भारतीयांकडून होणाऱ्या सोने मागणीचा देशाच्या चालू खात्यातील तुटीवरचा दबाव विस्तारतच चालला आहे. चालू आर्थिक वर्षांतील पहिल्याच महिन्यात सोन्याची आयात तब्बल १३८ टक्क्यांनी उंचावली असून परिणामी व्यापार तूटही या कालावधीत १७.७ अब्ज डॉलपर्यंत गेली आहे.
वर्षभरापूर्वी एप्रिल २०१२ मध्ये सोने तसेच चांदीची आयात ३.१ अब्ज डॉलर नोंदली गेली असताना यंदाच्या एप्रिलमध्ये ती वाढून ७.५ अब्ज डॉलर झाली आहे. टक्केवारीतील ही वाढ सुमारे १३८ टक्के आहे. तर चालू वर्षांतील ही सर्वात मोठी सोने आयात ठरली आहे.
मौल्यवान धातूसारख्या वाढत्या आयातीमुळे एकूण आयातही एप्रिल २०१३ मध्ये १०.९ टक्क्यांनी वाढली आहे. यात अर्थातच सोने-चांदीची आयात मोठा वाटा राखते, असे केंद्रीय वाणिज्य सचिव एस. आर. राव यांनी म्हटले आहे. परिणामी विदेशी चलनाचा देशातील ओघ आणि बाहेर जाणारे चलन यातील असलेला चालू खात्यातील तूट हा फरकही वृद्धिंगत होत आहे. डिसेंबर २०१२ अखेर संपलेल्या तिमाहीत चालू खात्यातील तूट सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या ६.७ टक्के या ऐतिहासिक उंचीवर पोहोचली होती. ही तूट कमी करण्यासाठी, सोने-चांदी वापर कमी होण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेनेही बँकांना सोने तारण आणि कर्ज यावर र्निबध घातले आहेत. व्यापार तूटही एप्रिलमध्ये १७.७ अब्ज डॉलर नोंदली गेली आहे.
सुरुवातीच्या महिन्यातील सोने आयातीचे आकडे पाहिल्यानंतर एकूण २०१३ मधील सोने आयात ९०० टनपुढे जाण्याची शक्यता आहे. मागणीच्या तुलनेत देशाची सोने आयात कमी आहे. सोने र्निबध योग्य रीतीने लागू होतील, याबाबत शंका वाटते.
’ पी. आर. सोमसुंदरम,
व्यवस्थापकीय संचालक (भारत), जागतिक सुवर्ण परिषद.