मुंबई : चालू आर्थिक वर्षांत आतापर्यंत दोन कोटींहून अधिक करदात्यांना १.८६ लाख कोटी रुपयांहून अधिक प्राप्तिकराचा परतावा (रिफंड) जारी करण्यात आला आहे, अशी माहिती प्राप्तिकर विभागाने गुरुवारी दिली. यामध्ये आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी (कर निर्धारण वर्ष २०२१-२२) १.८४ कोटी करदात्यांना दिलेल्या ३५,२९६ कोटी रुपयांचा परतावादेखील समाविष्ट आहे.
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाकडून (सीबीडीटी) प्राप्तिकर परताव्याच्या प्रक्रियेअंतर्गत १ एप्रिल २०२१ ते ७ मार्चपर्यंत २.१४ करदात्यांना १,८६,६७७ कोटी रुपयांहून अधिक परतावा जारी केला गेला आहे, अशी माहिती प्राप्तिकर विभागाने ट्वीटद्वारे दिली. सीबीडीटीने दिलेल्या माहितीनुसार, २.११ लाखांहून अधिक करदात्यांना ६७,४४२ कोटी रुपयांचा वैयक्तिक प्राप्तिकर परतावा मिळाला आहे. यासह कंपनी कराच्या बाबतीत २.३१ लाखांहून अधिक प्रकरणांमध्ये १,१९,२३५ कोटी रुपयांची रक्कम वितरित करण्यात आली आहे.
सीबीडीटीने आर्थिक वर्ष २०१५-१६ मध्ये करदात्यांना १.२२ लाख कोटी, आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये १.६२ लाख कोटी, आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये १.५१ लाख कोटी आणि आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये १.५ लाख कोटी रुपयांहून अधिक प्राप्तिकराचा परतावा वितरित केला होता.