तीन वेगवेगळ्या दूरसंचार सेवा प्रदात्यांनी त्रिपक्षीय सामंजस्य करीत परस्परांचे सेवाजाळे आपल्या ग्राहकांना देशस्तरावर ३जी रोमिंग सेवा प्रदान करण्यासाठी एकजूट केली आहे. ३जी सेवांसाठी झालेल्या या युतीत रिलायन्स कम्युनिकेशन्स (आर कॉम), टाटा टेलीसव्‍‌र्हिसेस आणि एअरसेल या कंपन्यांचा समावेश आहे.
या तीन कंपन्यांपैकी कुणाकडेही अखिल भारतीय स्तराचे सेवा परवाने नाहीत. आर कॉम आणि एअरसेलकडे देशातील २२ दूरसंचार परिमंडळांपैकी १३ मध्ये तर टाटा टेलीकडून नऊ परिमंडळामध्ये सेवा बहाल केली जात आहे. यापैकी तिन्ही कंपन्यांसाठी सामायिक नसलेली अनेक परिमंडळे आहेत, त्या त्या ठिकाणी या कंपन्यांच्या ग्राहकांना भ्रमंतीदरम्यान युतीतील अन्य कंपन्यांच्या ३जी सेवांचा या सामंजस्यातून विनासायास लाभ मिळविता येईल. विशेषत: या युतीतील एअरसेल आणि टाटा टेलीच्या ग्राहकांना देशातील सर्वात महागडय़ा आणि आर कॉमकडे परवाना असलेल्या दिल्ली आणि मुंबईतील ३जी सेवांचा लाभ या सामंजस्यामुळे मिळू शकेल, तर आर कॉमच्या ग्राहकांना आंध्र प्रदेश, कर्नाटक. तामिळनाडू, केरळ, उ. प्रदेश पूर्व आणि पश्चिम, महाराष्ट्र  (मुंबई वगळून), गुजरात आणि हरयाणा या असामायिक असलेल्या परिमंडळामध्ये विनाखंड ३जी सेवा या सामंजस्यापायी उपभोगता येईल.
आजच्या घडीला आर कॉमचे देशात तिसऱ्या क्रमांकाचे म्हणजे १.११ कोटी (३१ डिसेंबर २०१३ अखेर) ३जी सेवाधारक ग्राहक आहेत. टाटा टेली आणि एअरसेलच्या ३जी ग्राहकांची संख्या तुलनेत लक्षणीय नसली, तरी नव्या सामंजस्यातून देशव्यापी ३जी सेवेचे दालन खुले होऊन ग्राहक संख्येत वाढीची अपेक्षा या कंपन्यांनी केली आहे.