बजेटमध्ये ज्या नव्या सुधारणांची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. देशातील प्रत्येक नागरिक आर्थिकदृष्टया सक्षम होईल व या दशकात अर्थव्यवस्थेचा पाया अधिक भक्कम होईल असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. त्यांनी निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या बजेटचे कौतुक केले.

रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी सरकारकडून या बजेटमध्ये अनेक उपायोजना करण्यात आल्या आहेत. शेती, इन्फ्रास्ट्रक्चर, टेक्सटाइल आणि टेक्नोलॉजी ही रोजगार निर्मितीची मुख्य क्षेत्रे आहेत. रोजगार वाढवण्यासाठी या चार क्षेत्रांवर अर्थसंकल्पात विशेष भर देण्यात आल्याचे मोदींनी सांगितले.

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी १६ पॉईंटसचा अॅक्शन प्लान बनवण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात रोजगार निर्मितीला चालना मिळेल असे मोदी म्हणाले. फिश प्रोसेसिंग आणि मार्केटिंगमध्ये युवकांना नव्या संधी मिळतील. बजेटमधून देशातील युवकांना नवीन ऊर्जा मिळेल असे मोदी म्हणाले. निर्यात आणि एमएसएमई क्षेत्रातून रोजगार निर्मिती होते. निर्यात वाढवण्यासाठी अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत असे मोदींनी सांगितले.