कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अर्थात ‘पीएफ’च्या पैशाची एक्सचेंज ट्रेडेड फंड – ईटीएफच्या माध्यमातून होणारी कंपनी शेअर बाजारामधील गुंतवणूक चालू आर्थिक वर्षअखेपर्यंत ४५,००० कोटी रुपयांचा टप्पा पार करेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. निवृत्ती वेतनाचे नियोजन करणाऱ्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचा कार्यभार हाताळणाऱ्या केंद्रीय कामगार मंत्री बंडारू दत्तात्रेय यांनी याबाबत माहिती दिली.
ईटीएफ (एक्स्चेंज ट्रेडेड फंड) मध्ये भविष्य निवाह निधीच्या गुंतवणुकीचे प्रमाण १० टक्क्यांवरून १५ टक्क्यांवर नेण्यात आले आहे. त्यामुळे ही गुंतवणूक मार्च २०१७ पर्यंत ४५,०००० कोटी रुपयांवर जाईल, असे दत्तात्रेय यांनी स्पष्ट केले. ईटीएफच्या माध्यमातून गेल्या वर्षी वार्षिक १३.३ टक्के परतावा मिळत होता, असेही त्यांनी नमूद केले. दत्तात्रेय म्हणाले की, भांडवली बाजारांचे प्रमुख निर्देशांक सध्या वरच्या टप्प्यावर आहेत. बाजाराच्या आगामी प्रवासाबाबत आताच काही सांगणे आव्हानात्मक असले तरी हा प्रवास मात्र आशादायक असेल, असे वाटते.
२१ एप्रिल २०१७ पर्यंत या माध्यमातील गुंतवणूक २१,५५९ कोटी रुपये होती, तर गेल्या आर्थिक वर्षांत ती १४,९८२ कोटी रुपये व त्याआधीच्या, म्हणजे २०१५-१६ मध्ये ही गुंतवणूक ६,५७७ कोटी रुपये होती.
राष्ट्रीय निवृत्ती योजनेच्या प्रोत्साहनार्थ मोहीम
सरकारची सुरक्षाप्रदान योजना असलेल्या राष्ट्रीय निवृत्ती योजनेच्या (एनपीएस) च्या प्रोत्साहनार्थ लवकरच मोहीम सुरू केली जाणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थखात्याने दिली आहे. निवृत्ती निधीची नियामक यंत्रणा या संदर्भातील १५ दिवसांची मोहीम लवकरच सुरू करणार आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयामार्फत २७ जूनपासून दर पंधरवडय़ाला याबाबत सविस्तर माहिती प्रसृत केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
भांडवली बाजारांचे प्रमुख निर्देशांक सध्या वरच्या टप्प्यावर आहेत. बाजाराच्या आगामी प्रवासाबाबत आताच काही सांगणे आव्हानात्मक असले तरी हा प्रवास मात्र आशादायक असेल, असे वाटते. – केंद्रीय कामगार मंत्री बंडारू दत्तात्रेय
‘पीएफ’च्या व्याज दराचा निर्णय लवकरच
नवी दिल्ली : भविष्य निर्वाह निधीच्या ठेवींवर दिला जाणाऱ्या दराबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेमार्फत गेल्या आर्थिक वर्षांसाठी वार्षिक ८.६५ टक्के दर दिला जात होता. संघटनेच्या ४.५० कोटी सदस्यांसाठीच्या गुंतवणुकीवरील हा दर आधीच्या वार्षिक ८.८० टक्क्यांवरून कमी करण्यात आला होता. नव्या दरनिश्चितीकरिता केंद्रीय विश्वस्त मंडळाची बैठक येत्या महिन्यात होणार आहे. गुंतवणूकदारांना आम्ही गेल्या वर्षी ८.६५ टक्के व्याज दिले; तर निधीद्वारे भांडवली बाजारात केलेल्या गुंतवणुकीतून आम्हाला १३.३ टक्के परतावा मिळाला, असे केंद्रीय कामगार मंत्री बंडारू दत्तात्रय यांनी सांगितले. चालू वर्षांत होणाऱ्या उत्पन्नावर आधारित भविष्य निर्वाह निधीवरील व्याजदर असेल, असेही ते म्हणाले.