मुंबई : वाढत्या महागाईच्या चिंतेने गुंतवणूकदारांनी नफावसुलीला प्राधान्य देत बँकिंग, तेल आणि वायू आणि आरोग्य सेवा कंपन्यांच्या समभागांमध्ये विक्रीचा मारा केला. परिणामी बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी प्रमुख निर्देशांक – सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये अर्ध्या टक्कय़ांची घसरण नोंदली गेली.

दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ३१४.०४ अंशांच्या घसरणीसह ६०,००८.३३ पातळीवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये १००.५५ अंशांची घसरण झाली आणि तो १७,८९८.६५ पातळीवर स्थिरावला.

सेन्सेक्समध्ये अ‍ॅक्सिस बँकेच्या समभागात सर्वाधिक २ टक्कय़ांनी घसरण झाली. रिलायन्स इंडस्ट्रीज (१.९१ टक्के), कोटक बँक (१.५१ टक्के), भारती एअरटेल (१.३९ टक्के) आणि टायटनचे (१.२ टक्के) समभाग घसरले. त्यापाठोपाठ एचडीएफसी बँक, एचडीएफसी, डॉ रेड्डीज, सन फार्मा, टीसीएस आणि एचसीएल टेकचे समभागही गडगडले. दुसरीकडे, मारुतीचा समभाग सलग दुसऱ्या दिवशी २.७७ टक्कय़ांनी वाढून निर्देशांकात अव्वल राहिला. एशियन पेंट्स आणि पॉवर ग्रिडचे समभाग प्रत्येकी २ टक्कय़ांहून अधिक वधारले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गृहनिर्माण, ऊ र्जा, तेल आणि वायू, दूरसंचार आणि बँकेक्स निर्देशांकात १.७९ टक्कय़ांपर्यंत घसरण झाली तर वीज, वाहननिर्मिती निर्देशांक तेजीत राहिले. व्यापक बाजाराचे प्रतिनिधित्व करणारे मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकात किरकोळ वाढ झाली. अमेरिकेची किरकोळ विक्री संदर्भातील सकारात्मक आकडेवारी जागतिक बाजारपेठांना ऊ र्जा देण्यास अपयशी ठरली. त्याचेच पडसाद देशांतर्गत भांडवली बाजारावर उमटले. ब्रिटनमधील वार्षिक महागाई दर गेल्या महिन्याच्या ३.१ टक्कय़ांवरून ४.२ टक्कय़ांवर पोहचल्याने गुंतवणूकदारांच्या चिंतेत भर घातली, असे जिओजित फायनान्शियल सव्‍‌र्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी निरीक्षण नोंदविले. वाहननिर्मिती क्षेत्रासाठी चिंतेचा विषय असलेला सेमी-कंडक्टरचा विषय मार्गी लागण्याच्या शक्यतेने गुंतवणूकदारांनी वाहननिर्मिती क्षेत्रावर लक्ष केंद्रित केले आहे, असे नायर पुढे म्हणाले.