राष्ट्रपती, लोकसभेचे अध्यक्षपद, सर्वात मोठय़ा राजकीय पक्षाचे अध्यक्षपद, सभागृहातील विरोधी पक्षनेते, राज्याच्या मुख्यमंत्री अशी सारी पदे महिलांकडे चालून आल्याचे चित्र असतानाच भारतासारख्या देशात अनेकदा महिलांना घर अथवा कामाच्या ठिकाणी हिंसेचा सामना करावा लागतो, याबद्दल चिंता व्यक्त करतानाच महिलांचे सामाजिक, आर्थिक तसेच राजकीय सक्षमीकरण हे केवळ उद्दिष्टच राहिल्याची खंत पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी मंगळवारी बोलून दाखविली.
भारतातील पहिल्या सार्वजनिक वाणिज्यिक महिला बँकेचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते नरिमन पॉइंट येथील एनसीपीए सभागृहात झाले. देशाच्या पहिल्या पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या जयंतीदिनी आयोजित भारतीय महिला बँकेच्या स्थापनानिमित्ताने या वेळी संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राज्याचे राज्यपाल के. शंकरनारायणन, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, केंद्रीयमंत्री शरद पवार, डॉ. फारुख अब्दुल्ला, प्रफुल्ल पटेल तसेच केंद्रीय राज्यमंत्री सेलम या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते, तर महिला बँकेच्या अध्यक्षा उषा अनंतसुब्रमण्यम, रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन, केंद्रीय अर्थसेवा सचिव टाकरू, तसेच अनेक बँकांचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक, वरिष्ठ पदाधिकारी, स्वयंबचत गटाच्या प्रतिनिधी आदी या वेळी हजर होते.
पंतप्रधान म्हणाले की, देशातील स्त्रीवर्गाला आजही गृहिणी म्हणून घरी किंवा उदरनिर्वाह म्हणून कामाच्या ठिकाणी अनेकदा हिंसक प्रवृत्तीला सामोरे जावे लागते. महिलांच्या अत्याचाराविरुद्धचे कायदे तसेच शिक्षाही आता तुलनेने कठोर करण्यात आले आहेत. शिक्षण, आरोग्यासारख्या बाबी महिलांना समान तत्त्वावर पुरविण्याची गरज आहे. पंचायतीतील आरक्षणाच्या रूपाने आज देशातील १५ राज्यांमध्ये महिलांचे ५० टक्क्य़ांहून   अधिक स्थान आहे. राष्ट्रउभारणीत महिलांचे आर्थिक सक्षमीकरण होणे गरजेचे आहे. नव्या बँकेचे या दिशेने नक्कीच पाऊल पडेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ग्रामीण भागातील महिलांचा आर्थिक स्तर उंचाविण्याच्या दृष्टीने त्यांना सुरक्षित वातावरण पुरविण्याची सरकारची जबाबदारी आहे.
नुकत्याच करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणाचा दाखला देत पंतप्रधानांनी जगभरातील आघाडीच्या ५० उद्योजकांमध्ये भारतातील चार भारतीय महिलांचा समावेश असल्याचा गौरवोपर उल्लेख केला. झाशीची राणी, अरुणा आसफ अली यांचा नामोल्लेख करत पंतप्रधानांनी देशातील विज्ञान, औषध, क्रीडा आदी विविध क्षेत्रांत महिलांनी योगदान दिल्याचे नमूद केले. अनेक सार्वजनिक तसेच खासगी बँकेचेही नेतृत्व आज महिला करत आहेत, असेही ते म्हणाले.
तब्बल दीड दशके भारत हा महिलांच्या नेतृत्वाखाली वाटचाल करत होता, याचा उल्लेख करत पंतप्रधानांनी पहिली महिला बँक ही प्रामुख्याने महिला व स्वयंबचत गटासाठी आहे, असे भाषणाच्या सुरुवातीलाच स्पष्ट केले. आर्थिकदृष्टय़ा महिलांना सबळ करण्यासाठी स्व. इंदिरा गांधी यांच्या जयंतीदिनी उचलण्यात आलेले बँक स्थापनेचे पाऊल हे माझे सहकारी केंद्रीय अर्थमंत्री व संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षांचे योगदान असल्याचेही ते म्हणाले. आर्थिक तसेच सामाजिकदृष्टय़ा मागास महिलांसाठी ही बँक कार्य करेल आणि त्यांचा दैनंदिन आर्थिक व्यवहारातील सहभाग वाढवेल, तसेच अर्थसेवांची तरतूद करण्यासाठी प्रयत्न करेल, असेही त्यांनी नमूद केले.

सक्षमीकरण हे महिलांचे स्वत:चे उद्दिष्ट असायला हवे : सोनिया गांधी
सोनिया गांधी या वेळी म्हणाल्या की, महिला बँकेच्या स्थापनेच्या रूपाने इंदिरा गांधी यांना खरी श्रद्धांजली अर्पण केली जात असल्याबद्दल आपल्याला आनंद होत आहे. इंदिराजींनी नेहमीच महिलांप्रती – गरीब, आदिवासी, अल्पसंख्याकांबद्दल चिंता वाहिली. महिलांचे सक्षमीकरण हे त्यांचे स्वत:चे उद्दिष्ट असायला हवे आणि हे कार्य पहिल्या महिला बँकेमार्फत होईल, असा आपल्याला विश्वास वाटतो.
गांधींनी सांगितले की, सार्वजनिक बँकांकडून केवळ ७.३ टक्के महिलांनाच पतपुरवठा करण्यात आला आहे; तर प्रत्येक चारनंतर एक महिला कर्मचारी बँकिंग व्यवस्थेत आहे. गेल्या आर्थिक वर्षअखेर ६० लाख महिलांना ३३ हजार कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य स्वयंबचत गटाद्वारे दिले गेले आहे.
राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तसेच केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांचीही या वेळी भाषणे झाली. केंद्रीय अर्थसेवा सचिव यांनी यावेळी आभारप्रदर्शन केले.

पहिल्या महिला बँकेच्या पहिल्या शाखेची सूत्रे मराठी‘कर’कडे
देशातील पहिल्या महिला बँकेची पहिली शाखा आर्थिक राजधानीत सुरू झाली. नरिमन पॉइंट येथील एअर इंडियाच्या तळमजल्यात असलेल्या या शाखेची सूत्रे महिलेकडे येतानाच ती मराठी व्यक्तीकडे आली आहेत. विजया बँकेत तब्बल २५ वर्षे सेवा बजाविणाऱ्या अनिता खांडेकर या नव्या बँकेच्या पहिल्या शाखेच्या वरिष्ठ व्यवस्थापक बनल्या आहेत. दादर, अंधेरीसारख्या मुंबई उपनगरात वाढलेल्या आणि शिक्षण पूर्ण करणाऱ्या अनिता या पनवेल येथे राहतात. त्यांच्या व्यतिरिक्त येथील शाखेत सहा कर्मचारी आहेत. ज्यामध्ये चार महिला व दोन पुरुष आहेत. नियुक्तीनंतर ‘सर्व गरजू महिलांना बँकिंग सेवा देण्याचा शाखेचा प्रयत्न असेल; प्रसंगी आम्ही त्यांच्यापर्यंत जाऊ,’ असे मनोगत त्यांनी व्यक्त केले. केवळ महिलांसाठीच नव्हे तर महिला वर्गासाठी कार्य करणाऱ्या संस्था, कंपन्या यांना बँक आर्थिक सहकार्य करेल, असेही त्या या वेळी म्हणाल्या.

भारतीय महिला बँकेवरील महिलाराज
उषा अनंतसुब्रमण्यम अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक
छावी राजावत (सरपंच : सोदा, राजस्थान)
कल्पना सरोज (संचालक, कमानी पम्प्स)
नूपुर मित्रा (देना बँकेच्या माजी अध्यक्षा)
डॉ. पाकिजा सामद (प्राध्यापक)
प्रिया कुमार (वरिष्ठ अधिकारी, केंद्रीय अर्थसेवा विभाग)
रेणुका रामनाथ (माजी अधिकारी, आयसीआयसी बँक)
तान्या दुभाष (संचालक, गोदरेज)
शिवाय डॉ. सुधा उलागा ओली (सहायक सर व्यवस्थापक, संपर्क व विपणन). (शिवाय बँकेची मुख्य सुरक्षा अधिकारीदेखील एक महिलाच आहे.)
(कॅनरा बँकेचे एम.बी.एन. राव हे बाजूला झाल्यानंतर मंगळवारपासूनच महिला बँकेवरील संचालक मंडळात आता सर्व महिलांचे अस्तित्व राहिले आहे.)

पहिल्या पाच महिला खातेदार
जयरूपराज मोहम्मद शेख, किशोरी पांडुरंग गायकवाड, नाजनीन मलंग शेख, तान्या आदिद दुभाष.
पहिल्या पाच महिला कर्जदार
गीता जयदेव पाटील, रत्ना गोपार्डे, सुजाता घोरपडे, अंबाजी मारु, भाग्यश्री जोशी.

बचतीवर अधिक व्याज; कर्जदरही किमान राहणार
बचतीवर इतर बँकांच्या तुलनेत भारतीय महिला बँक किमान अर्धा टक्का तरी अधिक व्याज देत आहे. बँक एक लाख रुपयेपर्यंतच्या ठेवींवर वार्षिक ४.५ टक्के व्याज देणार आहे. तर यावरील रकमेसाठी ५ टक्के व्याज दिले जाईल. इतर व्यापारी बँकांमध्ये किमान व्याजदर ४ टक्के आहे. बँकेचा कर्जासाठीचा किमान आधार दर (बेस रेट) अद्याप निश्चित नसला तरी तो इतर बँकांच्या तुलनेत कमी असेल. शिवाय खात्यात किमान शिल्लक न ठेवल्यास (मिनिमम बॅलन्स) शुल्क आकारण्यात येणार नाही.

पहिल्या दिवशी ५५ खाती; ५ खातेदार आणि ५ कर्जदारांपासून शुभारंभ
महिला बँकेच्या मुंबईतील पहिल्या शाखेत ५५ खाती सुरू करण्यात आली आहेत. पैकी ५ बचत खातेदारांना सोनिया गांधी यांच्या हस्ते ‘किट’ देण्यात आले. यामध्ये बँक पुस्तिका व माहिती पत्रकाचा समावेश होता. पैकी एका महिला खातेदाराला गांधी यांनी स्वत: व्यासपीठावरून उतरत थेट प्रेक्षकांमध्ये जात खातेपुस्तिका बहाल केली. तर पंतप्रधानांच्या हस्ते अन्य पाच महिला कर्जदारांना प्रमाणपत्र देण्यात आले.

बीएमबी खऱ्या अर्थाने महिला बँक ठरेल;बँकेला आकार देणाऱ्या राव यांना विश्वास
महिला बँक प्रत्यक्षात येण्यामागे केंद्रीय अर्थमंत्री आणि पंतप्रधानांचा दृष्टिकोन आहे; शिवाय हे सारे घडून येण्यास अर्थमंत्रालयातील अधिकारी आणि आता खुद्द बँकेतील महिला कर्मचाऱ्यांचे सहकार्यही आहेच, अशी प्रतिक्रिया या बँकेची रूपरेषा ठरविणाऱ्या एम.बी.एन. राव यांनी दिली. कॅनरा बँकेत वरिष्ठ पदावर असलेल्या राव यांनी अवघ्या दोन महिन्यांत या बँकेचा कागदोपत्री साचा तयार केला. त्यानंतर केंद्रीय अर्थमंत्र्यांनी याबाबतची घोषणा फेब्रुवारीमध्ये अर्थसंकल्पात केली. तत्पूर्वी जयपूर येथे काँग्रेसच्या बैठकीत अशा प्रकारच्या विशेष बँकेचा विचार एका गटाने पी. चिदम्बरम यांच्यापुढे मांडला होता. ‘ही बँक खऱ्या अर्थाने महिला बँक म्हणून विकसित पावेल’, असा विश्वासही राव यांनी व्यक्त केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राजधानीत ५ डिसेंबरपासून शाखा;२०२० पर्यंत ६० हजार कोटींचा व्यवसाय
नवी दिल्ली आणि इंदूर येथील बँकेच्या शाखांचा शुभारंभ ५ डिसेंबरला होणार आहे. मुंबईसह अहमदाबाद, चेन्नई, बंगळुरू, कोलकत्ता आणि गुवाहाटी येथे बँकेच्या कार्यास मंगळवारपासून प्रारंभ झाला. बँकेला यापूर्वीच १,००० कोटी रुपयांचे भांडवल मिळाले आहे. मार्च २०१४ अखेर बँकेच्या देशभरात २५ शाखा होतील. शहरांव्यतिरिक्त निमशहरे तसेच ग्रामीण भागांतही बँकेचे अस्तित्व असेल. बँकेचा विस्तार देशभरात, प्रत्येक राज्यातील राजधानीत झाल्यानंतर तिचे सरकारी भागभांडवल कमी करण्यात येईल. यानंतर ती भांडवली बाजारातही सूचिबद्ध होईल. बँकेत तूर्त अन्य सार्वजनिक बँकांमधील महिला कर्मचारी बढतीवर नेमण्यात आल्या आहेत. बँकेत ११० कर्मचाऱ्यांची नेमणूक भारतीय बँक भरती प्रक्रियेदरम्यान करण्यात येत आहे. २०२० पर्यंत बँकेच्या देशभरात ७७१ शाखा व ६०,००० कोटी रुपयांचे व्यवसाय उद्दिष्ट राखण्यात आले आहे.