भांडवली बाजारात खरेदी दबाव

सेन्सेक्स, निफ्टीत सलग तिसरी वाढ

संग्रहित छायाचित्र

भांडवली बाजारातील तेजी सप्ताहअखेरही कायम राहिली. मात्र प्रमुख निर्देशांकांची सप्ताह कामगिरी काहीशी निराशाजनक ठरली. सेन्सेक्स व निफ्टीत शुक्रवारच्या व्यवहाररूपात सलग तिसरी वाढ नोंदली गेली.

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सप्ताहअखेरच्या व्यवहारात अवघ्या २८.३५ अंशांनी वाढत ४८,८३२.०३ वर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ३६.४० अंशांनी वाढून १४,६१७.८५ पर्यंत स्थिरावला.

सप्ताहात एक दिवस बाजाराचे व्यवहार बंद होते. आठवड्यात सेन्सेक्समध्ये ७५९.२९ अंश, तर निफ्टीत २१७ अंश भर पडली आहे. टक्केवारीत हे प्रमाण प्रत्येकी जवळपास दीड टक्क्याचे आहे.

भक्कम रुपया आणि विदेशी गुंतवणूकदारांचा निधी ओघ यामुळे भांडवली बाजारात सप्ताहअखेरच्या व्यवहारातही तेजी राहिली. सेन्सेक्समधील प्रमुख ३० कंपन्यांपैकी एशियन पेंट्सचे समभाग मूल्य सर्वाधिक, ३ टक्क्यांनी वाढले. त्याचबरोबर अल्ट्राटेक सिमेंट, ओएनजीसी, महिंद्र अँड महिंद्र, सन फार्मा, एचसीएल टेक, टेक महिंद्र, नेस्ले इंडियाही वाढले.

आयसीआयसीआय बँक, लार्सन अँड टुब्रो, बजाज फायनान्स, टीसीएस, स्टेट बँक, इन्फोसिस, रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागांवर १.५५ टक्क्यांपर्यंत विक्री दबाव राहिला.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये आरोग्यनिगा, बहुपयोगी वस्तू, ऊर्जा आदी जवळपास दोन टक्क्यांपर्यंत वाढले. तर बँक, स्थावर मालमत्ता, वित्त निर्देशांक घसरले. मुंबई शेअर बाजारातील मिड कॅप व स्मॉल कॅप १.१७ टक्क्यापर्यंत वाढले.

रुपया सप्ताह उंचीवर

डॉलरच्या तुलनेतील रुपयातील भक्कमता सप्ताहअखेरही कायम राहिली. विदेशी चलन विनिमय मंचावर स्थानिक चलन शुक्रवारी तब्बल ५८ पैशांनी भक्कम होत ७४.३५ वर पोहोचले. देशांतर्गत भांडवली बाजारातील तेजी आणि अमेरिकी रोख्यांवरील व्याज कमी होत असल्याने डॉलर कमकुवत होत चालला आहे. ७४.७६ ने शुक्रवारच्या व्यवहाराची सुरुवात करणारा रुपया सत्रात ७४.२८ पर्यंत उंचावला. दिवसअखेर त्याने गुरुवारच्या तुलनेत तेजी नोंदवली. सत्रातील त्याची झेप ही महिन्यातील सर्वोत्तम ठरली. रुपया आता सप्ताहाच्या उंचीवर स्थिरावला आहे.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किमती काही प्रमाणात वाढल्या आहेत.

विप्रोची दमदार कामगिरी

गेल्या तिमाहीत नफ्यातील २७ टक्के वाढ नोंदवणाऱ्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील विप्रोच्या समभागाचे मूल्य शुक्रवारी ९ टक्क्यांपर्यंत झेपावले. व्यवहारात वर्षातील सर्वोच्च स्तर गाठणारा विप्रो अखेर ४६९.२५ रुपयांवर बंद झाला. परिणामी, मुंबई शेअर बाजारातील त्याचे बाजार भांडवल सप्ताहअखेरच्या व्यवहारात १०,७७७.७० कोटी रुपयांनी उंचावत २.५७ लाख कोटी रुपयांवर गेले.

रुपया सप्ताह उंचीवर

डॉलरच्या तुलनेतील रुपयातील भक्कमता सप्ताहअखेरही कायम राहिली. विदेशी चलन विनिमय मंचावर स्थानिक चलन शुक्रवारी तब्बल ५८ पैशांनी भक्कम होत ७४.३५ वर पोहोचले. देशांतर्गत भांडवली बाजारातील तेजी आणि अमेरिकी रोख्यांवरील व्याज कमी होत असल्याने डॉलर कमकुवत होत चालला आहे. ७४.७६ ने शुक्रवारच्या व्यवहाराची सुरुवात करणारा रुपया सत्रात ७४.२८ पर्यंत उंचावला. दिवसअखेर त्याने गुरुवारच्या तुलनेत तेजी नोंदवली. सत्रातील त्याची झेप ही महिन्यातील सर्वोत्तम ठरली. रुपया आता सप्ताहाच्या उंचीवर स्थिरावला आहे.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किमती काही प्रमाणात वाढल्या आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Sensex nifty rises for the third time in a row abn