सरलेल्या एप्रिल ते जून तिमाहीत ३३० मेगावटच्या सौरऊर्जा प्रकल्पांना ग्रिडशी जोडणाऱ्या उपकेंद्र प्रकल्पांचे कंत्राट मिळवून या क्षेत्रात वेगाने विस्तारणाऱ्या हरतेक पॉवर प्रा. लि.ने महाराष्ट्रात सौर वीजनिर्मिती ते वितरणाच्या सेवांसाठी लक्ष केंद्रित केले आहे.

कंपनीच्या आगामी व्यवसायवृद्धीत राज्याचा २० टक्के वाटा अर्थात ५० ते ६० मेगावॅटचे प्रकल्प महाराष्ट्रातून मिळविण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.

चंडिगढस्थित हरतेक पॉवरने अलीकडेच उत्तर व दक्षिण भारतातून महाराष्ट्र व गुजरातमध्ये विस्ताराच्या दिशेने शिरकाव केला आहे. नागपूरमध्ये ७ मेगावॅट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पाच्या उभारणीचे कंत्राटही तिने मिळविले आहे. महाराष्ट्रात सौर ऊर्जा उद्याने, छतावरील सौर वीजनिर्मितीच्या शक्यता प्रचंड मोठय़ा आहे. २०१६-१७ सालासाठी निश्चित केलेल्या अतिरिक्त ५०० मेगावॅटच्या सौर प्रकल्पांच्या कामात राज्याचा वाटा किमान २० टक्के असेल, असा विश्वास हरतेक समूहाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक हरतेक सिंग यांनी ‘लोकसत्ता’कडे व्यक्त केला.

२०१५-१६ मधील १३० मेगावॅटच्या तुलनेत तीन पटीने अधिक – ३३० मेगावॅटच्या सौरऊर्जा प्रकल्पांचे ईपीसी कंत्राट चालू वर्षांच्या पहिल्या तिमाहीत हरतेक पॉवरने पटकावले आहे. नव्या प्रकल्पांपैकी ६० टक्के हिस्सा म्हणजे १६० मेगावॅटचे प्रकल्प हे आंध्र, तेलगंणा व कर्नाटक या तीन राज्यांतून आले असून, असाच वेगवान विकास महाराष्ट्रातूनही शक्य असल्याचे मत हरतेक सिंग यांनी व्यक्त केले. तीन वर्षांपूर्वी या क्षेत्रात शिरकाव केल्यानंतर, आजवर २५८ मेगावॅटचे सौर वीज प्रकल्प कंपनीने कार्यान्वित केले आहेत.