मुंबई : रिलायन्स जिओच्या महत्त्वाकांक्षी ५ जी सेवेच्या मुहूर्ताची तारीख ठरली असून, दिवाळीपासून म्हणजे येत्या ऑक्टोबरअखेरपासून प्रमुख चार महानगरांपासून ही नव्या पिढीची वेगवान सेवा सुरू झालेली असेल, असे रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी सोमवारी आयोजित कंपनीच्या ४५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेपुढे स्पष्ट केले. गूगलच्या भागीदारीत परवडणारे ५ जीसमर्थ फोन बाजारात आणण्याची आणि एकंदर २ लाख कोटींच्या गुंतवणुकीतून डिसेंबर २०२३ पर्यंत देशभरात सर्वत्र या सेवेच्या विस्ताराची योजना असल्याचेही त्यांनी सांगितले.

अलीकडेच झालेल्या ५ जी ध्वनीलहरी लिलावादरम्यान रिलायन्स जिओ ही सर्वात मोठी बोली लावणारी कंपनी होती आणि तिने यावर ८८,०७८ कोटी रुपये खर्च केले आहेत. पुढचे पाऊल म्हणून ऑक्टोबरपासून मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नई या महानगरांमध्ये ‘जिओ ट्रू ५ जी’ असे नामकरण केली गेलेली सेवा प्रत्यक्षात सुरूही केली जाईल, असे अंबानी यांनी स्पष्ट केले. कंपनीकडून नेमकी तारीख अद्याप अधिकृतपणे जाहीर केली गेलेली नाही, मात्र दिवाळीचा मुहूर्त साधला जाईल, असे संकेत आहेत.

अंबानी म्हणाले, महिनागणिक विस्तार वाढवत नेला जाईल आणि जिओची ५ जी सेवा देशाच्या प्रत्येक गाव, प्रत्येक तालुका आणि प्रत्येक जिल्ह्यापर्यंत पोहोचवण्याची योजना आहे. देशव्यापी ११ लाख किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचे फायबर-ऑप्टिकचे स्थापित जाळे, आयपी नेटवर्क, स्वदेशी ५ जीसमर्थ खुंट (स्टॅक) आणि संपूर्ण तंत्रज्ञान परिसंस्थेसाठी मजबूत जागतिक भागीदारी यामुळे कमीत कमी कालावधीत ५ जी सेवा सुरू करण्याची सक्षमता कंपनीकडे होती, यावर त्यांनी जोर दिला. ५ जी सोबतच, जिओकडून संबद्ध प्रज्ञेसह अर्थात कनेक्टेड इंटेलिजेंससह अब्जावधी स्मार्ट सेन्सर स्थापित केले जातील, जे इंटरनेट ऑफ थिंग्जला चालना देईल आणि चौथ्या औद्योगिक क्रांतीची पायाभरणी केली जाईल.

अदानी समूहाला तोडीस तोड गुंतवणूक नियोजन

मुंबई : गौतम अदानी आणि मुकेश अंबानी या दोन अब्जाधीशांमध्ये त्यांच्या साम्राज्यात विस्तार आणि विविधततेसाठी निरंतर चढाओढ सुरू असून, यातूनच सोमवारी तब्बल २.७५ लाख कोटी रुपयांची गुंतवणुकीची योजना रिलायन्सकडून जाहीर करण्यात आली.  ५ जी सेवेच्या विस्तारासाठी २ लाख कोटींची गुंतवणूक तर पेट्रोकेमिकल आणि तेल या मुख्य व्यवसायाच्या क्षमता विस्तारासाठी आणखी ७५ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे नियोजन अंबानी यांनी जाहीर केले.

व्हॉट्सअ‍ॅपवर आता खरेदीचा अनुभव

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबई : रिलायन्स रिटेलचे ग्राहक आता  ‘व्हॉट्सअ‍ॅप’चा वापर करून किराणा सामानाची खरेदी करू शकतील. यासाठी जागतिक आघाडीची तंत्रज्ञान कंपनी मेटा आणि जिओ प्लॅटफॉम्र्स यांनी सहयोगाची घोषणा सोमवारी केली. आधी कधीही ऑनलाइन खरेदी न केलेल्या ग्राहकांना घरबसल्या खरेदीची ही अनुभूती सोपी, सुलभ व्हावी यासाठी व्हॉट्सअ‍ॅपसारख्या जनमानसांत रुळलेल्या माध्यमाचा वापर ‘जिओमार्ट’ने केला आहे.