मुंबई : भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स-निफ्टी यांनी मागील आठवडय़ात गवसलेला तेजीचा सूर हा सप्ताहारंभीच्या व्यवहारात आणखीच बहरलेला दिसून आला. जागतिक सकारात्मक प्रवाहाला अनुसरून दोन्ही निर्देशांकांनी सोमवारच्या व्यवहारात जवळपास दोन टक्क्यांची मोठी मुसंडी मारली आणि चार सप्ताहांपूर्वी मागे सोडलेल्या उच्चांकावर पुन्हा फेर धरला.
निर्देशांकांमध्ये वजनदार स्थान असलेल्या रिलायन्स, इन्फोसिस आणि टीसीएस या समभागांनी खरेदीच्या बळावर साधलेल्या मूल्य वाढीने सेन्सेक्स-निफ्टीच्या मुसंडीत मोठे योगदान राखले. सेन्सेक्स १,०४१.०८ अंश (१.९० टक्के) कमाई करून ५५,९२५.७४ या पातळीवर दिवसातील व्यवहारांना निरोप दिला.
सकाळी सत्राची सुरुवातच सेन्सेक्सने ६९० अंशांची मोठी झेप घेत केली आणि दिवसभर तीच वेगवान चाल कायम ठेवताना, १,१९७.९९ ची भर घालत त्याने ५६,०८२.६५ अशा उच्चांकापर्यंत त्याने मजल मारली होती. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा अधिक व्यापक प्रतिनिधित्व असणारा ‘निफ्टी’ निर्देशांक ३०८.९५ अंश कमावून (१.८९ टक्के) दिवसअखेरीस १६,६६१.४० या पातळीवर स्थिरावला.
सोमवारी बाजारात खरेदीचा उत्साह इतका जबरदस्त होता की, सेन्सेक्समधील ३० पैकी २६ समभाग वाढ नोंदविणारे ठरले. निफ्टीतीलही ५० पैकी ४५ समभाग हे मोठय़ा कमाईसह बंद झाले. गेल्या आठवडय़ात सलग तीन सत्रांतील तेजीमय वातावरणामुळे, सेन्सेक्सने २,१७६ अंश, तर निफ्टीने ६३५ अंशांची दणदणीत कमाई केली आहे. हे पाहता सलग चार सत्रांमध्ये सेन्सेक्सने ५.९० टक्के, तर निफ्टीने ५.७९ टक्के अशी उमदी वाढ साधली आहे.
भांडवली बाजाराचा अधिकांश हिस्सा व्यापणाऱ्या बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप या निर्देशांकांनी २.२८ टक्के आणि २.२३ टक्के अशी सेन्सेक्स-निफ्टी या प्रमुख निर्देशांकांपेक्षाही मोठी झेप सोमवारी घेतली. त्यामुळे बाजारातील खरेदीचे लाभार्थी हे तळच्या व मधल्या फळीतील समभागही सारख्याच प्रमाणात ठरल्याचे स्पष्ट होते. मुंबई शेअर बाजारातील सर्वच क्षेत्रनिहाय निर्देशांक हे मोठय़ा वाढीसह बंद झाले. त्यातही ग्राहकोपयोगी वस्तू (४.४१ टक्के), स्थावर मालमत्ता (३.९६ टक्के), माहिती-तंत्रज्ञान (३.७५ टक्के) यांनी सर्वाधिक वाढ नोंदविली.
मूडपालट कशामुळे?
१. वेळेआधीच केरळमध्ये मान्सून दाखल होण्याच्या अंदाजाने कृषी उत्पादनाबाबत आनंदवार्ता
२. चलनवाढीच्या आघाडीवरील चिंता कमी झाल्याने जागतिक बाजारातील उसळी
३. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अमेरिकेच्या ‘फेडरल रिझव्र्ह’च्या बैठकीच्या इतिवृत्तांत दिसून आलेला नरमाईचा सूर
चलनवाढीसंबंधी चिंता कमी होतील अशा सकारात्मक बातम्यांमुळे अमेरिकेत भांडवली बाजारांना चालना मिळाली. ‘फेड’च्या आगामी धोरणांचा रोख ठरविण्यासाठी चलनवाढ हाच एक महत्त्वपूर्ण घटक असेल. चीनमध्ये दीर्घकाळ सुरू असलेले साथ प्रतिबंधक निर्बंध सैल झाल्याने आशियाई बाजारातील गुंतवणूकदारांच्या भावना उंचावण्यास मदत झाली. तर केरळमध्ये मान्सूनचे वेळेआधीच आगमन होण्याची वाढलेली आशा ही स्थानिक बाजारात मूडपालटास मदतकारक ठरली.
– विनोद नायर, संशोधन प्रमुख, जिओजित फायनान्शिअल सव्र्हिसेस