मुंबई : प्रमुख निर्देशांकांमध्ये सर्वाधिक योगदान असणाऱ्या एचडीएफसी, इन्फोसिस आणि कोटक बँकेच्या समभागांतील तेजीमुळे सोमवारी स्थानिक भांडवली बाजारात जागतिक पातळीवर नकारात्मक कलाच्या विपरीत उत्साही व्यवहार झाले. सेन्सेक्स ४७८ अंशांनी वधारला, तर निफ्टी निर्देशांकाला पुन्हा १८ हजारांचा स्तर निर्णायकपणे ओलांडता आला.

दिवाळीनिमित्त दीर्घ सुटीनंतर सोमवारी भांडवली बाजारात संमिश्र वातावरण होते. मात्र दुपारच्या सत्रादरम्यान, बाजाराने सुरुवातीचे नुकसान भरून काढत सकारात्मक पातळीवर फेर धरला. दिवसभराच्या अस्थिर सत्रानंतर, मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ४७७.९९ अंशांच्या वाढीसह ६०,५४५.६१ पातळीवर बंद झाला. बरोबरीने राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी १५१.७५ अंशाची तेजी दर्शवीत १८,०६८.५५ पातळीवर स्थिरावला.

सेन्सेक्समध्ये टायटनचा समभाग चार टक्के वाढीसह आघाडीवर राहिला. त्यापाठोपाठ अल्ट्राटेक सिमेंट, बजाज फिनसव्‍‌र्ह, टेक महिंद्रा, कोटक बँक, इन्फोसिस आणि एचडीएफसी यांचे समभाग तेजीत होते. दुसरीकडे, इंडसइंड बँकेचा समभाग १०.७६ टक्क्य़ांनी घसरला. कारण बँकेने तांत्रिक त्रुटीमुळे मे महिन्यात ग्राहकांच्या संमतीशिवाय ८४,००० कर्जे वितरित केल्याचे मान्य केले. त्यापाठोपाठ महिंद्र अँड महिंद्र, स्टेट बँक, मारुती, एशियन पेंट्स आणि टीसीएसच्या समभागात सर्वाधिक घसरण झाली.

 व्यापक मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांनी १.२० टक्क्य़ांपर्यंत उसळी घेतली.

भांडवली बाजाराची सुरुवात काहीशी संथ झाली. मात्र सणोत्सवाच्या काळात वाढलेली मागणी, इंधन दर कपात आणि निर्मिती क्षेत्र आणि सेवा क्षेत्रातील ‘पीएमआय’च्या अनुकूल आकडेवारीमुळे सकाळच्या सत्रात झालेले नुकसान भरून निघत निर्देशांकांना बळ मिळाले. अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझव्‍‌र्हचे धोरण बाजाराशी सुसंगत राहिल्याने, त्याने उदयोन्मुख बाजारांना चालना मिळाली, असे जिओजित फायनान्शियल सव्‍‌र्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी मत व्यक्त केले.

सणासुदीच्या हंगामात वस्तू आणि सेवांना वाढलेली मागणी, लसीकरणाला आलेला वेग आणि अलीकडच्या काही महिन्यांमध्ये देशाच्या आर्थिक सुधारणेला गती मिळाली. परिणामी, ग्राहक आणि उद्योग क्षेत्राच्या भावना उंचावल्या आहेत, असे आनंद राठीचे समभाग संशोधन प्रमुख नरेंद्र सोलंकी म्हणाले.

रुपयाला उभारी गेल्या काही सत्रांमध्ये सतत घसरणीचा सामना करणाऱ्या रुपयाच्या विनिमय मूल्याला सोमवारी मात्र तेजीचे बळ मिळाले. डॉलरच्या तुलनेत स्थानिक चलन तब्बल ४३ पैशांनी वधारत ७४.०३ पर्यंत मजबूत बनले. देशांतर्गत भांडवली बाजारातील उत्साही खरेदी आणि अमेरिकेच्या फेडरल रिझव्‍‌र्हच्या बाजाराला पूरक धोरण पवित्रा याचा रुपयाच्या मूल्याला भक्कम आधार मिळाला.