पीटीआय, नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी राष्ट्रीय शेअर बाजार अर्थात एनएसई लिमिटेडच्या माजी व्यवस्थापकीय संचालिका व मुख्य कार्यकारी अधिकारी चित्रा रामकृष्ण आणि माजी समूह संचालन अधिकारी आनंद सुब्रमणियन यांना जामीन मंजूर केला. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून चौकशी सुरू असलेल्या एनएसईतील ‘सह-स्थान’ घोटाळय़ाप्रकरणी दोघांना चालू वर्षांत अटक करण्यात आली होती.

चित्रा रामकृष्ण यांच्यावर प्रशासकीय त्रुटी आणि कारभारातील हयगयीच्या प्रकरणी मे २०१८ मध्ये गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यांनतर चालू वर्षांत २४ फेब्रुवारीला सीबीआयने त्यांना अटक केली होती. तर सुब्रमणियन यांना एनएसईतील ‘सह-स्थान’ (को-लोकेशन) घोटाळय़ाप्रकरणी सीबीआयने चेन्नई येथून अटक केली होती. अलीकडेच एनएसईच्या प्रमुखपदाचा चित्रा रामकृष्ण यांनी दुरुपयोग करत गोपनीय आणि संवेदनशील माहिती कथित ‘हिमालयातील योग्या’ला दिल्याचे प्रकरण चर्चेत आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हे योगी प्रकरण तसेच एनएसईतील ‘सह-स्थान’ घोटाळय़ाप्रकरणी भांडवली बाजार नियंत्रक ‘सेबी’च्या अहवालातून पुढे आलेल्या नवीन तथ्यांच्या आधारे रामकृष्ण आणि सुब्रमणियन यांना अटक करण्यात आली होती. रामकृष्ण या एप्रिल २०१३ ते डिसेंबर २०१६ पर्यंत राष्ट्रीय शेअर बाजाराच्या व्यवस्थापकीय संचालिका आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होत्या.