाख ते सात लाख रुपये किमतीच्या चारचाकी गाडय़ांची विक्री वाढली आहे.’

करोनामुळे सार्वजनिक वाहनातून प्रवास करण्यास अनेक जण घाबरत आहेत. स्वत:चे वाहन असल्यास अधिक सुरक्षित राहू शकतो अशी मानसिकता निर्माण झाली आहे. दुचाकी असल्यास किंवा छोटी मोटार असेल तर एकटय़ाला किंवा घरातील सदस्यांना घेऊन प्रवास करणे सुकर होऊ शकते. त्यामुळे मागणी वाढली आहे. दसरा, दिवाळीच्या तोंडावर ही स्थिती असते. मात्र, गेल्यावर्षी बीएस-४ इंजिन आणि प्रदूषणामुळे इंजिन बदलावे, असे केंद्र सरकारचे निर्णय असल्याने मंदीसदृश स्थिती निर्माण झाली होती. या वर्षी मार्चनंतर स्थिती अधिक बिघडत गेली, मात्र आता परिस्थिती सुधारत असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, मोटार वितरण क्षेत्रातील असोसिएशनच्या आकडेवारीनुसार ऑगस्ट हा मोटारविक्रीचा महिना होता. दसरा दिवाळीपर्यंत अशीच स्थिती असेल असेही सांगण्यात येत आहे. ऑगस्ट महिन्यात १ लाख ७८ हजार ५१३ गाडय़ा विकल्या गेल्या. गेल्यावर्षी ऑगस्टच्या तुलनेत ही संख्या केवळ सात टक्क्यांनी कमी आहे. तीन चाकी विक्रीमध्ये मात्र ही घट ६९.५१ टक्के असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान ऑगस्टमध्ये औरंगाबादसारख्या शहरात दुचाकी विक्रीमध्ये एक हजार वाहने गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी विकली गेली. मात्र, चार चाकी व्रिकीमध्ये फरक दिसून येत असल्याचे प्रादेशिक परिवहन विभागाचे आधिकारीही सांगतात.

असेही एक चित्र

औरंगाबादमधून दुचाकी निर्माण करणारी बजाज कंपनी आहे. दुचाकी निर्यातही आता पूर्वस्थितीमध्ये येत आहे. मात्र, प्रादेशिक परिवहन विभागातील अधिकाऱ्यांच्या मते चारचाकी विक्री करोनापूर्व स्थितीमध्ये आली आहे. औरंगाबाद शहरात फेब्रुवारीत  ५७१ मोटारींची विक्री झाली होती. मार्चमध्ये ७०० तर जूनमध्ये टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर ४७० मोटार विक्री झाली. ऑगस्टमधील स्थिती आता मार्चमधील स्थितीशी मिळती जुळती आली असून ऑगस्टमध्ये ६५८ चारचाकींची विक्री झाली. दुचाकीविक्रीमध्ये हे प्रमाण काहिसे कमी असल्याचे दिसून येत आहे.

‘चार चाकी वाहने मिळण्यासाठी आता प्रतीक्षा करावी लागत आहे. काही वेळा करोनामुळे कामगारांची अनुपस्थिती किंवा संसर्ग वाढल्याने निर्माण झालेले प्रश्न आहेत. पण त्यावर मात करून उत्पादन क्षमता वाढविण्यात आली आहे. दुचाकी आणि छोटय़ा मोटारीच्या विक्रीमध्ये करोनापूर्व स्थिती निर्माण झाली आहे. फक्त रिक्षा उत्पादनांची स्थिती वाईट आहे. कारण अजूनही रिक्षांमध्ये बसण्याचे प्रमाण वाढलेले नाही. परिणामी रिक्षा चालवू असे वाटले तरी अशा तरुणाला कर्ज मिळणे अडचणी ठरते. परिणामी तीन चाकी वाहनांच्या क्षेत्रात मंदी आहे. दुचाकी आणि चार चाकी वाहन विक्रीची स्थिती करोनापूर्व स्थितीमध्ये आली आहे.

– राम भोगले, माजी अध्यक्ष महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स